फुटक्या काठाचं मडकं म्हणून हिणवलेल्या पोरावर राजांचा हात पडला अन् तो बालगंधर्व झाला

माणसाच्या अंगी जर कलागुण असले तर तो आयुष्यात या कलागुणांच्या जोरावर यशस्वी होऊ शकतो, असं म्हणतात. पण कधीकधी आपल्या आत काहीतरी दडलेलं आहे याचीच कल्पना बहुतांश वेळा माणसाला नसते.

हिंदी मध्ये एक म्हण आहे ‘हीरे की पहचान जौहरी ही जानता है’. महाराष्ट्राच्या मातीत बालंगधर्वांसारखा असाच एक हिरा होऊन गेला. परंतु या हि-याच्या अद्वितीय प्रतिभेची ओळख सर्वप्रथम झाली ती शाहू महाराजांना.

योगायोग म्हणजे या दोन्हीही असामान्य व्यक्तिमत्वांची आज जयंती आहे.

बालगंधर्व आणि शाहू महाराज या दोघांची पहिली भेट झाली ती पंडीत गुरुमहाराजांच्या वाड्यात. शाहू महाराज एकदा पंडीतजींना भेटायला गेले असता तिथे त्यांना साधारण आठ-नऊ वर्षांचा एक देखणा आणि चुणचुणीत मुलगा दृष्टीस पडला. महाराजांनी पंडीतजींकडे या मुलाची चौकशी केली.

हा मुलगा म्हणजे नारायण.

शाहू महाराजांनी कौतुकाने नारायणाला गाणे म्हणायला सांगीतले. छोट्या नारायणाने एका कानावर हात ठेऊन तन्मयतेने गाणं गायला सुरुवात केली.

नारायणाच्या गळ्यातुन निघालेलं सुरेल गाणं शाहू महाराज तल्लीनतेने ऐकत होते. गाणं झाल्यावर शाहू महाराजांनी ‘हा मुलगा एका कानावर हात ठेऊन गाणं का गातो’ असं पंडीतजींना विचारलं. तेव्हा नारायणाचा एक कान दुखावला गेला असल्याने त्याला त्या कानाने ऐकायला कमी येते, असं पंडीतजींकडून महाराजांना कळालं.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, त्याप्रमाणे छोट्या नारायणाच्या अलौकिक प्रतिभेची शाहू महाराजांना जाणीव झाली. त्यांनी त्याक्षणी शिफारस करुन मिरजेला असलेल्या मिशन हाॅस्पीटलच्या डाॅक्टर व्हेल्स यांच्याकडे नारायणाच्या कानावर उपचार करण्याची व्यवस्था केली.

मिरजेलाच मुक्कामी असलेल्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’मध्ये नारायणाच्या राहण्याची सोय त्यांनी करुन केली. किर्लोस्कर नाटक मंडळीने गतवर्षीच नारायणरावाच्या गाण्याची चाचणी घेतली होती व फुटक्या काठाचं मडकं म्हणून त्याची बोळवण केली होती.

मात्र वर्षाभरात नारायणरावांने चांगली प्रगती केली होती.

कानावर उपचार घेण्याच्या निमित्ताने किर्लोस्कर कंपनीत राहून अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली छोटा नारायण गायनाचे धडे गिरवू शकेल. आणि यातुनच तो मोठा गायक होईल, असा शाहूमहाराजांचा यामागे हेतू होता.

बालगंधर्वांनी जेव्हा किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला त्या वेळेस कंपनीची आर्थिक स्थिती तितकी चांगली नव्हती. कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीतील ज्येष्ठ मंडळींना स्वतःच्या गायनाने नारायणाने प्रभावित केले. आवाज चांगला, दिसायलाही देखणा यामुळे स्त्री भूमिका करण्यासाठी नारायणाला विचारणा झाली. नारायणाने सुद्धा होकार दिला.

हि गोष्ट नारायणाच्या घरी कळाली आणि घरच्यांनी मात्र विरोध केला. यावेळेस नारायणाच्या या निर्णयाला शाहू महाराजांनी पाठिंबा दिला. खुद्द शाहू महाराजांची सहमती आहे, असं कळाल्यावर नारायणाच्या कुटूंबाचा विरोध मावळला.

पुढे भारतीय संगीत नाटकांमध्ये नारायण ‘बालगंधर्व’ म्हणुन प्रसिद्धीस आले. ‘सिंधु’, ‘शकुंतला’, ‘कान्होपात्रा’, ‘भामिनी’ अशा अनेक भूमिका बालगंधर्वांनी स्वतःच्या गायनाने आणि अभिनयाने अजरामर केल्या.

या प्रत्येक वाटचालीत वेळोवेळी शाहू महाराज एखाद्या वडीलासारखे बालगंधर्वांच्या पाठीशी होते.

जेव्हा ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’त मतभेद झाले तेव्हा बालगंधर्वांनी हि कंपनी सोडण्याचा निर्णय घेऊन ‘गंधर्व नाटक मंडळी’ची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी शाहू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते वाड्यावर आले.

महाराजांनी सदिच्छा देऊन कपडेपट आणि इतर आर्थिक गोष्टींसाठी बालगंधर्वांना मदत केली.

शाहू महाराज हे मनाने दर्दी रसिक आणि कलाकारांचे चाहते होते. बालंगधर्वांच्या नाटकांच्या अनेक प्रयोगांना ते आवर्जुन जायचे. शाहू महाराजांनी हेतुपूर्वक जर त्यावेळेस गंधर्वांना मिरजेला कानांवर उपचार करण्यासाठी पाठवलं नसतं तर भारतीय संगीत रंगभुमी बालगंधर्वांसारख्या मोठ्या कलाकाराला मुकली असती.

बालगंधर्वांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे खूप योगदान आहे. बालगंधर्वांनी सुद्धा शाहू महाराजांचा कायम आदर केला.

असामान्य प्रतिभेने लोकांच्या मनावर राज्य करणारे बालगंधर्व तसेच कला आणि कलाकारांना कायम राजाश्रय देणारे शाहू महाराज, या दोघांनाही जयंतीनिमित्त ‘बोल भिडू’ तर्फे विनम्र अभिवादन !

– भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.