कुस्तीच्या आड जात येऊ नये म्हणून शाहू महाराजांनी पहिलवानांची नावेच बदलून टाकली..

कोल्हापूरचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवल्यास सर्वप्रथम जर कोणती व्यक्ती सर्वांच्या नजरे समोर येत असेल तर ती म्हणजे ‘राजर्षी शाहू महाराज’

शाहू महाराज राजे असून देखील ऋषितुल्य होते. म्हणूनच त्यांना कुर्मी येथील आर्य क्षत्रिय परिषदेमध्ये ‘राजर्षी’ या उपाधीने सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या ऋषितुल्य राजाने आपल्या कार्यकर्तृत्वाने कोल्हापूरचे नाव भारताच्या नकाशावरच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अजरामर केले होते.

अशा या राजाला वेदोक्त प्रकरणात चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने अपमानित करण्यात आले होते. त्यामुळे छत्रपती संपूर्ण जातिसंस्थेविरुद्ध बंड करून उठले. छत्रपती असणाऱ्या एका समर्थ राजालासुद्धा जर धर्माच्या नावाखाली वर्णव्यवस्थेच्या अमानुष गुलामगिरीचा इतका त्रास सहन करावा लागत असेल तर या सनातनी ब्राह्मण वर्गाकडून सामान्य ब्राह्मणेतरांना धार्मिकच नव्हे तर आर्थिक, सामाजिक क्षेत्रात किती छळ सोसावा लागत असेल याची त्यांना कल्पना आली होती.

त्यातून त्यांनी सनातनी हिंदू धर्म आणि त्या आधारे समाजात बहुसंख्य व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा साधा हक्क नाकारणारी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपले राज्य देखील पणाला लावण्याचा निर्धार केला. त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.

अस्पृश्य समाजाला वर आणण्याकरिता त्यांच्यातील कमीपणाची कल्पना नाहीशी करण्याकरिता महाराजांनी सर्व दृष्ट्या प्रयत्न केले. या कामात ते इतके रंगून गेले होते की, प्रत्येक गोष्टीकडे ते किती बारकाईने पाहायचे याचा प्रत्यय आडनाव नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांतून येतो.

त्यावेळी भंगी, महार, चांभार या नावांत अस्पृश्यता चिकटली होती. तेव्हा तीही काढून टाकावी म्हणून या जातीतल्या पैलवानांना महाराजांनी नवी नावे देण्यास सुरुवात केली होती.

भारतीय मल्लविद्येच्या इतिहासात सन १८९४ ते १९२२ पर्यंतचा म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षांचा काळ हा मल्लविद्येच्या वैभवाचा काळ होता. हा कालखंड राजर्षी शाहू छत्रपती कालखंड म्हणूनच ओळखला जातो. या प्रदीर्घ कालखंडात कोल्हापूर मल्लविद्येचे माहेरघर बनले.

१८९७ साली छत्रपतींना पुत्ररत्न झाले. या निमित्ताने त्यांनी कोल्हापुरात एक जंगी मैदान भरवले. त्यासाठी उत्तरेतल्या नामांकित पंजाबी पैलवानांना बोलावले गेले. या पंजाबी पैलवनांनी आपल्या मल्लविद्या कौशल्याने कोल्हापूरच्या पैलवानांना एकामागून एक चितपट केले. या घटनेचा मोठा धक्का महाराजांना बसला आणि त्यांनी मनोमन निश्चय केला एक दिवस कोल्हापूरचे पैलवान पंजाबी पैलवानांना आसमान दाखवतील.

या पराभवाच्या घटनेने दिलेल्या धड्याने कोल्हापूरच्या पैलवानांनी भावी उज्वल कामगिरीची बीजे पेरली गेली. यांच्या कारकिर्दीत पैलवानकीने जनमनाची पकड इतकी घेतली की गावोगावी, गल्लोगल्ली, आळीतून तालमी निर्माण झाला.

सर्व जाती-धर्माच्या मल्लांना राजर्षींनी उदार आश्रय दिला. त्यांनी कधीही पैलवानांन मध्ये भेदभाव केला नाही. त्यांच्या पदरी काका पंजाबी, गामा बाली वाला, गणपत शिंदे, नारायण कसबेकर, पांडू भोसले, ज्ञानू भाडळे, कृष्णा बरदाने, व्यंकप्पा बुरूड, देवबाप्पा धनगर, शिवाप्पा बेरड, पांडू शिराळकर एवढे पैलवान होते.

कुस्त्यांच्या मैदानात या लोकांना कुस्त्यांसाठी लांग बांधून तयार झाल्यावर, खेळासाठी हाक मारली जायची. ही हाक त्यांच्या जातीवरून मारल्यास समोरचा उच्चवर्णीय पैलवान खेळायला तयार होत नसे. यावर महाराजांनी या अस्पृश्य जातीतल्या पैलवानांची आडनावाच बदलली.

त्यांना हाक मारण्याच्या वेळी,

महार पैलवानांना हाक मारताना ‘जाट’ पैलवानांनी तयार व्हावे म्हणून ओरडण्यात येत होते. तर चांभार पैलवानांना ‘सरदार’ व भंग्यांना ‘पंडित’ अशी नावे ठेवली होती. यामुळे दुसऱ्या जातीतील पैलवानांना आपण महार, चांभार किंवा भंगी जातीतील पैलवानांनशी खेळत आहोत ही कल्पनाही येत नसे. नाहीतर त्यांच्या या जातीमुळे त्यांना कुस्तीत जोड मिळणे अवघड पडले असते.

लोकांच्या खाजगी व सार्वजनिक जीवनातील अस्पृश्यतेचे पूर्णपणे उच्चाटन व्हावे म्हणून शाहू छत्रपतींनी समाजातील अस्पृश्य लोकांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे प्रयत्न केले. याबाबत ‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान | आपण मात्र कोरडे पाषाण |’ अशी भूमिका न घेता स्वतः पुढाकार घेतला.

शाहू महाराजांनी वर्णव्यवस्थेवर आघात केला. त्याचवेळी व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या आड पारंपरिक जातिसंस्था येणार नाही याची दक्षता घेतली.

मांग, गारुडी यांच्यासारख्या गुन्हेगार जातींना दररोज रात्री कोणत्याही परिस्थितीत चावडीवर जाऊन ती हजेरी द्यावी लागत होती ती क्रूर पद्धत त्यांनी राजाज्ञा काढून बंद केली.

“दीनदलित समाजाने स्वतःचा उल्लेख  अस्पृश्य या घृणास्पद  शब्दाने न करता आपणास सूर्यवंशी म्हणवून घ्यावे असा आदेश १९१७ मध्ये राजपत्रात केला. 

शतकानुशतके ज्यांना अन्यायी व विषम समाजव्यवस्थेमुळे अपार दुःख व अपमान सोसावे लागले, त्या अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शाहूंनी जे महान ऐतिहासिक कार्य केले आहे त्याची नोंद महाराष्ट्रच नव्हे तर भारताचा इतिहास लिहिणाऱ्याला घ्यावीच लागेल. निःसंशय!

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.