“वेश्या व्यवसाय” कायदेशीर झाला…समाजातील लोकांनी दिलेल्या प्रतिक्रीया पहा मग विचार करा

घटनेचं कलम २१ म्हणजे सर्वांना सन्मानाने जगण्याचा समान अधिकार.  थोडक्यात या कलमातच जादू आहे. कुणीही असो सर्वांना एकाच सामान पातळीवर आणून ठेवते.

मग तो कोणता राजकीय नेता असो वा कुणी रस्त्यावरचा निराधार असो सर्वाना सामान न्याय. मात्र याची  सामाजिक मान्यता कधी मिळत नाही…हे बोलायचं निमित्त देखील आपल्या माननीय सुप्रीम कोर्टाने दिलंय…कोर्टाने एक निर्णय दिलाय. 

“प्रॉस्टीट्यूशन’ हा एक व्यवसाय आहे गुन्हा नाही !

सेक्स वर्कर्सना देखील जगण्याचा समान अधिकार आहे”.

न्यायमूर्ती न्यायमूर्ती बीआर गवई, एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्देश जारी केले. 

प्रॉस्टीट्यूशन करणाऱ्या महिलांना इथून पुढे पोलिसांनी नाहक त्रास देऊ नये तसेच सेक्स वर्कर्सच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे आदेशच सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना दिलेत.

सुप्रीम कोर्टाने काय काय आदेश दिलेत, ते बघूया….

 • जर देहविक्री करणारी महिला सज्ञान असेल आणि ती तिच्या इच्छेने शरीरसंबंध ठेवत असेल आणि हे स्पष्ट झालं तर पोलिसांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप करू नये.
 • किंवा त्या महिलेविरुद्ध कोणतीही फौजदारी करावाई करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. 
 • पोलिसांनी या महिलांना कोणत्याही शारीरिक क्रियांसाठी भाग पाडू नये.
 • छापेमारी दरम्यान देहविक्री करणाऱ्या महिलांना अटक, दंड आणि त्यांचा छळ करणे बेकायदेशीर आहे.
 • वेश्या-व्यवसाय करणे किंव्हा स्वइच्छेनं यात सामील होणं बेकायदेशीर नाहीये.
 • मात्र वेश्यालय चालवणं अवैध असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
 • वेश्या-व्यवसाय चालवते म्हणून त्या महिलेला तिच्या मुळापासून वेगळे करता येणार नाही.’
 • एखादी अल्पवयीन मुलगी किंव्हा मुलगा जर सेक्स वर्कर्ससोबत राहत असेल तर त्यांची तस्करी झाल्याचं समजू नये.
 • सेक्स वर्कर जर तिच्याविरुद्ध झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार करायला आली तर, त्यांच्याबाबत पोलिसांनी भेदभाव करू नये. त्यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे.
 • तसेच अत्याचाराला बळी पडलेल्या सेक्स वर्कर्सना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे.
 • आणखी एक म्हणजे, सेक्स वर्कर्सची सुटका करून तिच्या इच्छेविरुद्ध सुधारणागृहात ठेवता येणार नाही.

याशिवाय सुप्रीम कोर्टाने माध्यमांना देखील सूचना दिल्या आहेत, अटक, छापेमारी आणि बचाव कार्यादरम्यान माध्यमांनी सेक्स वर्कर्सची ओळख उघड होईल असे फोटो, व्हिडीओ पब्लिश करू नये याची काळजी घ्यावी.

आता हा निर्णय वरवर पाहता सकारात्मक आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना सुरक्षित असाच वाटत असला तरी यावर चर्चा होणे गरजेचं आहे म्हणून आम्ही काही व्यक्तींशी चर्चा केली.  त्यांची परखड मतं निश्चितच विचार करण्यासारखी आहेत.

“हा निर्णय घेणं गरजेचं होतं, वेश्या व्यवसायाला जगातला सर्वात जुना व्यवसाय म्हणतात. अनेक देशांमध्ये हा व्यवसाय कायदेशीर केला आहे आणि त्याचे फायदे असे आहेत कि, सेक्स वर्क्सर्स महिलांना योग्य ते मेडिकल क्लेम, इन्शुरन्स मिळवता येते तसेच कायदेशीर हक्क मिळतात. यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीत सुधारणा होतात.  आता दुर्दैवाने हा वेश्या व्यवसाय असा आहे कि, कितीही प्रयत्न केले तरी हा पेशा संपवू शकत नाही. मग त्याला कायदेशीर मान्यता द्यायची आणि कायदा आणि  व्यवस्थेमध्ये आणणं योग्य राहील. एखादी महिला तिच्या स्वइच्छेने या व्यवसायात येत असेल तर तिला कायद्याची साथ मिळेल त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे” – अ‍ॅड रोहन नाहार

