शाहू महाराजांचे हे 3 किस्से ; जे वाचल्यानंतर समजतं महाराज किती मोठ्ठे होते…

आज शाहू महाराजांची पुण्यतिथी. महाराजांवर कायतर लिहावं, त्यातून शाहू महाराजांचं कर्तृत्व सांगावं हा विचार समोर आला. पण झालं असं, की एखाद्या माणसानं एखादं काम केलेलं असेल, तर ते सांगणं सोप्प पडतं. पण इथं गोष्ट वेगळी होती. समोर शाहू महाराज आणि त्यांनी उभारलेल्या कामाचा प्रचंड डोंगर होता.

एक माणूस एकाच आयुष्यात काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसानं शाहू महाराजांकडं बोट दाखवावं अस त्यांचं आयुष्य. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं काम, त्यांच्या गोष्टी आणि त्यांचं कर्तृत्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. 

पहिली गोष्ट महाराज शिकारीला गेल्यानंतरची.

महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सश्याच्या कानाला धरून दूर उभा राहीलेला महाराजांना दिसला. महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं, पारधी म्हणाला, ‘म्हाराजा, तुझ्यासाठी मी ह्यो ससा मारून आणलाय. याचं कोरड्यास करुन जेव.’ हुजऱ्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं. दूपारी महाराजांच्यासह सगळे जण जेवायला बसले.

इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली. तो कुठं दिसना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली. पारध्याला शोधून त्याला महाराजांकडं आणण्यात आलं.

महाराज पारध्याकडे पहात हुजऱ्यांना म्हणाले, “याला पान करून जेवायला बसवा.”

इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला, “महाराज याला कोठे बसवू? त्या झाडाखाली ?”

महाराज म्हणाले,” याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसवू का म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव.”

त्या दिवशी एक पारधी छत्रपती शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला.

दूसरी गोष्ट पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगातली, 

महायुद्धाच्या दरम्यान कुट-एल आमारा इथं हिंदी फौजा तुर्की वेढ्यात अडकल्या होत्या. सैन्याची संपुर्ण रसद संपली होती. आता घोडे मारून खाण्याची वेळ आली. पण हिंदी शिपायांनी घोडे खाण्यास नकार दिला. ते म्हणाले आम्ही घोडे खाल्ले तर पुन्हा हिंदूस्थानात गेल्यानंतर लोक वाळीत टाकतील. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना लेखी खलिता पाठवून संपुर्ण प्रकार कळवला.

शाहू महाराजांनी हिंदी फौजांना निरोप पाठवला, “तुम्ही खुशाल घोड्याचं मांस खा. तुमच्या जातीपातीच्या, लग्नकार्यांची जबाबदारी मी घेतो. प्रसंगी तुमच्या परिवारातल्या आणि माझ्या संबधितामधल्या कुटुंबीयांमध्ये सोयरिकीची हमी मी घेतो.”

हा खलिता लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी फौजांना वाचून दाखवला तेव्हा भुकेनं व्याकुळ झालेल्या फौजेनं एकच जयघोष केला. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. शाहू महाराजांचा धर्माहून मोठा असणारा पगडा पाहून ब्रिटिश अधिकारी आश्यर्यचकित झाले.

तिसरी गोष्ट जातीतून बाहेर काढणाऱ्यांची महाराजांनी कशी जिरवली त्याची.

१९०५ च्या जुलै महिन्यात महाराज नव्या राजवाड्यातून आपल्या फोर्ड मोटारीतून बाहेर पडले. गाडी चालवायला लिंगायत समाजाचा तरुण पोऱ्या होता. काही अंतरावर मोटारगाडीनं रस्ता सोडला आणि शेतवडीच्या तुंबलेल्या चिखलाच्या डबऱ्यात पडली.  महाराज खाली पडले ते थेट चिखलात.

