‘राष्ट्रपत्नी’ इतकंच नाही तर ५० करोड की गर्लफ्रेंड, आयटम, खाकी अंडरवेअर अन् बरंच काही….

काल लोकसभेत झालेला राडा लाजिरवाणाच ठरला.  कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या संबंधी केलेल्या वक्तव्यावरुन या सगळ्या वादाला तोंड फुटलं.

झालं असं की, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला…आणि संसदेत गदारोळ सुरु झालेला. 

या प्रकरणी भाजप खासदारांनी मागणी केली की, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी. याच गदारोळात संसदेचं कामकाज तहकूब झालं आणि वाद थांबला. 

पण नवनियुक्त राष्ट्रपती मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून उल्लेख ज्यावरून भाजप पक्षाचे नेते एवढे पेटले असले तरी पक्ष कोणताही असो महिला राजकारण्यांवर लैंगिक टिप्पणी करणे ही राजकारणात फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. 

कितीही शिकलो, सवरलो तरीही स्त्रियांवर उघड उघड लैंगिक टिप्पणी करण्याचा मूर्खपणा राजकारण्यांकडून कायमच होत असतो. याचीच काही उदाहरणे पाहिलीत तर नक्कीच लाजिरवाणे आहेत. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे,

१) सुप्रिया सुळे

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरच्या जोरदार चर्चेदरम्यान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या” अशी प्रतिक्रिया दिलेली.

त्यांच्या ‘घरी जाऊन स्वयंपाक करा’ या वक्तव्यावरून त्यांची पुरुषप्रधान मानसिकता लपत नाही हे कळून येतंय. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वांकडून जोरदार टीका झालेली. 

२) गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही”

सप्टेंबर २००८ मध्ये समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन आपला मुलगा अभिषेकच्या ‘द्रोणा’ या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या म्हणाल्या, “हम यूपी के लोग हैं, हिंदीमें बात करना चाहेंगे। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ करें।”

त्यावेळी राजनी जया बच्चननाही टोला लगावला, “गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही! असं वक्तव्य केलेलं. 

३) “५० करोड़ की गर्लफ्रेंड”

ऑक्टोबर २०१२ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केली होती.  ‘वाह क्या गर्लफ्रेंड हैं? आपने कभी देखा है ५० करोड़ की गर्लफ्रेंड को? असं वक्तव्य सुनंदा पुष्कर यांना उद्देशून मोदींनी केलं होतं.

गुजरातसारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य आल्यामुळे मोदींवर बरीच टीका झाली होती.

४) “आयटम”

ऑक्टोबर २०२० मध्ये मध्य प्रदेश सरकारचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते कमलनाथ यांनी इमरती देवी यांचा ‘आयटम’ म्हणून उल्लेख केला. अर्थातच तेंव्हा या विधानावरून मोठा वादंग निर्माण झालेला. 

त्यावर कमलनाथ यांनी स्पष्टीकरण दिलेलं की, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर लिहिलेले असते की, आयटम नं. १, आयटम नं. २ इत्यादी. मला त्यावेळी त्यांचे (इमरती देवी ) यांचे नाव आठवले नाही त्यामुळे मी तो शब्द वापरला.  आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरलेलाच नाही.  आयटम या शब्दाचा वापर सर्वसामन्यपणे केला जातो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं.

५) जया प्रदा यांच्याबाबतचं ‘खाकी अंडरवेअर’चं वक्तव्य.

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी अभिनेत्री ते राजकारणी झालेल्या जया प्रदा यांच्यावर ‘खाकी अंडरवेअर’ ची टिप्पणी केली होती. एका रॅलीत आझम खान म्हणालेले की, “जिनको हमने रामपुर की गलियों में ऊँगली पकड़ कर चलना सिखाया, उन्हें आपको पहचानने में १७ साल लग गए, लेकिन मैं १७ दिन में पहचान गया था कि इनके नीचे का अंडरवियर खाकी रंग का है’

६) स्मृती इराणी या ‘नाचनेवाली सुंदरी’ आहेत. 

आझम खान यांनी तर स्मृती इराणींचं नाव पीएम मोदींसोबत जोडले तर कधी त्यांना नाचनेवाली सुंदरी म्हणून घाणेरडी टिप्पणी केली होती. 

७) “स्मृती इराणी तो टीव्ही पे ठुमके लगाती थी” 

डिसेंबर २०१२ मध्ये, काँग्रेस खासदार संजय निरुपम आणि भाजप खासदार स्मृती इराणी यांनी एकत्र टीव्ही चॅनलवरील डिबेटला हजेरी लावली होती. दोघे एकमेकांशी जोरदार वाद घालत असतांनाच निरुपम म्हणाले, “आप तो टीव्ही पे ठुमके लगाती थी, आज राजकीय विश्लेषक बन गई” अशा पद्धतीची कमेंट पास केलेली.

