गोष्ट सिनेसृष्टीत पडद्याआड असल्याने जनमानसात परिचित नसलेल्या मातृत्वाची.

सकाळी रणजित ची मातृत्वाबद्दलची पोस्ट वाचली आणि असा विचार करणारे अजून आहेत हे बघून हायसं वाटलं. आई कुणाला म्हणावं याबाबतीत आपल्याकडे अगदीच सोवळ्यातल्या व्याख्या आहेत. बायोलॉजिकल मदर आणि अपत्य ह्या मर्यादित परिघाचं इतकं अवडंबर केलं जातं की अपत्याला जन्म न देता त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करून मातृत्व/पितृत्व कमावणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक केली जाते. दुपारी सांगितली ती सगळी पात्रं पडद्यावरील होती.

आता सांगतोय ती गोष्ट आहे सिनेसृष्टीत पडद्याआड असल्याने जनमानसात परिचित नसलेल्या मातृत्वाबद्दल. 

शगुफ्ता रफिक हे नाव हिट सिनेमे देणारी स्त्री लेखिका म्हणून सिनेसृष्टीत परिचित असलं तरी ते एका विशिष्ट वर्तुळात वेगळ्या कारणांसाठी कुजबुजत असतं. शगुफ्ता सांगते की तिला बहुतेक फिल्म निर्माते यासाठी बोलवतात की त्यांना बघायचं असतं की पूर्वाश्रमीची वेश्या आता कशी दिसत असेल !

त्यांना अपेक्षित असलेलं शरीरसौष्ठव तिच्याकडे नाही हे बघून काहींचा भ्रमनिरास होतो आणि फिल्मसाठीची बोलणी कोलमडतात. वयाच्या 12 व्या वर्षीपासून बार डान्सर, अनोळखी पुरुषासोबत मोडलेली व्हर्जिनीटी, काही वर्ष एका श्रीमंत व्यक्तीची ‘ठेवलेली बाई’, एकाने झिरकाडलं की दुसरा पुरुष हे चक्र…

पुढे जाऊन वयाच्या 27 व्या वर्षापर्यंत वेश्याव्यवसाय, आपली खरी आई कोण यावरून लोकांनी कायम दिलेली हीन वागणूक, लहान वयापासून असणारा आयडींटिटी क्रायसिस आणि सरतेशेवटी महेश भट ने दिलेल्या ब्रेक मुळे पटकथा-संवाद लेखक म्हणून मिळवलेलं नाव…

ह्या प्रवासातील टप्पे मात्र नैतिकतेचा चष्मा लावून आपण जज करू शकत नाही इतके गुंतागुंतीचे आहेत. 

अनाथ असल्याने शगुफ्ता ला आपली जन्मदाती आई कोण हे माहिती नाहीये. 50s च्या दशकातील अभिनेत्री अनवरी बेगम यांनी तिला दत्तक घेऊन वाढवलं. स्वतःच्या जन्माची 3 वेगवेगळी व्हर्जन शगुफ्ताला लोकांकडून ऐकायला मिळाली. ‘तुझी आई एका श्रीमंत बॅरिस्टर माणसासोबत पळून गेल्याने त्यांच्या अनैतिक संबंधातून तुझा जन्म झालेला आहे’ ही पहिली थियरी. ‘जवळच्याच झोपडपट्टीतील एका जोडप्याने तुला अनवरी बेगम च्या पायथ्याशी टाकून गेले’ही दुसरी अफवा. तर सगळ्यात प्रचलित अफवा ज्याने तिला आयुष्यभर छळलं आणि शाळा सोडण्यात भाग पाडलं ती अशी की,

‘शगुफ्ता तिच्या सावत्र बहिणीची (म्हणजेच अनवरी बेगम ची मुलगी सईदा खान ची) मुलगी आहे, ज्या बहिणीचं फिल्म प्रोड्युसर ब्रिज सदाना सोबत लग्न होण्याआधी एका व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तिचा जन्म झालेला आहे!’ छोटी शगुफ्ता जेव्हा तिच्या आईसोबत म्हणजे अनवरी बेगम सोबत बाहेर जात असे तेव्हा तिला लोक चिडवत ‘आजी सोबत कुठे चाललीये?’

