भारतातून परदेशी जाणारा पहिला मल्ल देखील शाहू महाराजांचा पठ्ठ्या होता…

शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. कोल्हापूरच्या तरण्याताठ्या पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली.

विशेष म्हणजे, २००० साली कोल्हापूरच्या विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर २२ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा आज कोल्हापूरात गेली. यंदा साताऱ्यात झालेल्या स्पर्धेबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही स्पर्धा झाली साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलात. विजयी पृथ्वीराज हा राजर्षी शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल. उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर हा श्री शाहू विजयी गंगावेश तालमीचा पठ्ठ्या. दोन्ही तालमी कोल्हापुरातल्या, दोन्ही तालमी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाच्या!

कित्येक वर्ष उलटली, तरी आजही शाहू महाराज आणि कुस्ती हे समीकरण कायम आहे आणि राहीलही.

भारतात दक्षिणेतली कुस्तीची राजधानी कोल्हापूर मानली जाते. एक काळ उत्तरेतल्या पहिलवानांनी गाजवला. इंग्रजांच्या काळात कुस्तीची वाताहात झाली. उत्तरेत पटियाला नरेश आणि दक्षिणेत कोल्हापूरचे शाहू महाराज या दोघांनी कुस्तीला हात दिला. या दोघांमुळे कुस्ती जगली आणि वाढली असं म्हटल तर चुकीच ठरणार नाही.

शाहू महाराजांनी ठरवलेलं आपल्या भागातल्या पोरांच्यात सुद्धा रुस्तुम ए हिंद बनायची ताकद आहे. त्यांना एक वाट दाखवली की झालं. आता स्वतः शाहू महाराजांच्या मनात आलं म्हटल्यावर हे कार्य सिद्धीस जाऊन मगच थांबणार हे अटळ होत.

तसं महाराज स्वतः पट्टीचे पहिलवान होते. त्यांनी लहानपणी अस्वलाशी कुस्ती खेळून त्याला हरवलं अशी आख्यायिका त्याकाळात फेमस होती. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी बघता ते खरच घडलंही असू शकत अस पाहणाऱ्याला वाटे.

महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर भागात गावोगावी, गल्लोगल्ली तालमी उभ्या राहिल्या.  सर्व जातीधर्माच्या मल्लांना महाराजांनी आश्रय दिला. उत्तर-दक्षिण, हिंदू-मुस्लीम असा कोणताही भेद केला नाही. त्यांच्या खास मल्लामध्ये देवाप्पा धनगर, शिवाप्पा बेरड,काका पंजाबी, व्यंकप्पा बुरुड, पांडू भोसले, कमरुद्दीन, गोविंद कसबेकर, गामा बालीवाला, कृष्णा बारदाने असे अनेक बुरुजबंद पहिलवान होते. या सगळ्या मल्लांच्या खुराकापासून त्यांच्या व्यायाम उस्तादांचे प्रशिक्षण या सगळ्याकडे महराजांचे जातीने लक्ष असायचे.

याच यादीत एक नाव होतं पैलवान दिनकरराव शिंदे

दिनकरराव म्हणजे कोल्हापुरातील शिवाजी पेठेत दि. २ जून, १९०० रोजी जन्मलेला बावडेकर तालमीचा पैलवान. नामवंत वस्ताद लगडे, तसेच सुप्रसिद्ध सिनेनट सरदार बाळासाहेब यादव यांनी लक्ष देऊन त्यांना तयार केले. पंजाबचा सुप्रसिद्ध पैलवान गुलाम मोहिद्दीन खलिफा यांचे बरोबर नंबर एकच्या बंगल्यावर कुस्तीच्या शिक्षणासाठी रोज जाऊन कुस्तीमधील डावांची त्यांनी माहिती घेतली होती.

त्याकाळात पैलवान दिनकर शिंदे आणि महादू हांडे ही कुस्ती फार गाजली होती.या कुस्तीत दोघे ही जोडीस जोड आणि तोडीस तोड होते. त्यामुळे ही कुस्ती निकाली झाली नव्हती .

स्वतः शाहू महाराजांनी या दोघांची कुस्ती बरोबरीत सुटल्याच जाहीर केलं.

दिनकरराव शिंदेंचं कौशल्य पाहून महाराज इतके प्रभावित झाले त्यांनी दिनकररावांना खास आपल्या आश्रयाखाली नव्या राजवाड्यावर ठेवून घेतले. त्यांच्या प्रशिक्षणापासून ते खुराकापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे शाहू महाराजांनी जातीने लक्ष दिलं.  

सन १९२० मध्ये पुणे डेक्कन जिमखान्यावर वजनावर कुस्त्या झाल्या होत्या. त्यामध्ये लाईट वेट (११० पौडाखाली) मध्ये त्यांनी चॅम्पियनशिप मिळविली. त्यावेळी सुप्रसिद्ध नट बालगंधर्व यांनी त्यांना सोन्याचे मेडल बक्षीस दिले होते. 

पुण्याच्या डेक्कन जिमखान्यातर्फे १९२० साली बेल्जियमची राजधानी अँटवर्प येथे भरलेल्या जागतिक कुस्ती सामन्यासाठी त्यांची निवड झाली. भारतातून पहिल्यांदा परदेशी जाणारे कोल्हापूरचे हे पहिले पहिलवान होत.

या स्पर्धेत एकूण पाच कुस्त्या दिनकरावांनी केल्या. त्यांपैकी चारांमध्ये ते विजयी झाले. 

इंग्लंडचा प्रसिद्ध पैलवान इनमँन हा १९१२च्या ऑलम्पिक गेम्स मध्ये चॅम्पियन शिप मिळवलेला पैलवान होता. त्याच्याशी दिनकर शिंदे यांची कुस्ती झाली होती आणि त्याला शिंदे नि अवघ्या १० मिनिटात टांगेवर चित केले होते. या कुस्तीमुळे त्यांच नाव जागतिक स्तरावर गाजलं. 

फक्त कोल्हापूरचं नाही तर भारतीय पहिलवानांसाठी त्यांनी नवीन द्वार उघडलं. 

पुण्याचा प्रसिद्ध पैलवान थोरला प्रताप (प्रताप मोरे), कुरुंदवाड चे आश्रित पैलवान तुकाराम पाटील अशा अनेक दिग्गज पहिलवानांना त्यांनी अस्मान दाखवलं. पुढे निवृत्तीनंतर पंत अमात्य बावडेकर तालमीचे वस्ताद म्हणून त्यांनी अनेक तरुण मल्लांना तयार केले. 

बेळगावमध्ये सुप्रसिद्ध रुस्तम-ए-हिंद पहिलवान इमामबक्ष व जगज्जेता गामा पंजाबी यांची कुस्ती झाली होती. त्यावेळी दिनकरावांनी पंचाचे काम पाहिले होते. जागतिक कीर्तीचे मल्ल हिंदकेसरी गणपत आदळकर यानाही त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले होते. 

आज भारताचे पहिलवान सध्या ऑलिम्पिक गाजवतात हे सगळं शक्य झालं छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेली मल्लांची परंपरा सातासमुद्रापार नेणारे दिनकरराव शिंदे यांच्यामुळे.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.