‘महाराष्ट्र’ शब्दावरून बंदी आली पण शाहिर साबळेंनीच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ अजरामर केलं..

तो काळ होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. मुंबईसह महाराष्ट्र मिळावा अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांमुळे तेव्हा वातावरण चांगलंच पेटलेलं होतं. महाराष्ट्रात तेव्हा जनजागृती करायचं एक महत्त्वाचं माध्यम होतं रेडिओ. तेव्हा वयाच्या पंचविशी-तिशीत असणारा एक तरुण रेडिओवर लाईव्ह प्रोग्रॅम करायचा. त्याचं नाव शाहीर कृष्णराव साबळे.

त्या काळात चळवळ मुंबईमध्ये जोर धरत होती.

तेव्हा मद्रासवरून मराठीचा गंधही नसलेला एक अधिकारी रेडिओमध्ये रुजू झाला. त्याला दिल्लीवरून असे आदेश दिले होते की रेडिओवर सादर होणाऱ्या प्रोग्रॅममध्ये ‘महाराष्ट्र’ हा शब्द असता काम नये आणि त्याच काटेकोरपणे त्याकडे लक्ष असायचं. त्यादरम्यान शिवजयंती आली आणि शाहिरांना पोवाडा गाण्यासाठी बोलवण्यात आलं. तो पोवाडा होता भानुमती साबळे यांनी लिहिलेला

महाराष्ट्र भुमी बहुगुणी शोभते खणीकीती नरमणी,

संत जन्मले हिच्या कुसव्यात,

शारदा भक्त शोभती खास कलेची नीत्य नवी आरास।

त्यात ‘महाराष्ट्र’ हा शब्द खूप वेळा येत होता त्यामुळे तो शब्द नसलेलंच कडवं गायची परवानगी शाहिरांना मिळाली. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना हा शब्द आलाच आणि अधिकारी चांगलाच पेटला.

‘आता महाराजांचा जन्म कुठे झाला म्हणून सांगायचं? दिल्ली की कलकत्ता? महाराष्ट्रात जन्मलेत तर महाराष्ट्रच म्हणणार ना?’

अशा शब्दात शाहिरांनी जबाब दिला आणि त्यांना रेडिओतून ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. त्यांचा हा जबाब ऐकून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं. उगाच त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची तोफ म्हणत नव्हते. त्यांच्या या जबाबाने संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान कमी झालं नाही तर उलट वाढलं.

पुढे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच आनंदात शाहिरांच्या आवाजात एक खणखणीत गाणं दुमदुमलं. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’.

शाहीर साबळे यांचा बुलंद आवाज लाभलेलं हे गाणं नेमकं कसं तयार झालं याची गोष्ट सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

जसं आपण वर म्हटलं दिवस होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती आणि याच आनंदाप्रित्यर्थ एचएमव्ही कंपनीने गाण्याची रेकॉर्ड बनवायची मोठी जबाबदारी श्रीनिवास खळे यांच्यावर सोपवली. श्रीनिवास यांना या रेकॉर्डसाठी दोन गाणी हवी होती.

त्यात एक गाणं होतं चकोर आजगावकरांकडे असलेलं `महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान. पण खळेंना दुसरं गाणं मिळत नव्हतं. शेवटी त्यांना कविवर्य राजा बढे हा पर्याय योग्य वाटला आणि कविवर्यांना महाराष्ट्र गीत लिहण्याची विनंती केली. राजा बढेंना नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. त्यांनी अक्षरशः दिवसरात्र एक करून अवघ्या दीड दिवसात महाराष्ट्र गीत लिहून दिलं. त्याचे शब्द होते,

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीम थडीच्या तट्टांना या, यमुनेचे पाणी पाजा
।। जय जय महाराष्ट्र माझा ।।

शाहीर कृष्णराव साबळे यांनी हे सळसळतं गीत गायलं. पण या गाण्यासाठी कंपनीला वेगळा गायक हवा होता.

खळेंनी मात्र शाहिरांचं नाव लावून धरलं आणि कंपनीला नकार देता आला नाही. पण प्रश्न होता एवढ्या कमी दिवसात तालीम करून शाहीर हे गाणं कसं गाणार? तेव्हा दादरच्या हिंदू कॉलनीत किंग जॉर्ज शाळेच्या आवारात ‘यमराज्यात एक दिवस’ या लोकनाट्याचे प्रयोग सुरु होते. तिथे शाहीर साबळे आणि श्रीनिवास खळे यांची भेट झाली.

पण शाहिरांनी हे गाणं त्यांना देण्याऐवजी शाहीर अमर शेख यांना द्यावं असं सुचवलं.

अमर शेख हे या गाण्यासाठी योग्य पर्याय आहेत असं शाहिरांना वाटत होतं. पण खळेंनी त्यांचंच नाव डोक्यात ठेवलं असल्याने शाहिरांनी सुद्धा होकार दिला. आता चालू असलेले प्रयोग आणि शाहिरांचं वेळापत्रक व्यस्त असूनही हे शिवधनयुष्य पेलायचं त्यांनी ठरवलं. गाणं महाराष्ट्र गीत आणि सरावही कमी वेळ मिळालेला.

शेवटी कलाकार फोटो स्टुडिओच्या पोटमाळ्यावर, अत्यंत अरुंद जागेत फक्त एका हार्मोनियमच्या साथीने शाहीर साबळेंनी दोन दिवस सराव केला. आणि हे गाणं अगदी एकही रिटेक न होता रेकॉर्ड झालं. आणि पहिल्यांदा शाहीर साबळेंनी १ मे १९६० रोजी दादरच्या शिवाजी पार्क इथे झालेल्या समारंभात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणं गायलं होतं.

आज ६२ वर्ष झाली तरी मराठी माणसाच्या मनात हे गाणं रुंजी घालतंय. शौर्य, मराठी अस्मिता यांचं अगदी उत्तम शब्दात गायलेलं गुणगान कोणाला ऐकायला आवडणार नाही. आजपर्यंत देशात प्रदेशात इतकंच कशाला राजकीय सभांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून वाजलं आहे.

अलीकडेच या गाण्याला राज्य गीताचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला.

या निमित्ताने बोल भिडूने शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे यांच्याशी संपर्क साधला.

तेव्हा त्यांनी असं सांगितलं की, “हे वर्ष बाबांचं म्हणजे शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने आमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाबांना रेडिओतून बॅन केलं तेव्हा त्यांनी फार लक्ष दिलं नाही आणि आपलं काम सुरु ठेवलं. जेव्हा महाराष्ट्र गीत तयार झालं आणि सर्वदूर पोहोचलं तेव्हा ते पोहचवण्यात बाबांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका घेतली. बाबा हयात असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक प्रयोगाची सुरुवात ही महाराष्ट्र गीतानेच झाली आहे.”

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.