छ. शाहू महाराजांच्या घसरगुंडी मागची सत्यकथा.

छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक प्रकार रचले गेले. राजर्षी शाहू महारांजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीचे हे प्रकार रचले. अनेक कपोकल्पित कथा रचण्यात आल्या.

एक वेळ तर अशी आली की,

याच विरोधकांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचे पत्र इंग्लडला पाठवले. मात्र या खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची पेटी दाखवली. 

शाहू महाराजांवर असे खोटे आरोप का करण्यात आले याच उत्तर देखील स्पष्ट आहे. त्यांनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार प्रहार केला. दलितांना मोठ्या संधी निर्माण केल्या. समतेचा पाया रचला. याचा त्यांना झालेला तोटा म्हणजे त्यांच्या अब्रुबद्दलच रचल्या गेलेल्या कल्पित कथा.

याच सांगीव गोष्टीतली एक गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या घसरगुंडीचा. अफवा अशी शाहू महाराज या घसरगुंडीच्या मार्फत महिलांसोबत दूराचार करत असत. 

शाहू महाराजांची ही घसरगुंडी कुठे आहे ? 

शाहू महाराजांनी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर सोनतळी स्काऊट बंगला कॅंप पासून तीन फर्लांगच्या अंतरावर सोनतळी गाव वसवले. त्यालाच सोनतळी कॅम्प असे म्हणले जाते. या गावात महाराजांनी भटक्या अस्पृश्य लोकांना जागा देवून वसाहत निर्माण केली. गवताची कुरणे उभा करुन रेसच्या घोड्यांची पैदास केली. इथेच बरेच रानटी पशु असायचे. महाराज आठवड्यातून तीनचार दिवस या सोनतळी कॅम्पवर मुक्कामाला असायचे.

याच बंगल्याच्या आवारात प्रवेशद्वारावरच ही घसरगुंडी आहे. लहान मुलांना बागेत खेळण्यासाठी असते त्या धर्तीची, बरोबर काटकोनाकृती भरीव दगडी बांधकामाची सुमारे वीस फूट उंचीची, चार फुट रुंदीची अशी दगडी घसरगुंडी आहे.

याचा वापर महाराज कशासाठी करत असत ? 

याबाबतची अधिक माहिती शाहू महाराज स्मृतीदर्शन या हिंदूराव साळुंखे यांच्या पुस्तकात दिलेली आहे. लेखकांनी स्वत: या ठिकाणास भेट देवून माहिती घेतली. त्यात ते काय म्हणतात ते त्यांच्याच भाषेत ऐकू. 

मी या ठिकाणी भेट दिली. महाराजांच्या नोकरीत असलेला एक वृद्ध तिथे मला भेटला. त्याच्यासोबत बंगला पाहीला. त्याने सर्व माहिती सांगितली. महाराजांची घसरगुंडी पाहिली.  महाराजांची उंची सहा फूट चार इंच तर होते. त्यांचे वजन सतत वाढतच रहायचे. डॉक्टरांनी त्यांना वजन कमी केले नाही तर प्रकृतीस धोका आहे असे सांगितले होते. त्यासाठी ते अनेक तऱ्हेचे व्यायाम करायचे.

घसरगुंडीचा व्यायाम प्रकार देखील यातलाच.

एका बाजूने महाराज दगडी पायऱ्या दोन्ही लोखंडी नळ्यांना धरून वर चढत. वरच्या मध्यावर थोडे थांबत व दूसऱ्या गुळगुळीत घसरणीवरून लोखंडी नळ्यांना धरून खाली येत. प्रत्येक वेळी थोडा थोडा वेग वाढवीत. अंगात सदरा व खाली लुंगी असे.

घामाने सदर चिंब भिजल्यानंतर दूसऱ्या बाजूने उतरताना बसून घसरत खाली येत, हा व्यायाम अंगातील घामाच्या धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यन्त चाले. खाली एक हुजऱ्या एक टॉवेल आणि दूसरे कपडे घेवून सज्ज असे.

म्हणजे घसरगुंडी ही शाहू महाराजांनी व्यायामासाठी करुन घेतली होती, हे स्पष्ट आहे.

परंतु विरोधकांच्या कल्पक डोक्यातून घसरगुंडीसंबधी कोण अद्भूत कहाण्या पसरवण्यात आल्या. अव्वल दर्जाच्या कांदबरीलाही या लाजवतील अशा आहेत. पण त्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी वारंवार सिद्ध झालेले आहे.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Anil says

    So Brahmin polytics again.
    Impartial comitee should be formed to find out truth.

  2. Kedar Khadake says

    मस्त ईतीहास

Leave A Reply

Your email address will not be published.