८) दयाशंकर सिंह यांनी मायावती यांची वेश्यासोबत केलेली तुलना.

भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. “एखादी वेश्यासुद्धा तिला पैसे दिल्यानंतर तिची वचनबद्धता पूर्ण करते. पण मायावती या पार्टीची तिकिटे वाटतांना जो कुणी सर्वात जास्त पैसे देईल त्याच इच्छुक उमेदवाराला तिकीट देतात”, असा त्यांनी आरोप केलेला 

९) प्रियांका गांधी वाड्रा म्हणजे काँग्रेसचा ‘चॉकलेट फेस’ आहेत.

२०१९ मध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसच्या ‘चॉकलेटी चेहरा’ आहेत म्हणूनच त्यांना निवडणुकीत उतरवलं अशा पद्धतीची लैंगिक टिप्पणी केलेली.

१०) मीनाक्षी नटराजन यांच्यावर ‘टंच माल’ अशी कमेंट. 

२०१३ मध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या सहाय्यक मीनाक्षी नटराजनला सेक्सिस्ट कॉम्प्लिमेंट दिलेली. ‘सौ तुंच माल’ हा शब्द उत्तर भारतात महिलांची छेड काढण्यासाठी वापरला जातो. त्याचा अर्थ थोडक्यात ‘कडक माल’ असा असतो. 

११) “फक्त श्रीमंत आणि आकर्षक असलेल्या महिलाच आयुष्यात पुढे जातात”

मुलायमसिंग यांनी २०१२ मध्ये महिला आरक्षण विधेयकावर आक्षेप घेत असं वक्तव्य केलेलं की, “बडे घर की लड़कियां और महिलाओं को फायदा मिलेगा. हमारी गांव की गरीब महिलाओं को नहीं. वो आकर्षक नहीं होती. बस इतना कहूंगा, ज्यादा नहीं”.

१२) “लडके लड़के हैं, गलती हो जाती है”

२०१४ मध्ये राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेला विरोध करत, “लडके लड़के हैं, गलती हो जाती है”, असं विधान केलेलं. त्यांचे सरकार असे बलात्कार विरोधी कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल असेही विधान त्यांनी त्यावेळेस केलेलं.

याशिवाय बांगड्याबाबतचं स्टेटमेंट राजकारणात कायमच ऐकायला मिळते.

फेब्रुवारी २०२० मधली गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शिवसेना मूग गिळून आहे. त्यांनी बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल केलेला.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं की, “मानसिकदृष्ट्या सर्वाधिक मजबूत असलेल्या महिला बांगड्या घालतात, हे लक्षात घ्या. त्याबाबतची तुमची मानसिकता बदला”आदित्य ठाकरेंनी दिलेल्या या प्रतिक्रियेचा विचार करायचा झाला तर, शिवसेना नेत्यांनी देखील अशी वक्तव्य केलेलीत.

जून २०२१ मध्ये संजय राऊतांनी, “सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली नाही. शिवसेनेने बांगड्या घातलेल्या नाहीत,  शिवसेना काय करू शकते हे लवकर दाखवू”, असं विधान पत्रकार परिषदेत केलेलं ज्यावर बऱ्याच टाळ्या पडल्या होत्या.

फेब्रुवारी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असे विधान केलेलं तेंव्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात भाजप विरोधात आंदोलन केलेलं त्या आंदोलनाचे समर्थन करताना गुलाबराव पाटील म्हणालेले कि, 

“शिवसेना म्हणून माझ्या पक्षावर टीका करत असेल तर मी बांगडी घालून बसलेलो नाही”, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिलेला.

तर जून २०२२ मधली गोष्टय, संजय राऊतांवर टीका करत खा. उदयनराजे भोसले यांनी, “आमच्याबद्दल कोण जर वाईट बोलले तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत”, असा इशारा दिलेला.

अलीकडेच ज्या वरून वादंग होतंय ते म्हणजे ‘राष्ट्रपत्नी’ हा शब्दच नाही तर, ‘५० करोड की गर्लफ्रेंड’, ‘आयटम’, ‘खाकी अंडरवेअर’ अश्या प्रकारची सर्व स्टेटमेंट पाहिलीत तर लक्षात येईल कि, कधीकाळी पुरूषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात आता महिलांचं नेतृत्व खपत नाही हे सर्वश्रुत आहे.  काळ बदलतोय मात्र राजकारण्यांची मानसिकता त्याच थराला राहिलीय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.