शेतकऱ्यांना नांगर मिळावा म्हणून तोफा वितळवण्याची आज्ञा देणारे राजर्षी

पहिल्या महायुद्धाचा काळ होता. कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज हे गोरगरिब आणि अडल्यानडल्यासाठी एकमेव आशेचा किरण होता. जागतिक मंदीमुळे इथे दोन वेळच्या खाण्याची पंचायत झाली होती. अशा वेळी राजर्षी शाहू महाराज मुंबईत व्यापाऱ्यांच्या बैठका घेवून पदरमोड करुन लोकांना स्वस्त धान्य मिळवून देत होते.

याच काळ किर्लोस्करच्या माळरानावर लोखंडी नांगराने जन्म घेतला होता. शेतकऱ्यांना लोखंडी नांगराच महत्व कळू लागलं होतं. लोखंडी नांगराचा खप वाढू लागला तोच पहिल्या महायुद्धास सुरवात झाली.

लोखंडी माल पुर्वी परदेशातून येत असायचा. त्यावर परिणाम होवू लागला. एकएक करत अनेक कारखाने बंद होवू लागले. किर्लोस्करांच्या कारखान्याला लोखंड मिळायचे बंद झाले. नांगराला लागणाऱ्या पट्या, फाळ, पाटी, मधले भाग हे सर्व इंग्लड आणि जर्मनीतून यायचे. ते बंद झाले. आत्ता लोखंडी नांगर बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

अशा परिस्थितीतून मार्ग काढत लक्ष्मणरावांनी पुण्यातल्या एका पारशी व्यापाऱ्याला गाठले. त्याच्याकडून बिडाची मोड मागण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांची थोडी गरज भागू लागली पण हे कायमस्वरुपी होणारे नव्हते.

अशा वेळी किर्लोस्करांच्या लक्षात आलं की,

पूर्वीच्या काळच्या तोफा किल्यांवर आहेत. काही तोफा किल्यांवरुन खाली पडालेल्या देखील आहेत. त्या तोफा वितळवून त्याचे नांगर तयार करता येतील. अशी कल्पना लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या मनात आली.

पण या तोफा मिळतील कशा ?

टेक्निकल स्कूलचे कात्रे सुपरिटेंडेंट हे किर्लोस्करांच्या परिचयाचे होते. त्यांच्याशी संपर्क साधून श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्यासमोर ही समस्या मांडण्यात आली. बापूसाहेबांनी किर्लोस्कर यांना राजवाड्यावर घेवून जायची तयारी दाखवली.

ठरल्याप्रमाणे बापूसाहेब हे किर्लोस्करांना घेवून राजवाड्यावर गेले. बापूसाहेब महाराजांना म्हणाले,

किर्लोस्कर कारखान्याची मंडळी आली आहेत.

काय म्हणणं आहे त्यांच, महाराजांनी विचारलं.

त्यांना आपल्या किल्यावरील तोफा पाहीजे आहेत.

तोफा ? काय त्यांना आमच्याविरुद्ध बंड बिंड करायचे आहे काय ?

बापूसाहेब म्हणाले,

महायुद्धामुळे लोखंड मिळत नाही. तोफापासून ते नांगर करणार आहेत.

अस्स अस्स. म्हणजे शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत या तोफा. देऊन टाका. किर्लोस्कर माणूस शहाणा आहे. शेतकऱ्यांचे काम सोपे होण्यासाठी झटत आहे.

सरकारस्वारींची आज्ञा. ताबडतोब अंमलबजावणी झाली. संस्थानातील किल्ल्यावरच्या तोफा गोळा करुन त्या रेल्वे वाघिणीमधून किर्लोस्करवाडीला घेवून जाण्यात आल्या. त्या तोफा वितळवून नांगर करण्यात आले, व ते शेतकऱ्यांच्या उपयोगी पडले.

आज अनेकजण शाहू महाराजांचा ब्राह्मण समाजाला विरोध होता असा खोटा प्रचार करतात. पण महाराजांच्या या कृतीतून दिसून येत की समाजाच्या भल्यासाठी काम करणारा मग तो कोणत्याही जातीचा मनुष्य असो महाराज त्याच्या पाठीमागे भक्कम उभे रहात. महाराजांचा विरोध ब्राह्मण समाजाला नव्हता तर जातीव्यवस्थेला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.