प्रबोधनकार ठाकरेंकडून अखेरच्या क्षणी ते वचन घेतलं आणि छत्रपती शाहूंनी प्राण सोडले… 

दिनांक ६ मे. मृत्यू शाहू महाराजांच्या जवळ येवू लागला होता. ३ मे १९२२ रोजी छत्रपती शाहू महाराज बडोद्याहून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांची तब्येत जास्तच बिघडू लागली होती. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर शिरगांवकर व देशमुख यांना महाराजांवर उपचार चालू केले. या डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे नामांकित ह्रदयरोगतज्ञ डॉक्टर टक्कर यांना पाचारण करण्यात आलं होतं. 

५ मे रोजी प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महाराजांचा मृत्यू जवळ आला असल्याचं समजताच इंदूमतीराणीसाहेब त्या धक्यानेच बेशुद्ध पडल्या होत्या. बापूसाहेब महाराजांच्या पायाशी बसून निरंतर अश्रू ढाळत होते. आप्पासाहेब कागलकर व बाबासाहेब खानविलकर सोबत होते. 

आत्ता कधीही महाराज प्राण त्यागतील अशी स्थिती होती. या अवस्थेत महाराजांनी आज्ञा केली, 

कोंदडाला बोलवून घ्या… 

कोण होते हे कोंदड..? आणि नेमकं काय कारण होतं या भेटीचं…? 

सुरवातीला महाराजांची आज्ञा ऐकणाऱ्यांना देखील कोंदड कोण हे समजले नाही. पण नंतर कळाल कोंदड म्हणजे खुद्द प्रबोधनकार ठाकरे. 

कट टू काही महिन्यापूर्वीच्या इतिहासत आपण जावुया… 

पन्हाळा लॉजवर शाहू महाराज आणि प्रबोधनकरांची भेट झाली होती. त्या काळात महाराजांनी ब्राह्मणेत्तर चळवळीची सुत्रे होती घेतली होती. या पार्श्वभूमीवर महाराजांना ब्रिटीशांनी एक पत्र पाठवले होते. त्यात सांगण्यात आलं होतं की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या बाहेर कोणतिही चळवळ करु नये. दमदाटीच्या भाषेतला हा खलिता महाराजांच्या हाती पोहचला होता… 

ब्रिटीशांच्या या खलित्याला उत्तर लिहताना महाराजांनी लिहलं, 

महाराष्ट्रातील अस्पृश्यांसकट तमाम मागासलेल्या बहुजन समाजाचा उद्धार हे माझे पवित्र कार्य आहे. या लक्षावधी शेतकरी, कामकरी नि मजूर बांधवांची सामाजिक, धार्मिक नि आर्थिक सुधारणा झाल्याशिवाय, सरकारने राजकारणी हक्काची भाषा बोलावी तरी कशाला? हक्क देणार कुणाला? घेणारे कोण? आणि त्याचा अडाणी बामणेतरांना अर्थ तो काय कळणार नि फायदा होणार? सरकार मला पदुत्युतीच्या बुरखेबाज धमक्या देत आहे, त्यामागे कोणाच्या चिथावण्या नि कारवाया आहेत ते मला माहिती आहे. 

तुम्ही पदच्युत करण्यापूर्वीच मीच आत्मसंतोषाने गादीचा राजीनामा देईल.. पण एकदा हातात घेतलेली बामणेतरांची चळवळ प्राण जाईतोवर हा शाहू सोडणार नाही… 

हे उत्तर शाहू महाराजांनी प्रबोधनकरांच्या समोर वाचले. प्रबोधनकारांनी हे उत्तर ऐकताच म्हणाले, अरे ही तर इतिहासाची पुनरावृत्तीच या पत्रात तर मला साक्षात छत्रपती प्रतापसिंहच बोलतो आहेसा असे दिसतो.. 

त्यावर शाहू महाराज म्हणाले,

प्रतापसिंह म्हणजे आमचे बुवामहाराज? ही काय भानगड? 

त्यानंतर प्रबोधनकारांनी सत्वधीर प्रतापसिंह महाराज आणि स्वराज्यनिष्ठ रंगो बापूजी यांच्याबद्दलचा इतिहास शाहू महाराजांना सांगण्यास सुरवात केली.. 

तासभर इतिहास ऐकून महाराज म्हणाले, 

अरे वाहवा..! आज मला धीर आला. कारस्थानी बामणांच्या चिथावणीने आंग्रेज बहादुरांच्या डोळ्यात लसणारा मीच एकटा छत्रपती नव्हे तर? 

प्रबोधनकरांना महाराज म्हणाले, तुझी इतर कामे बाजूला ठेव. प्रथम हा इतिहास मुद्देपुराव्यानिशी लिहून काढ. वाटलं तर नोकरीचा राजीनामा दे. मी संभाळतो तुझा सारा प्रपंच. 

त्यानंतर होता तो आजचा दिवस.

आजच्या दिवशी महाराज अखेरचा श्वास घेत होते. लागलीच कोंदडांना म्हणजे प्रबोधनकरांना निरोप पोहचवण्यात आला व प्रबोधनकरा ठाकरे शाहू महाराजांच्या भेटीला आले. रात्री १० वाजले होते. 

महाराज प्रबोधनकरांना म्हणाले, 

घे शपथ, थापाबाजी करणार नाहीस ना? तू वांड आहेस. ग्रंथ लिहून येईन अशी शपथ घे. 

प्रबोधनकारांनी शपथ घेतली, 

सत्त्वधीर छत्रपती प्रतापसिंह आणि रंगा बापूजी हा ग्रंथ लिहून मी पूरा करील.. 

प्रबोधनकारांकडून रात्री ते वचन घेतलं आणि त्याच पहाटे शाहू महाराज गेले, प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना दिलेले वचन पाळले आणि ग्रंथ पुर्ण केला.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. GAJANAN VANKHEDE says

    एकदम
    भारी सामाजिक भान असणार लेखन आहे बोल भिडूच

Leave A Reply

Your email address will not be published.