सारखे चर्चेत येणारे ब्रिजभूषण म्हणजे साधा माणूस नाही… मोठ्या मोठ्या प्रकरणात नाव आहे.

ब्रिजभूषण सिंह हे महाराष्ट्रातले राजकारणी नसले तरी आता त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आता नवीन राहिलं नाही. म्हणजे, विषय कुस्तीचा असो की मग राज ठाकरेंना विरोध करण्याचा. ब्रिजभुषण यांचं नाव महाराष्ट्रात गाजलंय.

१४  जानेवारीला पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल होती त्यासाठी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून खासदार ब्रिजभूषण सिंह पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीतच फायनल मॅच पार पडली.

त्याआधी ब्रिजभूषण यांचं नाव चर्चेत आलेलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधामुळं. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जाहीर झाल्यानंतर, ब्रिजभूषण यांनी, ‘राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेऊ देणार नाही. मनसे कार्यकर्त्यांना चोपून काढू’ अशी जाहीर धमकी दिली होती.

पुढं प्रकृतीचं कारण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अयोध्या दौऱ्याप्रमाणं ब्रिजभूषण सिंह यांचीही चर्चा थांबली होती.

आता मात्र त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झालाय. त्यामुळे, त्यांच्या विरोधात विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक असे अनेक कुस्तीपटू दिल्लीमधल्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करतायत.

याशिवाय, ब्रिजभूषण यांच्याकडून खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आरोपही करण्यात आलेत.

या सगळ्या घडामोडींमुळे ब्रिजभूषण सिंह यांची एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे ती म्हणजे त्यांचा इतिहास.

तब्बल सहा वेळा खासदार, आपल्या मतदारसंघावर प्रचंड प्रभाव, देशाच्या कुस्ती प्रशासनावर वर्चस्व, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध या मुद्द्यांच्या आधीही ब्रिजभूषण यांचं नाव गाजलं होतं ते त्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळं. ज्या कनेक्शनची सुरुवात दाऊद-गवळी टोळीयुद्धापासून होते. पण ब्रिजभूषण लहानपणापासूनच दबंग बनले होते.

कौटुंबिक वादामधून त्यांच्या चार भावांचा मृत्यू झाला होता, लहानवयात ब्रिजभूषण यांच्यावरही अनेकदा हल्ले झाले. पुढं ते पैलवान झाले आणि कॉलेजमध्ये असताना त्यांनी एका तरुणीला छेडणाऱ्या मुलांना मारहाणही केली होती. त्यानंतर युवानेते, बाहुबली नेते आणि उत्तर प्रदेश भाजपमधलं महत्त्वाचं नाव असा प्रवास त्यांनी केला.

ब्रिजभूषण यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सगळ्यात जात काय गाजलं असेल, तर ते त्यांचं दाऊदशी असलेलं कनेक्शन

१९९२ ची गोष्ट आहे. मुंबईतलं टोळीयुद्ध शिगेला पोहोचलं होतं. दाऊद आणि अरूण गवळी टोळीत चकमकी घडत होत्या. अशातच गवळी टोळीनं दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नवऱ्याचा खून केला. दाऊदनं याचा बदला घ्यायचं ठरवलं. पण हसीनाच्या नवऱ्याला मारणारे शूटर्स जे. जे. रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळं बदला घेणं कठीण होतं.

शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे हे दोन मारेकरी जेजेत होते, दाऊदच्या टोळीनं प्लॅन आखला. बच्ची पांडे आणि सुभाषसिंग ठाकूर या नेमबाजांना भाड्यानं घेण्यात आलं. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये पहिल्यांदाच ‘कलाशनिकोव्ह’ रायफल या हल्ल्यात वापरण्यात आली. या हल्ल्यात शैलेश हळदणकरचा मृत्यू झाला आणि काही पोलिसही जखमी झाले.

गजबजलेल्या हॉस्पिटलमध्ये शूटर्स घुसून गोळीबार करतात आणि सहीसलामत पळूनही जातात, यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पुढं असं समोर आलं की, केंद्रीय मंत्री कल्पनाथ राय आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी या गुन्ह्यातल्या मारेकऱ्यांना आणि मास्टरमाईंड ब्रिजेश सिंगला आश्रय दिला आणि पळून जाण्यातही मदत केली होती. पुढे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली, ब्रिजभूषण यांच्यावर टाडा लागला आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये झाली. मात्र नंतर कोर्टानं त्यांना निर्दोष घोषित केलं आणि त्यांना क्लीनचिट मिळाली. 

याच प्रकरणात आरोपी असलेले ब्रिजभूषण यांचे राजकीय गुरु कल्पनाथ राय यांना मात्र १० वर्षांची जेल झाली.

दाऊदशी कनेक्शन असूनही ब्रिजभूषण यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली, यामागे त्यांचे तगडे राजकीय संबंध असल्याचीही चर्चा झाली होती.

बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा सगळ्यात पहिली अटक ब्रिजभूषण यांना झाली होती. या घडामोडींवेळी त्यांचे आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे संबंध जिव्हाळ्याचे झाले. ब्रिजभूषण जेलमध्ये असताना देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना एक पत्र लिहून, ‘जामिनासाठी नव्यानं प्रयत्न करु’ असा संदेशही दिला होता.

पुढे बाबरी पाडण्याच्या आरोपांमधूनही ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता झाली.

एवढंच नाही तर ब्रिजभूषण यांनी एका खुनाची जाहीर कबुली दिली होती. ब्रिजभूषण एकदा आपल्या व्यावसायिक सहकाऱ्यासोबत एका ठिकाणी गेले होते, तिथं त्यांची बोलणी फिस्कटली आणि त्यांच्या सहकाऱ्यावर गोळीबार झाला. ब्रिजभूषण यांनी मागचा पुढचा विचार न करता, गोळीबार करणाऱ्या माणसाचा जीव घेतला. 

याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण स्वसंरक्षणातून खून केल्याचा युक्तीवाद करत ब्रिजभूषण यांची मुक्तता झाली. पंडित सिंह या एकेकाळचा राजकीय शत्रू असणाऱ्या नेत्यावर गोळीबार करण्याचा आरोपही ब्रिजभूषण यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणात असलेलं बाहुबली नेत्यांचं प्रस्थ ब्रिजभूषण यांनी कायम ठेवलं. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असणाऱ्या ब्रिजभूषण यांनी एका पैलवानाला भर स्टेजवरच थोबाडीत मारली होती. तब्बल सहा वेळा ते खासदार झालेत, तेही गंभीर गुन्हे अंगावर असताना. 

त्यांचं दाऊदशी असलेलं कनेक्शन आणि अटलबिहारी व अडवाणींसारख्या मोठ्या नेत्यांशी असलेली जवळीक कायम चर्चेत राहिली. मुंबईच्या अंडरवर्ल्डपासून उत्तरप्रदेशच्या गौंडापर्यंत त्यांचं ‘डॉन’ असणं गाजलं हेही तितकंच खरं.

Leave A Reply

Your email address will not be published.