कोल्हापूरला उद्योगनगरी बनवण्याचं श्रेय देखील राजर्षी शाहू महाराजांना जातं

स्वतंत्र भारतामध्ये विलीन होईपर्यंत कोल्हापूरने राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विशेषता विसाव्या शतकाच्या मध्यानंतर कोल्हापूरने औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली. भारताच्या उद्योग नकाशावर आपले ठळक असे अस्तित्व निर्माण केले. पण यासाठीची जी मुहूर्तमेढ रोवली ती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी.

आधुनिक कालखंडामध्ये १८८४ साली कोल्हापूर संस्थानचे छत्रपती म्हणून अधिकार प्राप्त झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.

आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सामाजिक सुधारणा शेती, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव अशी प्रगती केली होती. त्यामध्ये १८९१ मधलं मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्ग, श्री छत्रपती मिल्स राधानगरीचे धरण इत्यादींचा समावेश होता.

कोल्हापुरातल्या उद्योग नगरीच्या पायाभूत उभारणीचे श्रेय पण सर्वस्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनाच दिले जाते.

औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीला त्यांनी दिलेला राजाश्रय आणि प्रोत्साहन यामुळे १९०६ मध्ये कापड उद्योगातली मोठी गिरणी ‘शाहू छत्रपती मिलची’ स्थापना झाली. शाहू मिलची स्थापना करून परिसरात उद्योग धंदे सुरू व्हावेत हा हेतू महाराजांचा होता.

कारण संस्थान काळात काही मोजक्याच उद्योगांचे अस्तित्वात होते. त्यामध्ये तेल काढणे, पोहे चुरमुरे उत्पादन, आयुर्वेदिक औषध निर्मिती, तपकीर, साबण, आगपेटी, सिमेंट प्रक्रिया, बेकरी आणि मोटारकार दुरुस्ती इत्यादींचा समावेश होतो.

फौंड्री उद्योग कोल्हापूर मध्ये सुरू व्हावा अशी राजर्षी शाहू महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी निपाणी मधील यमाजी आनंदराव आंबले यांना कोल्हापुरात बोलवून घेतले. यमाजी आंबले हे तेव्हाचे मॅकेनिकल इंजिनिअर होते. शहरात नवीन उद्योग सुरू व्हावा यासाठी महाराजांनी शहरातील बागल चौकांमध्ये आंबलेंना मोफत भूखंड देऊन फौंड्री उद्योगाचा पाया घालण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आंबले यांनी फौंड्रीची स्थापना करून बैलांच्या साह्याने चालवण्यात येणाऱ्या उसाच्या चरकाचे उत्पादन सुरू केले. पण दुर्दैवाने १९२० मध्ये फौंड्रीत काम करत असताना आंबले यांना अपघात झाल्याने हा प्रयोग तिथेच थांबला.

दरम्यान हा प्रयोग जरी थांबला असला तरी बागल चौकाच्या आसपासच्या परिसरात इतर उद्योग सुरू व्हायला लागले होते. यात लेथ मशीन, शेपिंग मशीन अशी छोटीमोठी वर्कशॉप्स सुरू करण्यात येत होती.

या उद्योगांची संख्या वाढून १९४७ दरम्यान १३५४ इतकी झाली होती. आणि याच दरम्यान कोल्हापूरच्या उद्यामनगरीचे नाव शिवाजी उद्यामनागर पडले.

कोल्हापूरच्या उद्यामनागरीच्या उभारणीमध्ये शिवाजी टेक्निकल स्कुलचा पण मोठा वाटा आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वारस छत्रपती राजाराम महाराज यांनीही शाहूं सारखी दूरदृष्टी ठेऊन उद्योग विस्ताराचे धोरण अवलंबिले. शेती आणि उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ओब्रायन टेक्निकल स्कुल, शिवाजी टेक्निकल स्कुल अशा तंत्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांची स्थापना केली. याचा परिणाम असा झाला की, कोल्हापूर शहरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले कामगार हे कौशल्यपूर्ण कामासाठी या तंत्रशिक्षण संस्थांमधून शिकून येत असत. या संस्थांनी कष्टाळू आणि कल्पक कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिलं.

अशाप्रकारे आज कोल्हापूरची जी औद्योगिक क्षेत्रातील ओळख आहे, ती ओळख निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहूंनी प्रयत्न केले. आणि उद्यमनगरीला आकार दिला.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.