एक राजा धान्य खरेदीसाठी दुकानाच्या फळीवर ताटकळत बसून राहतो…

१९१८ साली कोल्हापूर राज्यातील अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. भाववाढीमुळे गोरगरीब जनतेच हाल हाल होवू लागलं.

अशा वेळी राज्यातला अन्नधान्याचा तुटवडा दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरातल्या नगर सभागृहात सर्व धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

व्यापाऱ्यांनी तात्पुरते ना नफा ना तोटा तत्वावर धान्य विकावे असे सांगण्यात आले. म्हैसूरच्या राजास पत्र पाठवून योग्य दरात धान्याची पोती द्यावीत अशी मागणी करण्यात आली.

तरिही राज्यातला धान्याचा तुटवडा दूर होण्याची चिन्हे दिसत नव्हती.

म्हणून महाराजांनी धान्य पुरवठा संस्था स्थापन केली. महाराज स्वत: या संस्थेचे अध्यक्ष झाले तर बापूसाहेब या संस्थेचे उपाध्यक्ष झाले. याचा योग्य तो परिणाम होवून लोकांना धान्य मिळू लागले पण वरून होणारा पुरवठ्याची किंमत वाढल्याची चिंता दूर होत नव्हती.

धान्य स्वस्त:त मिळावे यासाठी महाराजांचे प्रयत्न चालू होते.

यासाठी महाराज स्वत: मुंबईला गेले.

एका व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध आहे याची माहिती महाराजांना मिळाली. महाराज अत्यंत साध्या वेषात या दुकानात गेले.

आपली ओळख लपवून साध्या कपड्यात ते दुकानात शिरले व धान्याबाबत चौकशी करू लागले. तेव्हा महाराजांना दूकानातील व्यक्तीने सांगितले की,

आमचे मुनीम माडीवर एका गिऱ्हाईकाशी बोलणी करत आहेत. तोवर आपण बसून रहा.

महाराज दुकानातील फळीवर अर्धा तास बसून राहिले. त्यानंतर मुनीम आला व महाराजांनी धान्याचे दर ठरवून घेतले.

धान्याचा सौदा झाल्यानंतर तिथे काही व्यापारी आले व त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना ओळखले.

खुद्द कोल्हापूरचे महाराज समोर आहेत आणि त्यांना आपण दुकानाच्या फळीवर बसून वाट पहायला लावल्याचं लक्षात येताच मुनीम वरमला. माफी मागू लागला. सर्व व्यापारी व सर्व नोकरांनी महाराजांना वाकून नमस्कार केला. हा सौदा करून महाराज कोल्हापुरमध्ये आले.

पुढे महाराज हा किस्सा सांगताना म्हणाले,

त्या व्यापाऱ्यांना माहित असते मी कोल्हापूरचा महाराज आहे तर त्यांनी धान्याचे दर वाढवून सांगितले असते. म्हणूनच मी साध्या वेषात जावू स्वस्त:त धान्य घेवून आलो.

ही गोष्ट अनेकांना साधी वाटू शकते पण विचार करा याच काळात आपल्या राजपदाचा अभिमान बाळगत शौकमिजाशी करणारे राजे अनेक होते आणि त्याचकाळात,

गरिबांना स्वस्त:त धान्य मिळावं म्हणून आपलं राजमुकूट बाजूला ठेवून फळीवर ताटकळत बसणारा एकमेव राजा होता. म्हणूनच शाहू राजांना रयतेचा राजा हे नाव सार्थ ठरतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.