गाढवांची तस्करी की गाढवांचा प्रवास…शाहरुखच्या ‘Dunki’ चा विषय त्यापेक्षा भारीय..

आम्ही एका पिक्चरला गेलेलो.. थेटरात ओ. आता आपल्याला कोपरा हुडकावा लागत नसल्यानं आणि पूर्णपणे पिक्चरच बघावा लागत असल्यानं आपण जरा आधीच थेटरात जाऊन बसतो. पिक्चर लागायच्या आधी जाहिराती लागल्या. त्यातल्या ३ बाद होत्या, २ भारी होत्या.

एक तर शाहरुख खानची होती. आता शाहरुख खानचा पिक्चर थेटरात पाहून लय वर्ष उलटली. त्यात मध्ये पठाण पिक्चरची जाहिरात आली, तेव्हा जरा हवा झाली. पण आता शाहरुख थेट थेटरात दिसला म्हणजे, डीप विषय.

शाहरुख आणि राजकुमार हिरानी एक पिक्चर घेऊन येतायेत, त्याचं नाव आहे ‘डंकी.’ आता थेटरात जे दाखवलं ते ना टिझर होता, ना ट्रेलर… तर ती होती डेट अनाऊन्समेंट (हे एक नवीन फॅड आलंय.) यात पिक्चरबद्दल लय डीप काही कळत नाय.

पण आम्ही जरा हुशार असल्यानं, लगेच अंदाज बांधायला घेतले. राजू हिरानी पिक्चरचं नाव सांगतात ‘डंकी’, शाहरुखला नाव वाटतं ‘डॉंकी.’ व्हिडीओच्या शेवटी एक विमान उडतं आणि वाळवंटात माणसं चालत असतात.

एक अंदाज आला, गाढवांवर पिक्चर असल. दुसरा आला गाढवांची तस्करी दाखवतील, तिसरा म्हणला, गाढवाचं लग्नचा रिमेक असला तर?

पण अंदाज लावणारे आम्ही सगळेच गाढव ठरलो. कारण नवाच विषय समोर आला. हा पिक्चर ‘डॉंकी फ्लाईट’वर आहे.

आता डॉंकी फ्लाईट म्हणजे काय? याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतो…

समजा, तुम्हाला अमेरिका किंवा कॅनडा असल्या देशात जायचंय. पण साध्या सरळ माणसासारखं पासपोर्ट-व्हिसाचं काम करुन, तिकीट काढून काय तुम्ही जाऊ शकत नाही.

कारण तुमच्यामागं कायतर लफडी आहेत किंवा पैशे नाहीत. मग तुम्ही काय कराल, तर झोलमध्ये रम्मी लावाल, म्हणजेच काय तर बेकायदेशीर मार्गानं काय सोय होतीये का हे बघाल.

थेट एखाद्या देशात घुसायचं म्हणजे काय सोपा विषय नाही. 

हार्ड कार्यक्रम असतोय आणि त्यात घावलात तर तुकडाच पडला. साहजिकच विषय असतोय रिस्की. पण स्वप्नं आणि अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी पोरं ही स्कीम वापरतात.

समजा तुम्हाला अमेरिकेत जायचं असेल, तर आधी तुम्हाला वेगवेगळ्या देशांची फ्लाईट पकडावी लागते. मग तिथून काही महिन्यांनी तुम्ही अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर येता आणि बेकायदशीरपणे अमेरिकेत घुसायचा प्रयत्न करता. या प्रयत्नात आत घुसण्याऱ्यांपेक्षा घावण्याऱ्यांचा आकडा जास्त असतोय.

हा असा बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या लोकांना ‘डॉंकर्स’ म्हणतात.

या डॉंकर्सना पट्ट्यात घेण्यासाठी एक रॅकेट चालवलं जातं, त्याची पद्धत थोडीफार अशी असते. पोरांना एज्युकेशन व्हिसाचं अमिष दाखवलं जातं. त्यानंतर त्यांना ऍप्लिकेशन रिजेक्ट झाल्याचं सांगण्यात येतं. मग एजंटच त्यांना बेकायदेशीर मार्गाचा पर्याय सुचवतो आणि साहजिकच गरजेपेक्षा जास्त पैसे उकळतो. ही पैशांची रेंज साधारणपणे २० ते ३० लाखांच्या पुढं असती.

आता हा प्रवास फक्त विमानानंच होतो, असं नाही…

जिथवर विमान नेतंय, तिथवर नेतंय, तिथून पुढं चालत जावं लागतं. अमेरिकेच्या बॉर्डरवर तापमानाचा सामना करत, सरपटत, खायला प्यायला काहीच नसल्यानं स्वतःचा घाम पित मार्ग काढावा लागतो. एवढं करुन तुमची एंट्री यशस्वी झाली नाही, तर थेट परत पाठवलं जातं. गुन्हा दाखल होतो आणि पैसेही जातात.

हे फक्त संबंधित देशाच्या बॉर्डरवरच होतं असं नाही. डॉंकी फ्लाईटच्या मार्गानुसार कुणी दुबईत थांबलं असेल आणि तिथल्या पोलिसांनी पकडलं तरी बाजार उठतो.

अमेरिकेत अशा बेकायदेशीर मार्गानं येणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीयांचा नंबर पाचवा लागतो. फक्त अमेरिकेतच नाही, तर कॅनडामध्येही भारतीय प्रवासी जायचा प्रयत्न करतात.

 डॉंकर्सच्या यादीत सर्वाधिक प्रवासी पंजाबचे आहेत, तर त्या खालोखाल हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो.

कायदेशीर मार्ग सोडून, जास्तीचे पैसे घालवून, जीव धोक्यात टाकून दुसऱ्या देशात घुसणाऱ्या प्रत्येकाचाच प्रयत्न यशस्वी होतो असं नाही. कित्येक जण कर्जाच्या बोजात डुबून जातात, कित्येक जण डिटेन्शन सेंटरमध्ये सडतात, तर कित्येक जण फक्त पश्चाताप करत राहतात.

शाहरुख यातल्या कुणाची स्टोरी दाखवतो हे थिएटरमध्ये समजेल पण आपल्या आजूबाजूलाही कुणी डॉंकर असला तर..?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.