1983 सालच्या आयर्लंड महोत्सवात भारताला पहिलं पारितोषिक मिळालं ते विठ्ठल उमप यांच्यामुळे

महाराष्ट्राला शाहीरांची मोठी परंपरा आहे. शाहीर अमर शेख, शाहीर साबळे असे अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत.

यापैकी एक महत्वाचे शाहीर म्हणजे विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेने ऐकला आहे. शाहीर विठ्ठल उमप यांच्या याच पहाडी आवाजाने एकदा परदेशात भ्रमंती केली होती. तिकडचा अनुभव हा महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी फार अभिमानाची गोष्ट होती.

असं काय घडलं होतं ?

विठ्ठल उमप यांचं जांभूळ आख्यान हे प्रचंड गाजलेलं एक लोकनाट्य. यामध्ये विठ्ठल उमप रंगवत असलेली द्रौपदी या लोकनाट्याचं प्रमुख आकर्षण. विठ्ठल उमप यांनी आयुष्यभर लोककलेची सेवा केली. त्यांची पुढची पिढी सुद्धा वडिलांनी दिलेला शाहीरी कलेचा वारसा पुढे चालवत आहे. विठ्ठल उमप यांच्या आयुष्याकडे बघितल्यास अगदी शून्यातून विठ्ठल उमप या कलावंताने स्वतःची ओळख निर्माण केली. 

विठ्ठल उमप यांचे वडील गायक होते. लहानपणापासून विठ्ठल उमप वडिलांना गाताना बघत होते. वयाच्या आठव्या वर्षापासून विठ्ठल उमप यांनी सुद्धा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.

विठ्ठल उमप यांच्या लहानपणी बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी लोकगीतांचा आधार घेत होते. याच काळात विठ्ठल उमप यांनी स्वतःची गाणी गायला सुरुवात केली.

विठ्ठल उमप हे शाहीर म्हणून प्रसिद्ध झाले असले तरीही सुरुवातीला कव्वालीच्या व्यासपीठावर सुद्धा त्यांनी स्वतःची छाप पाडली आहे. लोकरंगभूमी, शाहीरी, काव्य संमलेनं, अभिनय इत्यादी विविध माध्यमांमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांनी संचार केला.  

विठ्ठल उमप यांनी तब्बल हजारपेक्षा जास्त गाणी लिहिली. आला कागुद कारभारणीचा ही लावणी असो किंवा माझ्या आईचा गोंधळ, आईचा जोगवा, ये दादा आवर रे अशी शाहीरांनी गायलेली अनेक लोकगीतं आजही दर्दी कानसेनांच्या ओठांवर आहेत. ‘माझी मैना गावकडं राहिली’ हे विठ्ठल उमप यांनी गायलेलं गाणं ऐकून आजही अनेक जणांचे डोळे ओलावत असतील.

त्यांनी जांभूळ आख्यान या नाटकाचे सुमारे ५०० प्रयोग केले. असा हा प्रतिभासंपन्न लोककलावंत शाहीर विठ्ठल उमप. शाहीरांचा आवाज ही त्यांची ओळख असते. विठ्ठल उमप यांचा आवाज सुद्धा गर्दीला छेदत आसमंत व्यापणारा होता.

हा आवाज जेव्हा परदेशातील लोकांनी ऐकला तेव्हा काय कमाल झाली त्याचा हा किस्सा…

१९८३ साल.

विठ्ठल उमप हे त्यांच्या साथीदारांसह आयर्लंडला गेले होते. तिथे क्वार्क नावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव असतो. या महोत्सवात जगभरातल्या अनेक देशांमधले गायक सहभागी होतात. या  महोत्सवाची विशेष गोष्ट अशी की, जो गायक सहभागी होत आहे, त्याने स्वतःच्या देशाचं गाणं, देशाच्या अस्सल मातीतलं लोकसंगीतच ऐकवायचं.

विठ्ठल उमप यांच्यासह भारताचं प्रतिनिधीत्व करणारे आणखी चार जण होते. आणि त्यांच्यासमोर होते इतर देशांमधून आलेले जवळपास २५० गायक. 

महोत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येक देशातील गायक स्वतःच्या देशातील लोकसंगीताने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते. भारतातील इतर चार जणांनी सुद्धा त्यांच्या भाषेतील लोकगीतं सादर केली.

एक एक करून विठ्ठल उमप यांच्यावर गाण्याची वेळ आली. शाहीरांनी त्यांच्या खणखणीत आवाजात लोकगीतं, कोळीगीतं, लावणी, ओव्या ऐकवल्या. शाहीरांच्या साथीदारांनी गाण्याला उत्कृष्ट साथ दिली. ढोलकीच्या तालावर गाण्याची रंगत अजून वाढली.

समोर असलेले बरेचसे प्रेक्षक परदेशी असले तरीही त्यांनी सुद्धा शाहीरांच्या गायनाला मनमुराद दाद दिली. कलेला कोणतीही भाषा नसते, हेच यातून सिद्ध झालं. 

आणि तो अभिमानाचा क्षण..

इतर सर्व देशांमधून भारतीय गायकांनी सादर केलेली गाणी बहारदार झाल्याने भारताला या महोत्सवात पहिलं पारितोषिक देण्यात आलं. आयर्लंडचे मेयर जॉन माँटेगु यांच्या हस्ते भारताला हा सन्मान देण्यात आला. इतक्या मोठ्या जागतिक महोत्सवात भारताला हा सन्मान मिळण्यामागे शाहीर विठ्ठल उमप यांचं मोलाचं योगदान होतं. आपल्या भारतासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी ही गर्वाची गोष्ट होती

रसिक मायबापा तुला भेटावं,

जाता जाता एवढंच सांगावं,

गाता गाता मज मरण यावं,

माझं गाणं मरणानंही ऐकावं…

 

शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या ओळी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात खऱ्या ठरल्या.

२७ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरला दीक्षाभूमी मैदानात कार्यक्रम करत असताना रंगमंचावर ते कोसळले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. जेव्हा लोककलांचा उल्लेख होईल, तेव्हा स्वत:च्या गायनाने केवळ भारत नव्हे तर परदेशात महाराष्ट्रातील लोककलांची अनोखी ओळख रुजवणारे शाहीर विठ्ठल उमप यांचं नाव सन्मानपूर्वक घेतलं जाईल.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.