महाराष्ट्राच्या स्त्री चळवळीत महत्वाचं स्थान असलेल्या “मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संपादिका गीताली वी. मं. यांच्याशी बोल भिडूने चर्चा केली, तेंव्हा त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया, त्या म्हणतात की,  

“वेश्येकडे ग्राहक म्हणून जाणारा पुरुष उजळ माथ्याने जातो मात्र वेश्या व्यवसाय करणारी महिला समाजात कलंकित असते. थोडक्यात समाजात वेश्यांचं दुय्यम स्थान होतं.  “वेश्या व्यवसाय हाअधिकृत व्यवसाय मानणं कौतुकास्पद निर्णय आहे. कायदेशीर व्यवसाय जरी केला तरी काही प्रश्न आहेतच ज्याची उत्तरं या व्यवस्थेकडे किंव्हा समाजाकडे आहेत का ?

 • महत्वाचं म्हणजे वेश्या तिच्याकडे आलेल्या ग्राहकाला हो किंव्हा नाही म्हणू शकते का..? 
 • मुळातच हा व्यवसाय बाईला का करावा लागतोय..?
 • या व्यवसायात कुठल्या जाती-वर्गातील महिला आहेत..?

“याचं उत्तर म्हणजे यात दलित महिला जास्त आहेत. ज्यांना या व्यवसायात ढकलल्या गेलं आहे. गरीब आणि मागासलेल्या घरातील बायका विकल्या जातायेत. हे या व्यवसायातील वास्तव आहे. आणि या पद्धतीने ती महिला येथे ढकलली गेली असेल तर तिला न्याय मागायचा अधिकार आहे. हे एक बरंय कि सुप्रीम कोर्टाने या महिलाना न्याय मागण्यासाठीची संधी दिली आहे”.

आणखी एक म्हणजे या व्यवसायातून स्त्रियांना बाहेर पडता आलं पाहिजे, ती जर वेश्या व्यवसाय करत असेल तर तिला इतर कोणत्याच गोष्टी करता येणार नाहीत असं करून चालणार नाही. तिला सामाजिक कार्यक्रमांमध्ये मानाने जाता आलं पाहिजे आणि सर्वांसाठी सामाजिक मान्यता खूप महत्वाची आहे. आणि समाज मानस बदलण्यासाठी आता कायद्याचा उपयोग होणार हे एक बरंय…मात्र तरीही हा झालेला निर्णय कितीही पुरोगामी वाटला तरी त्याचे उलटे परिणाम होऊ नये याची खबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे, असं मत गीताली यांनी व्यक्त केलं. 

महाराष्ट्रातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, दिशा पिंकी शेख यांच्याशी चर्चा केली त्यांची प्रतिक्रिया अशीय की,

“या निर्णयाचं मी स्वागत करते असं मी म्हणणार नाही, कारण या व्यवसायात येणारी प्रत्येक बाई काय तिच्या हौसेपोटी येत नाही. आर्थिक कारण असेल किंव्हा कुणाच्यातरी अत्याचाराची ती बळी पडते, किंव्हा कुणीतरी तिला येतेच आणून विकतात थोडक्यात तिला या क्षेत्रात ‘आणलं’ जातं. मुळातच देहविक्री हे काम म्हणून निवडावं लागणं हा तिच्यावरचा अत्याचार आहे.

“वेश्या व्यवसाय हा मुळातच पुरुषांची व्यवस्था करणारी सिस्टीम आहे”.

“आता ज्यांना हा व्यवसाय निवडायचा त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि ज्यांना हा व्यवसाय निवडायचा नाही त्यांना सुरक्षा कवच मिळालं पाहिजे. मात्र काही महिलांची यात हयात गेलीय त्यांच्या पुढच्या पिढीसाठी शासनाने पाऊल उचलली पाहिजेत, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेणं महत्वाचं आहे..आणि एक प्रश्न शेवटी आहेच तो म्हणजे मुळात स्त्रियांना हा व्यवसाय का करावा लागतो ?”, असा सवाल दिशा शेख यांनी विचारलाय..

