भारताच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा धक्का सहन न झाल्यामुळे या फिल्मस्टारचा मृत्यू झाला

१३ मार्च १९९६. भारत Vs श्रीलंका. वर्ल्ड कपची सेमी-फायनल.

१ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणारं, कोलकात्याच्या ईडन-गार्डन्सचं मैदान. भारत अर्थातच फेवरीट. कप्तान अझरने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण लंकेने या वर्ल्डकप मध्ये चेस करून अनेक सामने जिंकले होते.

भारतावर अपेक्षेचं ओझं होत, त्या मानाने जास्त आत्मविश्वासपूर्ण असलेली रणतुंगाची टीम सामना जिंकायचा म्हणून मैदानात उतरली. पण संपुर्ण वर्ल्डकपमध्ये सुरवातीच्या ओव्हर मध्ये प्रचंड फटकेबाजी करणाऱ्या जयसूर्या-कालूविथूर्णा जोडीला जवागल श्रीनाथनं स्वस्तात घरी पाठवलं.

या २ विकेट्स मिळवून अर्धी मॅच भारताने इथंच जिंकली होती. श्रीलंका १ रन २ विकेटस. त्यानंतर अरविंद डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांच्या शानदार फिफ्टीज आणि अर्जुन रणतुंगा आणि हसन तिलकरत्ने यांच्या छोट्या पण उपयुक्त इनिंग्जच्या जोरावर श्रीलंकेचं भारतासमोर २५२ रन्सचं टार्गेट केलं.

२५२ रन्स चेस करायला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात जेमतेमच झाली होती. सचिन तेंडूलकर सोबत ओपनिंगला आलेला नवज्योतसिंग सिद्धू संघाचा स्कोअर ८ रन्स असतानाच भोपळाही न फोडता पॅव्हेलीअनमध्ये परत आला. त्यानंतर मात्र सचिनने संजय मांजरेकरला सोबत घेऊन डाव सावरला.

६५ रन्सवर खेळणाऱ्या सचिनची विकेट पडली त्यावेळचा भारताचा स्कोअर ९८ रन्सवर २ विकेट.

Screenshot 1
Youtube

भारत सहज विजयाकडे वाटचाल करतोय असं दिसत असतानाच पीचने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. पिचवर बॉलला एक्स्ट्रा टर्न मिळू लागला. सचिनची विकेट काय पडली भारताचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला सुरुवात झाली. जशा भारतीय विकेट्स पडत होत्या तशी प्रेक्षकांमधील अस्वस्थता वाढत चाललेली. एक स्टेज तर अशी आली की,

९८ रन्सवर २ विकेट्स असणाऱ्या भारतीय संघाची अवस्था १२० रन्सवर ८ विकेट्स अशी झाली. 

विनोद कांबळी आणि अनिल कुंबळे मैदानात होते. प्रेक्षकांनी गोंधळ घालायला आणि मैदानात बॉटल फेकायला सुरुवात केली. मैदानात जाळपोळही करण्यात आली. ही गोष्ट ज्यावेळी श्रीलंकन कर्णधार अर्जुना रणतुंगाने फिल्डवरील अंपायरच्या लक्षात आणून दिली, त्यावेळी खेळ थांबविण्यात आला.

अशा स्थितीत मॅच रेफ्री क्लाइव्ह लॉइड यांचा निर्णय आला.

जे क्रिकेटच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं अशा घटनेचं ईडन गार्डन्स साक्ष ठरलं. प्रेक्षकांच्या गोंधळामुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.

१९८३ नंतर वर्ल्डकप जिंकण्याच्या भारतीय संघाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. त्यावेळी मैदानावर असणारा विनोद कांबळी तर पॅव्हेलीयनमध्ये परतताना अक्षरशः ढसाढसा रडला होता. हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. ईडन-गार्डन्सवरील प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमूळे भारतीय क्रिकेटची जगभरात छी-थू झाली. भारतीय क्रिकेटची मान शरमेने खाली गेली.

