बापाचं नाव मोठ्ठं करणारा मुलगा..

शाहिद का कोण जाणे मला नाही आवडला कधीच. आपलं एखादा अभिनेता अभिनेत्री आवडण्याचं कारण हे केवळ चित्रपटापूरतं मर्यादित नसतं कधीच. अनेक पातळ्यांवर हे पसरत गेलेलं प्रतिबिंब असतं नायक नायिकांचं. शाहिद कधी पडद्याबाहेर लोकांशी connecting असा वाटलाच नाही. प्रियांका चोप्रा जशी फेक वाटते तसा शाहिद वाटत राहिलाय. अर्थात हे माझं perception ..

इतकं म्हणून सुद्धा एक गोष्ट या उपर राहील ती म्हणजे शाहिद हा बॉलीवूडच्या मिलेनियल्स पिढीमधला एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि नेहमीच राहील.

शाहीदला आजची जागा सहजासहजी मिळालेली नाहीये. मला अजूनही ताल मध्ये ऐश्वर्याच्या मागे तिला ड्रेप करणाऱ्या ज्युनिअर आर्टिस्ट शाहीदचा बऱ्यापैकी क्लोज कट आठवतोय. आर्यन्सच्या आँखोमें तेरा ही चेहरा मध्येही तो तेव्हा तरुण पिढीला आवडला होता. काही जाहिरातींमध्ये – (एकात तर तो शाहरुख बरोबर होता) चमकून मग शाहीदचा पहिला चित्रपट आला, “इश्क विष्क”.

म्युजिक व्हिडिओज दिग्दर्शित करणाऱ्या केन घोषचा हा सिनेमा आजही रिमेक होऊ शकेल असा ऑल टाईम रोमँटिक कँडी आहे.

शाहिद एक उत्तम नर्तक आहे, शामक दावरचा शिष्य आहे. अभिनयाचे धडे नसीर सर आणि सत्यदेव दुबेंसारख्या दिग्गज हस्तींकडे गिरवून पठ्ठ्या मैदानात उतरला होता. इष्क विष्क नंतर केन घोषचाच फिदा हा रोमँटिक थ्रिलर शाहीदचा अजून एक मस्त चित्रपट. इथेच त्याचं सूत करिनाशी जुळलं.

फिदा चांगला होता पण वेगळा असल्याने तेव्हा चालला नाही. त्यानंतर आलेला “ये दिल मांगे मोअर” सुद्धा छान romcom होता. पण काय होत होतं की शाहिद हा टीनेजर नायक होता आणि त्याचे सिनेमे हृतिक, शाहरुख समोर व्हाईट वॉश व्हायचे. त्यात शाहीदवर शाहरुखची नक्कल करण्याचा आरोप होत होता.

हा नंतरचा काळ शाहिद साठी थोडा कठीणच होता.

चणीने, चेहऱ्याने लहानखुरा असल्याने तो देवगणच्या शिखर मध्ये, अक्षय सुनीलच्या दिवाने हुए पागल मध्ये, सनीबाबाच्या फुल अँड फायनल मध्ये पोरगेलेसे रोल्स करत होता. टॅब्लॉइड्स मध्ये त्याचे आणि करिनाचे एम एम एस चघळले जात होते.

एकंदरीत शाहीदचं बस्तान नीट बसेल असं काही वाटत नव्हतं.

प्रियदर्शनचा ‘चूप चुपके’ आला आणि शाहीदचा एक सुंदर परफॉर्मन्स बघायला मिळाला. यात त्याची मैत्रीण करीनासुद्धा तेवढाच उत्तम रोल करताना पाहायला मिळाली. एव्हाना त्यांचं प्रेम प्रकरण संपुष्टात यायचं होतं.

आणि एखादी लव्ह स्टोरी संपावी तर ती जब वुई मेट सारखा नितांतसुंदर चित्रपट देऊन.

इम्तियाझ अलीचा हा सरप्राईज हिट आज एक क्लासिक झालाय. जरी करिनाच्या गीत ने जब वुई मध्ये फ्रंट फुटला धुआधार बॅटिंग केली असली तरी नॉन स्ट्रायकर एंडला शाहीदचा आदित्य कश्यप तितक्याच खंबीरपणे उभा आहे. इतका गोड शाहिद क्वचित इतर सिनेमात वाटला असेल.

जब वुई मेटने शाहीदला नवं स्थैर्य दिलं. इंडस्ट्री ते प्रेक्षक त्याच्याकडे आदराने पाहू लागले होते. तो आता कॉलेजचा नवथर तरुण नव्हता. तो कमीनेमधला गुड्डू होता आणि चार्ली सुद्धा. चार्लीच्या सदोष बोलीसाठी शाहिद स्पीच स्पेशालिस्टसना भेटला होता. पुढे मौसम साठी त्याने फायटर प्लेन चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलं म्हणे.

एकंदरीत शाहीदची गाडी व्यवस्थित रुळावर आली आणि धावू लागली. कमीने नंतर विशाल भारद्वाज बरोबर केलेला हैदर हा शाहीदसाठी एक मैलाचा दगड आहे. एकच शब्द. टेरिफिक.

अध्ये मध्ये त्याचे बरेच सिनेमे येऊन गेले. पण शाहीदला जेव्हा चांगला दिग्दर्शक भेटतो तेव्हा शाहिद चाबूक काम करतो हे हैदर नंतर उडता पंजाबने सिद्ध केलं. हे सगळे जड आणि विक्षिप्त रोल्स करताना एखादा आर राजकुमार किंवा फटा पोस्टर निकला हिरो करून बॉक्स ऑफिसला सुद्धा आपलं नाणं खणखणत ठेवलं.

हल्लीच्या कबीर सिंग मध्ये त्याचा परफॉर्मन्स हा विजय देवरकोंडाच्या ‘तुलनेत’ कुठेही कमी नाहीये. काय झालंय ना, आपण अर्जुन रेड्डी आधी पाहिला हे सांगायच्या नादात उगीच मग ह्या कबीर सिंग मध्ये दम नाही असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं.

मला तरी शाहीदचा कबीर एकदम भिडला. जीव ओतून काम केलेलं आहे त्याने. आणि या लॉट मधला तो असा एक अभिनेता आहे जो आपल्या पात्राची पार्श्वभूमी समजून होमवर्क करून सेटवर जातो.

मला जरी फारसा आवडत नसला तरी शाहीदला मी एका गोष्टीबद्दल नेहमीच थँक्स म्हणेन. त्याने हे जे यश कमावलं आहे ते बघून त्याचा सुपर टॅलेंटेड बाप, ज्याच्या नावाबरोबर कानाच्या पाळीला हात लावावा, पण ज्याच्या अभिनयाचं म्हणावं तितकं कौतुक किंवा लोकाश्रय मिळालेला नाही असा पंकज कपूर मात्र नक्की सुखावला असेल. बाप से बेटा सवाई निघावा असं कुठल्या बापाला वाटणार नाही?

  • गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.