महात्मा गांधीजींचे ते तीन मारेकरी : सत्तर वर्षे झाली आज ही मोकाट आहेत.

भारतात असं म्हंटल जातं खरा गुन्हेगार पकडलाच जात नाही. आणि पकडलाच तर मग काहीतरी ओळखी लावून सुटतो. असो, पण  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित तीन आरोपी कधीच पकडले गेले नाहीत. आणि आता यात सस्पेन्स सुरू आहे. या प्रकरणात, केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, दिल्ली पोलीस आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला गांधींच्या हत्येशी संबंधित या तीन फरार आरोपींचा शोध घ्यायला सांगितलंय.

आता हे तीन आरोपी कोण आहेत ? 

तर 30 जानेवारी 1948 च्या संध्याकाळी महात्मा गांधींची हत्या झाली. गांधीजींची प्रतिमा ही भारतीय जनमानसात नेहमीच देवासम राहिली आहे. आता जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हा साहजिकच गांधीजींची लोकप्रियता लक्षात घेऊन गांधीजींच्या हत्येशी संबंधित कोणालाच सोडलं नसणार हे कोणाच्याही मनात येत.

आणि गांधीजींच्या हत्येची एक केस देखील होती, ज्यानंतर काही लोकांना शिक्षा झाली. यात आपल्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे नथुराम गोडसे. पण थांबा…

यात नथुराम गोडसे एकटाच नव्हता.

गांधीजींच्या हत्येशी संबंधित कागदपत्रे गोपनीय असून ती सार्वजनिक करण्यासाठी केंद्रीय माहिती आयोगात खटला सुरू आहे. या खटल्या दरम्यान, अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. यात महत्वाचं काय असेल तर गांधी हत्या प्रकरण हाताळण्यात उच्चस्तरावर निष्काळजीपणा करण्यात आला होता. 

जेव्हा गांधी हत्येप्रकरणी खटला सुरु होता तेव्हा नथुराम गोडसेशिवाय इतर 11 जणांना आरोपी ठरविण्यात आले होते. या 12 जणांपैकी 9 जणांना एकतर शिक्षा झाली तर काहींची निर्दोष मुक्तता झाली.

पण सरकारी नोंदीनुसार, गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव आणि सूर्यदेव शर्मा हे तीन आरोपी खटला सुरू असल्यापासून फरार आहेत. या 71 वर्षांत त्यांचा शोधच लागला नाही.

या प्रकरणात गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी तर यंत्रणेवर फारच गंभीर आरोप केलेत. 

बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थनेसाठी जात असलेल्या गांधीजींवर पॉइंट ब्लँक रेंजमधून तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या नथुराम गोडसेने बरेटा पिस्तुलातून झाडल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हे पिस्तूल गोडसेपर्यंत कसे पोहोचले, याचाही तपास आजवर लागला नाही. तुषार गांधींच्या म्हणण्यानुसार, या तीन फरार आरोपींनीच गोडसेला पिस्तूल पुरवलं होतं.

आता हे सोडून सरकारी अनास्था आणि निष्काळजीपणा कोणत्या पातळीवरचा होता यासंबंधी तुषार गांधी सांगतात,

ज्या दिवशी पंजाब उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा एक बातमी आली होती की या तीन फरारी आरोपींना ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांना सोडण्यात येत आहे. कारण त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही.

आता केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित प्रत्येक पैलूचे दस्तऐवज असलेले संग्रहण तयार करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक केल्या जात आहेत, त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित कागदपत्रेही सार्वजनिक करण्यात यावीत, असेही पंतप्रधान कार्यालयाला सांगण्यात आलयं.

याशिवाय केंद्रीय माहिती आयोगाने तुघलक रोड पोलिस स्टेशनच्या एसएचओला या प्रकरणाची केस डायरी सादर करण्यास सांगितलं आहे. यासोबतच तीन फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी आजवर काय केल, याचीही माहिती मागविण्यात आली आहे. गांधीजींच्या हत्येप्रकरणी तुघलक रोड पोलिस ठाण्यातच एफआयआर दाखल करण्यात आला होता.

गांधीजींच्या या हत्याकांडामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या सावरकरांचा हात असल्याचं बोललं जात होतं. पण पुराव्याअभावी सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारच्या कोणत्याही तपासात नाव आले नाही. पण तरीही संघाचा हात असल्याची जोरदार चर्चा आजही होते.

1966 मध्ये, या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती जेएल कपूर आयोग देखील स्थापन करण्यात आला. या आयोगानेच सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधले. पण आयोग कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. म्हणूनच ‘राष्ट्रपिता’ म्हणवल्या जाणाऱ्या माणसाच्या हत्येबाबत गूढ कायम राहील.

आता जो तपास सुरू आहे त्यातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होईल, असा विश्वास गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केला आहे. आज इतक्या वर्षानंतर या फरार तिघा आरोपींचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पण तपासात कोणतीही नवीन गोष्ट समोर आली तर ती संपूर्ण देशातील जनतेच्या हिताची ठरेल.

या शिवाय केंद्रीय माहिती आयोगाने नथुरामचे अखेरचे वक्तव्यही न्यायालयाला सादर केले आहे. त्याचे काही भाग इंटरनेटवर उपलब्ध आहेत, मात्र आता खरी गोडसेच्या त्यावेळी दिलेल्या साक्षीची खरीप्रत बाहेर आल्याने गांधी हत्येचं गूढ संपू शकतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.