चिखलानं महाराज राड झाले. क्षणात संताप अनावर झाला आणि या संतापातच महाराजांनी ‘घातलस मला खड्ड्यात’ असं म्हणत त्या तरूण मुलाच्या पाठीवर चपलेनी तडाखा दिला. महाराज स्वत: ड्रायव्हिंग करत निघून गेले.

दूसऱ्या दिवशी महाराजांच्या गाडीवर नवीन ड्रायव्हर होता. आपल्याला आलेल्या क्षणिक रागातून त्या मुलाला मारल्याचं महाराजांना वाईट वाटतं होतं. तो दिसला नाही, तेव्हा महाराजांनी त्या पोऱ्याला बोलवून घेतलं, तर तो रडत समोर आला.

 महाराज म्हणाले, “का रं का रडतूयस ?”

पोरगा म्हणाला, “महाराज तुम्ही मारलं त्याचं मला कायबी वाईट वाटत न्हाय. पण लिंगायत समाजात चपलेचा मार खाल्ला की तोंड बघत नाईत. जातीत घेत नाईत.

आता मी काय करावं?” 

महाराजांनी लागलीच म्हैसकर फौजदारांना बोलावून घेतलं आणि फौजदारांना म्हणाले, या पोराचे नातेवाईक आणि जातीचे पुढारी यांना आज सायंकाळी पापाच्या तिकटीसमोर जमा करा. सोबत शेणकाल्यानं भरलेली बादली आणि फाटके पायताण आणा.

संध्याकाळी लिंगायत जातीची ७०-७५ पुढारी मंडळी पापाच्या तिकटीला जमली. महाराज आले. महाराजांच्या सुचनेनुसार जमलेल्या पुढाऱ्यांना पायतानाचा एक एक तडाखा मारण्यात आला. जमलेले पुढारी म्हणाले, “महाराज आम्ही काय केलं? आम्हाला अशी शिक्षा का?”

तेव्हा महाराज म्हणाले, रागाच्या भरात आम्ही ड्रायव्हर पोरावर चप्पल उगारली. त्याची शिक्षा त्याला जातीतून बाहेर काढायची देता. आता सगळ्यांचीच जात बिघडली आहे…

फासेपारधी समाजाच्या मांडीला मांडी लावून पंगतीला बसणारे शाहू महाराज, कोणत्याही अस्मितेपक्षा, जातीपेक्षा पोटाचा प्रश्न समजणारे शाहू महाराज, चपलीचा मार बसला म्हणून जातीतून बाहेर काढणाऱ्या पुढाऱ्याची जिरवणारे शाहू महाराज…

महाराजांनी नेमकं काय केलं सांगायचं, तर आकडेवारीत सांगतो. १८९४ साली कोल्हापूर संस्थानात ब्राह्मणेत्तर विद्यार्थी संख्या ८ हजार ८८ होती, ती १९२१-२२ साली २१ हजार २७ इतकी झाली.अस्पृश्य विद्यार्थी संख्या १८९४ साली २३४ इतकी होती, ती १९२१-२२ साली २ हजार १६२ इतकी झाली.

अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे शाहू महाराज गेले, त्या दिवशी पंचगंगेच्या तीरावर राजकुलाच्या स्मशानभूमीत शाहू महाराजांची महायात्रा पोहचली.

पूर्वीच्या परंपरेनुसार छत्रपतींचे अंत्यसंस्कार ब्राह्मण पुरोहितांकडून न करता, जुलमी पुरोहितशाहीचे उच्चाटन करण्यासाठी, निकराची झुंज देऊन ज्या प्रतिमराठा पुरोहितांची योजना शाहू महाराजांनी केली होती, त्या योजनेतील वैदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थांकरवी महाराजांचे अत्यसंस्कार पार पाडले.

रुढीभंजक निर्णय आपल्या मृत्यूनंतरही अंमलात येईल याची तरतूद शाहू महाराजांनी केली होती. म्हणूनच महाराज ग्रेट होते. लोकं येतील जातील पण असा लोकराजा होणं शक्य नाही, ते यामुळेच…

बोल भिडू तर्फे छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.