ऐन समृद्धीच्या काळात बेगम यांनी आपल्या सख्ख्या मुलीला दिलं तेच सगळं शगुफ्ता ला दिलेलं. त्या काळी सिनेमा म्हणजे प्रचंड ग्लॅमर आणि बक्कळ पैसा हे समीकरण रूढ झालेलं नव्हतं. यशाच्या शिखरावर असणाऱ्या अनेक कलाकारांनी उतारवयात हलाखीचे दिवस पाहिले आहेत. त्यात अनवरी बेगम म्हणजे कुणी आघाडीची अभिनेत्री नव्हती. सगळेच दिवस कुठे सारखे असतात. अनवरी बेगमला वय सरत गेलं तसं निष्कांचन अवस्थेत जगावं लागलं. आता परतफेडीची वेळ शगुफ्ताची होती.

आईच्या आग्रहामुळे रीतसर कथक चं प्रशिक्षण आधीच झालेलं होतं. कुठल्या कला कोणत्या काळात उपयोगात येतील याला काही नियम नाही. शगुफ्ता एका प्रायव्हेट पार्टी मध्ये डान्सर म्हणून तिथल्या लोकांसमोर आली तेव्हा तिचं वय होतं 12 वर्ष !

उच्चभ्रू वस्तीत कोठ्यासारखं असणाऱ्या वातावरणात तिथे श्रीमंत लोकं, मंत्री, पोलिस, इन्कम टॅक्स ऑफिसर्स रोज वेगवेगळ्या बायांना घेऊन येत. नाचून झाल्यावर शगुफ्ता बाजूला काढून ठेवलेली ओढणी कमरेला बांधून घेत आणि त्यात पैसे गोळा करत. चूक-बरोबर यापलीकडे जाऊन स्वतःच्या आईला तिला ते सगळं सुख पुरवायचं होतं जे मिळू शकत नव्हतं. वयाच्या 17व्या वर्षात वेश्याव्यवसायात उतरली तेव्हा नैराश्याने ड्रग्स, दारूच्या आहारी जाणं अगदीच सहज शक्य होतं. पण आईच्या आणि बहिणीच्या आपल्यावर असणाऱ्या प्रेमाने ते दिवस तारले असं शगुफ्ता सांगते. एकेकाळी गर्भश्रीमंत असणाऱ्या आईने हातातल्या बांगड्या, घरातील भांडी विकून दिवस ढकलते हे वयात येऊ बघणाऱ्या शगुफ्ता ला झेपत नव्हतं.

तिने वेश्याव्यवसाय पत्करला हे अनवरी बेगम ला माहिती होतं हे विशेष!

‘जगातल्या सगळ्या आया सारख्याच महान असतात’ अशी सरळसोट आईपणाच्या व्याख्या करणाऱ्याना हे झेपणं अजिबात शक्य नाहीये हे माहितीये.

27 व्या वर्षी तिला कुणीतरी सांगितलं की दुबई मध्ये बार डांसर ला इथल्या पेक्षा 10 पट जास्त कमाई आहे. दुबई ला गेल्यावर भरपूर पैसे मिळत असल्याने वेश्याव्यवसायापासून ती कटाक्षाने लांब राहिली. तिथे बार मध्ये लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी गायला तिला देखील असे. (शगुफ्ता ने लिहिलेल्या ‘आशिकी 2’ मध्ये श्रद्धा कपूर बार मध्ये गाणं गाताना दाखवली आहे, तेव्हा तिथे लता मंगेशकर ची मोठी फ्रेम मागे लावलेली असते!) दरम्यान आई अनवरी बेगम ला कॅन्सर असल्याचं निदान झालं अन तिला दुबई सोडून मुंबईत परत यावं लागलं.

