म्हणून शाहू महाराज गेल्यानंतरही त्या व्यक्तिला महिना पन्नास रुपये मिळत राहिले

राजकारण म्हणजे पैसे मिळवण्याचा उद्योग. पण ज्या काळाविषयी आपण बोलत आहोत तो काळ वेगळा होता. त्या काळात राजकारण म्हणजे घरदार सोडून भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता.

माणूस राजकारणाच्या नादाला लागला तर उपाशी मरायचा असा तो काळ.

किर्तीवानराव निंबाळकर हा सामाजिक कार्यकर्ता होता. चांगल्या सरकारी हुद्यावर होता. नाशिक जिल्ह्यात पोलिस इन्स्पेक्टर म्हणून काम करत असे. दांडगा पगार व वारेमाप अधिकार अस या नोकरीचं स्वरूप होतं.

पण या माणसाचं मन नोकरीत रमेना. महात्मा फुले, महात्मा गांधी यांचे विचार आणि समोर ब्रिटीश सरकार याचा ताळमेळ बसला नाही आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून हा माणूस पुन्हा आपल्या गावी म्हणजे कोल्हापूरात आला.

बहुजन समाजाची सेवा करायची हे व्रत घेवून निंबाळकर ब्राह्मणेत्तर पक्षात डेरेदाखल झाले. श्रीपतराव शिंदे, गणपतराव कदम, बाबुराव यादव इत्यादी मंडळींसोबत आत्ता पुढील आयुष्य समाजासाठी वाहून घ्यायचं ठरवलं.

एक ध्येयवादी तरूण चांगल्या पगाराची नोकरी सोडून राजकीय पक्षात दाखल झाल्याची ही माहिती शाहू महाराजांच्या कानावर गेली.

ही खबर ऐकताच महाराज अस्वस्थ झाले. त्याचं ठिक आहे पण त्याच्या बायकापोरांनी काय चूक केली. सगळी नाटकं करता येतात पण पैशांचे नाटक करता येत नाही. त्याची नोकरी गेली आत्ता बायकापोरांनी काय खायचं. महाराजांची चिंता प्रामाणिक होती.

जेव्हा पैशाचा विचार येईल तेव्हा जवळचे लांब होतील हे महाराजांनी जाणलं आणि किर्तीवानराव निंबाळकरांना राजवाड्यावर बोलणं धाडलं.

महाराजांचा निरोप ऐकून निंबाळकर धावतच राजवाड्यावर आले.

निंबाळकरांना पाहताच महाराज म्हणाले, काय रे तुझ्या पक्षाचं काम कस चाललंय?

निंबाळकर छान चाललंय म्हणाले. तोच महाराज म्हणाले,

अरे तू पक्षासाठी त्याग करशील, प्रसंगी तू मरावयासदेखील तयार होशील परंतु तुझ्या बायकापोरांनी काय पाप केलय. त्यांना कसे जगवायचे. काय खायला द्यायचे याचा विचार केलायस.

या प्रश्नाचं उत्तर नसल्याने निंबाळकर खाली मान घालून उभा राहिले.

महाराज म्हणाले,

तुझ्या कुटूंबासाठी मी तुला दरमहा पन्नास रुपये चालू करतो. तुझे तू काहीही कर तुझ्या बायकोला आणि पोरांना मी उपाशी मरू देणार नाही.

महाराजांचे हे शब्द ऐकताच निंबाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या पश्चात देखील पन्नास रुपये मिळत रहावेत म्हणून महाराजांनी ही रक्कम खाजगी तिजोरीतून न देता सरकारी तिजोरीतून देण्याची आज्ञा केली.

हे फक्त एक उदाहरण होतं. महाराजांमुळे अशी कित्येक माणसं जगू शकली व आपआपल्या क्षेत्रात काहीतरी करू शकली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.