शाहू महाराजांमुळे माझ्यासारखा मांगाचा मुलगा खासदार झाला : के. एल. मोरे

के. एल. मोरे हे कोल्हापूरचे खासदार होते. १९५२ ते ६२ या काळात त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. १९५२ आणि १९५७ च्या राखीव गटातून त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. १९५२ साली ते पहिल्यांदा राखीव गटातून निवडून आले तर सर्वसाधारण गटातून बॅरिस्टर खर्डेकर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.

के. एल. मोरे यांनी त्यांच्या आयुष्यात शाहू महाराजांचे असणारे योगदान यावर लेख लिहला होता. हिंदूराव साळुंखे लिखित छत्रपती शाहू महाराज स्मृतीदर्शन या पुस्तकात बोलभिडूस तो लेख मिळाला.

तो लेख आपणास देत आहोत.

 

खासदार के. एल मोरे लिहतात…

महाराजांचा मुक्काम सोनतळी आश्रमात होता. सकाळचे सर्व काम आटोपून महाराज नित्याप्रमाणे बाहेर निघाले होते. जाता जाता शिकारखाना, पागा वगैरेची व्यवस्था पहात होते. त्यांच्या आसपास गडी माणसे, नोकरचाकर सज्ज असत. बाहेरुन भेटीसाठी आलेले लोकही हातात अर्ज वगैरे घेऊन आलेले असत. त्यांच्याशी बोलत मी फाटकाबाहेर उभा होतो. बाहेर फोर्ड मोटार उभी होती. महाराज पुढे पुढे येत होते. महाराजांना मी वाकून मुजरा केला.

महाराज मला म्हणाले, कोण रे तू ?

मी मांगाचा, मला साळा शिकायची हाय.

तू हितल्या साळत जात न्हाईस

ह्या साळत दोनच यत्ता हायत. मला लई शिकायचं हाय. मी म्हणालो.

उद्या ये रे, महाराज म्हणाले.

महाराज काही लोकांसह गाडीतून निघून गेले. माझा भाऊ तेथेच पहाऱ्याच्या पोलीस होता. त्याला सर्व सांगितले. तो म्हणाला, तुझे नशीब थोर हाय.

दूसऱ्या दिवशी मी फाटकाबाहेर उभा होतो. आत महाराज मुदपाकखान्यातील सोवळेकऱ्यास म्हणत होते, तुझ्याबद्दल तक्रार आली आहे, येथील शाळेतील प्रत्येक पोरास दोन दोन भाकरी देत जा. यात काही गडबड केलीस तर याद राख. महाराज इतर भेटावयास आलेल्या लोकाशी बोलून फाटकाबाहेर येत होते.

मला त्यांनी पाहिले. मी भीतभीत मुजरा केला. म्हणालो महाराजांची आज्ञा. महाराज काही बोलले नाहीत. गाडीत बसत असताना. महाराज सोबत्यास म्हणाले, त्या पोराला पाठीमागे घ्या. त्या माणसाने मला पाठीमागे बसविले. महाराजांची गाडी निघाली.

थेट शहरातून पापाच्या दुकानाजवळ थांबली.

अरे पापा ये बस गाडीत. महाराज त्याला म्हणाले लोक आपल्यावर टिका करतात. हे बघ गाडीत मांगाचे पोर आहे. आत्ता यावरही टिकाच करतील.

महाराज पुढे निघाले, मोतीबागेत आले. लोक उभे होते. त्यातील काहींच्या हातात अर्ज वगैरे होते. महाराजांनी म्हणणे ऐकले. अर्ज पी.ए. बन्ने यांच्याकडे दिले. त्या ठिकाणी पागेत गेले. सर्वांचा चहा वगैरे झाला. मलाही मिळाला.

लागलीच थेट मंगळवारातून आर्य समाजात आले. गुरूकुलाजवळ जाऊन हाक मारली.

निंबाळकर? काही पोरे बाहेर आली. एका गोटा केलेल्या लांब शेंडीवाल्या पोरग्याने निंबाळकर बाहेर गेलेत असे मुजरा करत सांगितले. “त्यांना मोतीबागेत बोलावले आहे अस सांग” असे महाराज म्हणाले.

निंबाळकर मोतीबागेत आल्यानंतर मला त्यांच्या स्वाधीन केले. महाराज म्हणाले, हा एक मांगाचा मुलगा आहे. त्याला गुरूकुलात दाखल करुन घ्या. श्रद्धानंद शाळेत घाला. याला शिकवा. 

अशा रितीने शिकत शिकत मी एलएल. बी झालो. माणसाच्या जीवनाला कशी कलाटणी मिळते हे माझ्यावरून सिद्ध होते.

अशा प्रकारे महाराजांनी शेकडो लोकांना पुढे आणले. यानंतर मी इलाखा पंचायत शिक्षण समितीवर म्यु कौन्सिलमध्ये कोल्हाूर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये निवडून आलो.

१९५२ ते ६२ मध्ये भारतीय पार्लमेंटमध्ये एम.पी. म्हणून निवडून आलो. माझ्या दोन मुली व तीन मुलगे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर तसेच शासनाच्या इतर मोठ्या हुद्यावर नोकरीत आहेत. हे सर्व शाहू महाराजांच्या कृपेमुळेच.

माजी खासदार के.एल. मोरे

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Jagannath Jaaware says

    आदरणीय राजर्षी शाहू महाराजांसारखा लोककयाणकारी राजा , ज्यांनी तळागाळातील लोकांना मदतीचा हात देऊन त्या लोकांचे जिवन धन्य बणवले

Leave A Reply

Your email address will not be published.