1999 साली आईचं निधन झाल्याने शगुफ्ता ला आपल्या आयुष्याची पुनर्मांडणी करावी वाटली. लहान वयापासून पाहत आलेलं जग तिला शब्दात उतरवावं वाटत होतं. 2002 साली महेश भट सोबत भेट झाली आणि पुढचं आयुष्य पार बदलून गेलं. महेश भट हे स्वतः अवैध अपत्य असल्याने शगुफ्ता आणि त्यांचा भूतकाळ बराच सारखा होता. (दोघांची जन्मतारीख एक आहे हा योगायोग). शगुफ्तात धुसमुसत असेलला राग, चीड, संताप यासोबत भट रिलेट करू शकत होते. 2005 च्या कलयुग साठी 2 सिन लिहिण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर ‘वो लम्हे’ पासून सुरू झालेला स्वतंत्र पटकथा-संवाद लेखक म्हणून सुरू झालेला प्रवास अचंबित करणारा आहे. (कलयुग मध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग, पॉर्न वेबसाईट आणि त्यासंलग्न चालणाऱ्या या यंत्रणेचं चित्रण आहे)

शगुफ्ता ने आजवर लिहिलेल्या 17 पैकी 15 फिल्म ह्या महेश भट्ट च्या विशेष फिल्म्स च्या बॅनरसाठी लिहिलेल्या आहेत. यात वो लम्हे, आवारापन, राज़ 2, मर्डर 2, जन्नत 2, आशिकी 2, राज़ 3 ह्या महत्वाच्या फिल्म्स आहेत. शगुफ्ता च्या सिनेमाचं डीसेक्शन करायला घेतलं तर एक गोष्ट लक्षात येईल की यातल्या बऱ्याच फिल्म हॉलीवूडच्या कुठल्या ना कुठल्या फिल्मवर स्पष्टपणे बेतलेल्या आहेत (ज्यासाठी महेश भट चा मागणी तसा पुरवठा हा फॉर्म्युला जबाबदार आहे). तरीही त्यात असणारा स्ट्रॉंग इमोशनल कनेक्ट त्यांचा USP आहे.

‘वो लम्हे’ माझ्या अत्यंत आवडत्या आणि जवळच्या फिल्म पैकी एक आहे. उमलत्या वयात घराची आणि आईची जबाबदारी अंगावर आल्याने शगुफ्ताने समाज लादत आलेल्या मोरॅलिटी च्या संकल्पना कधीच धुडकावून टाकलेल्या आहेत. तिच्यासारखीच रुटेड पात्रे तिच्या सिनेमात देखील दिसतात.

‘वो लम्हे’ मध्ये नायिकेला अनेक वर्ष वापरून घेणारा तिचा बॉयफ्रेंड आहे. आपल्या मुलीवर लोकांनी लावलेले पैसे वाया जाऊ नये म्हणून तिला शॉक ट्रीटमेंट देण्यासाठी डॉक्टर ला होकार कळवणारी ‘आई’ आहे. नायिकेच्या आईला हतबल होऊन खडसावता नायक म्हणतो की ‘तुम्ही जगातील पहिल्या आई आहात, ज्या आपल्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी इतरांना प्रवृत्त करत आहात.’

नकळत्या वयात अंगावर घरची जबाबदारी पडल्याने आधी ‘बार डान्सर’, काही वर्ष एका श्रीमंत व्यक्तीची ‘ठेवलेली बाई’, आणि वयाच्या 17व्या वर्षांपासून 27व्या वर्षापर्यंत वेश्याव्यवसायात असलेल्या शगुफ्ता ने ह्या ओळी लिहिल्या तेव्हा त्याचे आयाम सोवळ्या चौकटीत बसणारे नसतात. शगुफ्ता ने लिहिलेल्या ‘जश्न’ सिनेमात अशीच एक बहीण दाखवली आहे, जी भावाचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते, प्रत्यक्षात मात्र ती स्वतःच एका बड्या माणसाची रखेल असते. ‘आशिकी 2’ मध्ये नायिकेची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची दाखवली आहे. घरच्यांना जमेल तसं स्वतःच्या परीने सांभाळण्यासाठी ती नायिका बार मध्ये गाणी गायचं काम करते. नंतर पुढे जे काही करते ते सुद्धा बरच काही निव्वळ पैसे मिळतील या हेतूने. ‘