तसेच आम्ही, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) मुंबई येतेच स्त्री अब्यास केंद्राचे पीएच.डी करणाऱ्या श्रुती मेटकर सोबत चर्चा केली, तिने व्यक्त केलेलं मत असं आहे की,

“कोर्टाने दिलेला निर्णय हा एक दिसायला सकारात्मक वाटत असला तरी त्याच्या मागची इतर दृष्टिकोन तपासला पाहिजे. पण कायदेशीर व्यवसाय म्हणून मान्यता मिळायला एवढा उशीर का झाला ? कित्येक वर्षांपासून कित्यकांनी यावर लिखाण केलं, मागण्या केल्या आणि कोर्टाने हा निर्णय घेतला असो…पण दुसरीकडे शासनाने यांच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे की, सेक्स वर्कर्सच्या मुलांचं काय ?त्यांचं लाइव्हलीहूड, त्यांचं शिक्षण या मुद्द्यांवर कोर्टाने जोर दिला नाही”.

“आधी पासून या व्यवसायात असलेल्या महिलांचं समजू शकतो मात्र नव्याने येणाऱ्या महिलांचं काय ? त्या स्व-इच्छेने येत आहेत की जबरदस्तीने यावर कोण लक्ष देणार ? एखाद्या महिलेने दबावात येऊन स्वतःच्या इच्छेने व्यवसायात असण्याची कबुली दिली तर तिच्या सुरक्षेचं काय ? कारण पोलीस तर त्यात हस्तक्षेप करणार नाहीत. दबावात असणाऱ्या महिला बोलत्या कशा होणार ? बरं जरी त्या स्वइच्छेने या व्यवसायात आलेल्या असल्या तरी त्यांना ‘सामान्य’ कामगारांसारखी समाजात प्रतिष्ठा/ मान्यता मिळणार का? असे अनेक प्रश्न श्रुतीने उपस्थित केले आहेत.

पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रात रिसर्च असिस्टंट असणाऱ्या श्रुती वाघमोडे हिने बोल भिडूशी बोलतांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय सकारात्मक असल्याचं म्हंटलंय, तिच्या म्हणण्यानुसार,

“वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना कायदेशीर पाठिंबा मिळणं खूप गरजेचं होतं. थोडासा उशीर का होईना तसा निर्णय आला आहे. सेक्स वर्कर्सना देखील इतर नागरिकांप्रमाणे जगण्याचा समान अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. देहविक्री करणारी महिला तिच्या संमतीने या व्यवसायात उतरली असेल तर ठीक आहे मात्र जर ती कुणाच्या त्याचाराल बळी पडत असेल किंव्हा तिची तस्करी करण्यात अली असेल त्याबाबत चौकशी झालीच पाहिजे. तिला जितका कायद्याचा पाठिंबा गरजेचं आहे तितकीच समाज मान्यता देखील मिळणे गरजेचं आहे असं मत श्रुतीने व्यक्त केलं आहे”.

गेली बऱ्याच वर्षांपासून पुणे आणि मुंबईत LQBTQ कम्युनिटील सदस्य, महिला आणि पौंगडावस्थेतील मुलांचे विनामूल्य समुपदेशन करणाऱ्या गायत्री यांच्याशी चर्चा केली, त्या म्हणतात की,  

“मुळातच sex workers कडे समाजाला आणि आपल्या so called संस्कृतीला घातक असणाऱ्या अश्याच नजरेने कायम पाहिले गेले आणि अजूनही तोच दृष्टिकोन कायम आहे. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहणे अत्यावश्यक आहे.  आपल्याला जसे सामान्य अधिकार मिळतात तसे त्यांनाही मिळावे यासाठी सगळे प्रयत्न होणे आवश्यकच वाटते. मग कायद्याने जरी स्त्रियांना या व्यवसायाला मान्यता मिळाली असली तरी समाजमान्यतेचं काय ?

शरीरविक्रीसारख्या व्यवसायात रोज अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची परिस्थिती काय असेल? त्या माणूस म्हणून जगात असतील का ? रोज त्यांच्या मनावर किती आघात होत आहेत याचा विचार कुणी केला का ? इतकं सगळं असूनही जर तीला समाज मान्यतेसाठी झगडावं लागत असेल तर तिची मानसिक स्थितीचा विचार करायला हवा असं मत समुपदेशक गायत्री यांनी व्यक्त केलं. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर या सर्व प्रतिक्रीया पाहता आपण नक्कीच विचार करायला भाग पडतो हे मात्र नक्की..

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.