शाहीद आफ्रिदीनं सचिनची बॅट वापरून वेगवान शतक झळकावलं होतं…? 

४ ऑक्टोबर १९९६. 

नैरोबी येथील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा धडाकेबाज बॅटसमन शाहिद आफ्रिदी याने आपल्या आयुष्यातील कदाचित सर्वोत्तम इनिंग खेळताना फक्त ३७ बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं.

या मॅचमध्ये आफ्रिदीने ४० बॉल्समध्ये १०२ रन्स काढताना ६ फोर आणि ११ सिक्सर्सचा पाऊस पाडला होता. 

त्याकाळात वन-डे क्रिकेट आजच्याइतकं वेगवान नव्हतं, त्यामुळे आफ्रिदीच्या या शतकाने तो विध्वंसक क्रिकेटर म्हणून जागतिक क्रिकेटच्या क्षितिजावर ओळखला जायला लागला होता. शिवाय टी-ट्वेंटीचं आगमन झाल्यानंतरही आफ्रिदीचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम मोडीत निघायलं २०१४ साल उजाडायला लागलं होतं. 

२०१४ सालच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात ३६ बॉल्स मध्येच शतक झळकावून आफ्रिदीचा हा विश्वविक्रम मोडीत काढला. पण त्याच्या नावावर हा विक्रम फक्त वर्षभरासाठीच राहिला. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक बॅटसमन ए.बी. डिव्हीलिअर्स याने वेस्ट इंडीजचीच बॉलिंग फोडून काढताना अवघ्या ३१ बॉल्समध्येच  शतक झळकवलं आणि हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. जो अद्यापपर्यंत तरी त्याच्याच नावावर आहे. 

आफ्रिदीच्या वेगवान शतकासंदर्भात एक किस्सा मध्यंतरी इंटरनेटच्या मायाजालात वाचण्यात आला की हे शतक आफ्रिदीने सचिनची बॅट वापरून झळकावलं होतं.

म्हणून मग आम्ही उत्सुकतेपोटी अजून उत्खनन केलं आणि शोधून काढलं की खरंच असं काही झालं होतं की हा सुद्धा व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीमधून पसरवण्यात आलेला किस्सा आहे..? 

आमच्या उत्खननात आम्हाला जे सापडलं त्यानुसार हा किस्सा अगदी खरा आहे. खुद्द शाहीद आफ्रिदी यानेच एका मुलाखतीमध्ये तशी कबुली दिलीये. 

नेमका किस्सा काय आहे आणि सचिनने आफ्रिदीला बॅट का दिली..? 

आफ्रिदीने आपल्या मुलाखतीत जे सांगितलं त्यानुसार पाकिस्तानातील सियालकोट येथून आपल्यासाठी काही नवीन बॅट बनवण्यासाठी सचिनने आपली बॅट वकार युनुसला दिली होती. आफ्रिदीच्या मते भारतीय खेळाडूंना पाकिस्तानातील लाकडापासून बनवलेल्या बॅट जास्त आवडतात आणि पाकिस्तानी खेळाडूंना भारतात बनवण्यात आलेल्या बॅट जास्त आवडतात. 

सचिनने वकार युनुसला दिलेली ती बॅट वकारने आफ्रिदीला दिली आणि सांगितलं या बॅटने खेळ. आफ्रिदी सांगतो की बॅटचा बॅलन्स इतका चांगला होता की वकारने सांगितलं नसतं तरी मी त्या बॅटने खेळलो असतो. त्यामुळे सचिनच्या त्या बॅटने मी खेळलो आणि त्याच बॅटने तो विश्वविक्रम केला. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.