पार्टीत गन घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुखचा माज एका फोन कॉलवर उतरवला.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. बॉलिवूडमध्ये खान मंडळींचा उदय झाला होता. त्यांचे एकापाठोपाठ एक सिनेमे हिट होत होते. पब्लिक त्यांच्या मागे वेडी झाली होती. विशेषतः शाहरुख खानच नशीब जोरात होतं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या शाहरुखने अगदी कमी काळात स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. दिलवाले दुलहनिया ले जायेंगेच्या सुपरहिट यशानंतर त्याची हवा झाली होती.

बच्चन म्हातारा झाल्यानंतर बॉलिवूडचा किंग कोण या प्रश्नावर शाहरुख अस उत्तर मिळत होतं.

दरवर्षी मिळत असलेले अवॉर्डस, मोठ्या बॅनरचे सिनेमे, मिडियाचं अति अटेन्शन या सगळ्यामुळे सक्सेस शाहरुखच्या डोक्यात घुसलं होतं. तो मग्रूर बनत चालला होता.

मीडिया त्याच्या वागण्याला खतपाणी घालत होती.

११ जानेवारी १९९७. अक्षय कुमार आणि संजय दत्त असलेल्या प्रियदर्शन दिग्दर्शीत रफतार या सिनेमाचं मुहूरत पार्टी ओबेरॉय टॉवर हॉटेलमध्ये आयोजित केली गेली होती.

मुंबईची त्याकाळची सर्वात मोठी पार्टी आहे असा निर्माते फिरोज नाडीयादवाला यांचा दावा होता. या पार्टी साठी मुंबईचे सगळे तारेतारका हजर राहणार होतेच मात्र हॉलीवुड मधून स्टीव्हन सिगल हा मोठा स्टार उपस्थित राहणार होता.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील या पार्टीसाठी येणार होते.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी पार्टी सुरू झाली. बॉलिवूडचे सगळे दिग्गज उपस्थित होते, हॉलिवूडस्टार स्टीव्हन सिगलसुद्धा वेळेत हजर झाला. पार्टी रंगात आली.

एवढे सगळे मोठे कलाकार असून त्या पार्टीचे मुख्य सेलिब्रिटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते.

जशी जशी रात्र चढू लागली पार्टी रंगात आली. अशातच रंगलेल्या अवस्थेत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख ओबेरॉय टॉवरला पार्टीसाठी येऊन थडकला.

शाहरुख जेव्हा पार्टीसाठी हॉलमध्ये घुसू लागला तेव्हा गेटवर मेटल डिटेक्टर वाजू लागला.

मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख पार्टीमध्ये उपस्थित असल्यामुळे सिक्युरिटी कडक करण्यात आली. प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडलं जात होतं.

शाहरुखच चेकिंग केल्यावर लक्षात आलं की त्याच्या खिशात एक रिव्हॉल्व्हर गन आहे.

पोलिसांनी शाहरुखला अडवले. तो भडकला. त्याने तपासणी करत असलेल्या मुंबई पोलीसमधल्या हवालदाराला झापलं,

“तुम्हे पता है मै कोन हूं?”

हवालदारमामा पण हुशार होते. त्यांनी सरळ सांगितलं की मी आपल्याला ओळखत नाही,पिस्तूलाच लायसन्स आणि इतर कागदपत्रे असतील तर दाखव नाही तर आत एन्ट्री मिळणार नाही.

एका हवालदाराने केलेला अपमान शाहरुखला सहन झाला नाही.

त्याने तिथं भांडण सुरू केलं. पोलीस सुद्धा चिवट होते. त्यांनी त्याला काहीही केलं तरी आत सोडायचं नाही असं ठरवलंच होतं.

चिडलेल्या शाहरुखने पार्टीचा होस्ट फिरोज नाडीयादवाला याला फोन केला. त्याच्याशी अतिशय शिवराळ भाषेत आकांडतांडव करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला,

” फिरोज स्वतःला काय समजतो. एका क्रिमिनल (संजय दत्त) बरोबर आणि एका वेटर (अक्षय कुमार) सोबत तो सिनेमा बनवतोय.”

त्याचं बोलणं ऐकून फिरोज नाडीयादवालाचं डोकं हललं. मग अचानक त्याच्या लक्षात आलं की शाहरुखला आवरू शकतो असा एकच माणूस आहे आणि तो या पार्टीत हजर आहे.

मुंबईवर राज्य करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

फिरोज नाडीयादवालाने बाळासाहेबांची गाठ घेतली. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. बाळासाहेब म्हणाले त्याला फोन लाव मी बघून घेतो.

शाहरुखचा मोबाईल वाजला. त्याने फिरोज बोलतोय अस समजून फोन उचलला आणि त्याला शिव्या घालण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात पुढचा आवाज ऐकून त्याला दातखीळ बसली.

“मी बाळ ठाकरे बोलतोय. कोणताही गोंधळ न घालता पोलिसांना सहकार्य कर अथवा मला हस्तक्षेप करावा लागेल.”

शाहरुख काही क्षणासाठी थंड पडला.

भानावर आल्या आल्या गप्प ओबेरॉय हॉटेलचे २६ मजले उतरून खाली गेला. गाडीत असलेली बंदुकीची कागदपत्रे आणली पोलिसांना दाखवली, त्यांच्याजवळ गन जमा केली आणि पार्टीत आला.

त्याचा एरव्हीचा रंग पार उतरून गेला होता. जुही चावला व मनीषा कोईरालासोबतच्या टेबलवर गप्प खाली मान घालून बसला आणि थोड्यावेळाने निघून गेला.

दुसऱ्या दिवशी फिल्मसिटीमध्ये असलेल्या ड्युप्लिकेट सिनेमाच्या सेटवर जाऊन फिरोज नाडीयादवालाने त्याच्याशी कालच्या प्रकाराबद्दल भांडण काढलं.

सगळ्या पाहुण्यांसमोर माझं नाक कापलं म्हणून शिव्या घातल्या.

अखेर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी हे भांडण सोडवलं. या प्रकारानंतर शाहरुख आणि फिरोज नाडीयादवाला एकत्र कधी आले नाहीत.

फिरोजचा तो सिनेमा काही कारणामुळे डब्ब्यात गेला व त्या ऐवजी बनवलेल्या हेराफेरी या सिनेमाने इतिहास घडवला.

हे ही वाच भिडू.

 

 

1 Comment
  1. Ganesh Godik says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.