फक्त मैदानातच नाही तर टीव्ही वर ही मॅच बघत असलेल्या अनेकांना धक्का बसला होता. यातच होते सिनेअभिनेते शफी इनामदार.

शफी इनामदार मूळचे कोकणातल्या दापोलीचे. त्यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईत झालं. शाळेत असतानाच वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचे. यातूनच ते  नाटकाकडे ओढले गेले. केसी कॉलेजमध्ये गेल्यावर हौशी नाटकांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. त्याकाळचे गाजलेले गुजराती नाटककार प्रवीण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शफी इनामदार यांनी नाट्यअभिनयाचे, दिग्दर्शनाचे धडे गिरवले.

सत्तरच्या दशकात त्यांनी जवळपास ३१ नाटकांमध्ये काम केलं. यात मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा सर्व नाटकांचा समावेश होता. पृथ्वी थिएटरच्या स्थापनेपासून त्यांनी तिथे नाटके दिग्दर्शित करायला सुरवात केली. भारतीय नाट्यक्षेत्रात एक महत्वाचं नाव म्हणून शफी इनामदार चर्चेत आले.

दिसायला देखणा उंचपुर्या व्यक्तिमत्वाच्या शफी यांना सिनेमाचे ऑफर येऊ लागले. त्यांनी साइन केलेला पहिला सिनेमा म्हणजे गोविंद निहलानी यांचा विजेता. पृथ्वी थिएटरचे शशी कपूर या सिनेमाचे निर्माते होते, त्यांच्या आग्रहामुळेच शफीने या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्यांचा छोटासा रोल होता पण विंग कमांडर पारुळकर म्हणून ते अनेक सिने रसिकांना लक्षात राहिले. निहलानींच्या अर्ध सत्य सिनेमात देखील त्यांना इन्स्पेक्टर हैदर अलीचा महत्वाचा रोल होता.

शफी इनामदार यांच्या करियरसाठी ब्रेकथ्रू ठरली दूरदर्शन वरील ये जो है जिंदगी सिरीयल.

एका छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबात दरोज घडणाऱ्या गंमती जंमतीवरील हि हलकी फुलकी सिरीयल दूरदर्शनवर तुफान गाजली. यात प्रमुख भूमिका करणाऱ्या शफी इनामदार यांचा चेहरा घराघरात पोहचला. त्यांना ओळख मिळाली. फक्त सिरीयस भूमिका नाही तर हलका फुलका विनोद देखील ते तेवढ्याच दमदार पणे निभावू शकतात हे सिद्ध झालं.

या पाठोपाठ इन्कलाब,अर्जुन, सागर, डिस्को ८६ वगैरे गाजलेल्या सिनेमात ते चमकले. त्यांना खलनायकी भूमिका देखील मिळू लागल्या. पण त्यातही करप्ट पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत शफी इनामदार यांना टाईप कास्ट करण्यात आले. घायल, इन्साफ, फुल बने अंगारे, नरसिम्हा, क्रांतिवीर अशा अनेक सिनेमामधून सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत ते दिसत राहिले.

दरम्यानच्या काळात मराठी नाट्यक्षेत्रातील दमदार अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. नाट्य अभिनयातील पॉवर कपल म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.

शफी इनामदार हे क्रिकेटचे शौकीन होते. भारताचे सामने ते आवर्जून पाहायचे. त्या दिवशी भारत श्रीलंका वर्ल्ड सेमी फायनल पाहताना त्यांना सुद्धा भारत जिंकेल असं वाटत होतं. पण सचिन आउट झाल्यावर झालेली आपल्या टीमची दयनीयअवस्था त्यांना सहन झाली नाही. याच पराभवाच्या धक्क्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.

नाना पाटेकर सोबतच्या यशवंतमध्ये शफी इनामदार यांनी साकारलेला वकील आजही अनेकांच्या लक्षात असेल. दुर्दैवाने हाच सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. एका क्रिकेट मॅचच्या पराभवामुळे भारतीय सिनेमासृष्टी आपल्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला गमावून बसली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.