राज 2′ हा सिनेमा हॉरर प्रकारात मोडणारा असून सुद्धा त्याचं तत्व संत कबीर च्या ‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलया कोय; जो मन खोजा अपना, ते मुझसे बुरा न कोय’ ह्या पंक्तीवर आधारलेला आहे. पैशाच्या हव्यासापायी केलेली कृत्ये कशी मानगुटीवर बसून राहतात हे टिपिकल बॉलीवूडच्या चौकटीत फार सुरेख बसवलं आहे. 

‘आवारापण’ हा खरं प्रेम काय असतं ते समजल्याने असामान्य आयुष्य जगण्याचं स्वप्न बघणाऱ्या वर्गासाठी कल्ट स्थान पटकावून आहे. आपलं अत्यंत गढूळ आणि गचाळ आयुष्य मागे टाकून जे स्वतःला मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं यासाठी धडपडणारा नायक यात दिसतो. काहीही संबंध नसलेल्या अनोळख्या स्त्रीला वेश्याव्यवसायात ढकलले जाऊ नये म्हणून हा नायक स्वतःचं आयुष्य उध्वस्त करून टाकतो.

‘एक मजलूम को आज़ाद करने का मतलब है सारी इंसानियत को आज़ाद करना। जिनके अपने सपने पूरे नहीं होते ना. वो दूसरों के सपने पूरे करते है। मुझे जन्नत में जगह नहीं चाहिए, मैं बस इस लड़की को जहन्नुम से बचाने आया हूँ!’ हा संवाद जेव्हा शगुफ्ता च्या लेखणीतून उतरतो तेव्हा त्याचे मायने हे नैतिक-अनैतिकतेच्या पलीकडले असतात.

शगुफ्ता 25 व्या वर्षी असताना तिच्या बहिणीची सईदाची पती ब्रिज सदाना ने गोळी झाडून हत्या केली. बायको मुलीसोबत त्याने स्वतःला देखील संपवलं. सईदा ने शगुफ्ता आपली मुलगी असल्याचं कधीच मान्य केलं नव्हतं. मात्र शगुफ्ताच्या प्रत्येक निर्णयात ती ठामपणे उभी राहिली आहे, प्रसंगी नवऱ्यासोबत भांडली आहे. बहीण म्हणून अपेक्षित असते त्यावर जाऊन तिने साथ दिलेली आहे. अनवरी बेगम ने एक दिवस अगदी शांतपणे सांगितलं की कुणी जर तुला विचारत असेल की ‘सईदा तुझी आई होती का? तर ठामपणे सांगायचं. हो. होती. तुला तिने जीव लावला ना, तर होती ती तुझी आई!’

आपली खरी आई कोण याने तसा काहीच फरक पडत नाही हे शगुफ्ता ला आता कळून चुकलंय. अनाथ मुलीला उचलून मोठं करणारी अनवरी बेगम, सावत्र बहिणीला जीव लावणारी सईदा आणि नकळत्या वयापासून निराधार आईची जबाबदारी सांभाळताना स्वतःच आई झालेली शगुफ्ता या तिघींच्या आयुष्यात विजेसारखे चमकणारे मोजके का होईना ममत्वाचे क्षण जेव्हा जेव्हा आले, तिथे मातृत्व पूर्णत्वास आलेलं असतं.

शगुफ्ता, तिच्या अनाम आयांना आणि तिच्या सिनेमात असलेल्या तिच्यासारख्याच अनअपोलोजेटीक पात्रांना मातृदिनाच्या शुभेच्छा. 

  •  जितेंद्र घाटगे. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. AMAR POWAR says

    जीतू एकच इच्छा आहे रे, तुला कडकडून मिठी मारायचीय !

Leave A Reply

Your email address will not be published.