महाभारताच्या काळानंतर ‘राजर्षी’ पद बहाल केलेला एकमेव राजा ‘शाहू छत्रपती’..
राजर्षी.. राजयोगी.. शिक्षणक्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी जे काही अफाट कार्य केले, त्याला स्मरणार्थ ठेवून जनतेने शाहू महाराजांना ही मानाची पदवी बहाल केली..
कोल्हापूर संस्थानात शेतकरी, कष्टकरी, कामगारांची संख्या प्रचंड. राज्यात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी. समाजाचा सर्व स्तरावर विकास व्हावा याकडे जातीने लक्ष देणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपतींनी शिक्षणाच्या जागृतीसाठी फार मोठी पाऊलं उचलायला सुरुवात केली.
कोल्हापूर नजीक चार-पाच मैलांवर सोनतळी याठिकाणी एक खास आश्रम काढला, जो ‘सोनतळी आश्रम’ म्हणून इतिहासात अजरामर झाला. गरिबांच्या घरची मुलं या आश्रमात आणून त्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल, याकडे महाराज जातीने लक्ष देत. त्यांच्या राहण्याचा-खाण्यापिण्याचा, शिक्षणाचा सर्व खर्च महाराजांच्या खासगीतून होत असे.
सन 1901 ते 1920 या वीस वर्षांमध्ये शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी महाराजांनी प्रचंड योजना राबवल्या. प्राथमिक शिक्षण सर्व संस्थानात सक्तीचे करून टाकण्याचा राजादेश दिला.. गरीब घरचा असो किंवा श्रीमंत घरचा, प्राथमिक शिक्षण त्याला अगदी मोफत मिळेल अशीच व्यवस्था महाराजांनी केली. खेड्यापाड्यातून कोल्हापूरला विद्यार्थ्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली.
महाराजांनी संस्थानात 26 वसतिगृहाची सोय केली. महाराजांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात 32 पेक्षा जास्त वसतिगृहे उभारली. मराठी, संस्कृतसोबतच इंग्रजी भाषेचे शिक्षण आपल्या मुलांना मिळावे, त्याशिवाय विकास होणार नाही हे महाराजांनी पुरेपूर ओळखले होते आणि तशी शिक्षणाची व्यवस्था सुद्धा केली होती. विद्या शिकणे व शिकवणे, ज्ञान घेणे व देणे अशी पुरातन काळातील पद्धत होती, हे कर्तव्य ऋषीमुनी बजावत होते. पण याला अपवाद एकमेव शाहू छत्रपती. शिक्षणाच्या प्रचार प्रसारकडे जातीने लक्ष देऊन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेणारे ते पहिले राजे होते.
सन 1919 साली कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय समाजाचे अधिवेशन भरले होते. शाहू महाराजांच्या कामामुळे, लोकप्रियतेमुळे त्यांनी महाराजांना या तीन दिवसीय अधिवेशनासाठी आमंत्रित केले. गंगा आणि यमुनेच्या समृद्ध परिसरात हा समाज पिढ्यानपिढ्या शेती करतो.. त्या तेराव्या अधिवेशनाला महाराजांना बोलण्याचा प्रसंग आला, तेव्हा शाहू महाराज म्हणाले,
“तुम्ही जसे कुर्मी क्षत्रिय आहात तसा मी मराठा क्षत्रिय आहे. राजपुताण्यातील काही क्षत्रिय राजपूत राजे माझे पूर्वज आहेत, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. तुमचेही पूर्वज राजपूत घराण्यांपैकी आहेत अशी माहिती नुकतीच मला ग्रंथाद्वारे मिळाली. दिल्लीचा सुप्रसिद्ध राजा पृथ्वीराज चौहान हा कुर्मी क्षत्रिय होता, याबद्दल आम्हा सर्वांनाच धन्यता वाटते. तुम्ही आम्ही सर्व आपलेच आहात, असं समजून क्षत्रिय संघ विस्तृत व मजबूत केला पाहिजे. तुम्ही मला दिलेल्या अध्यक्षतेपदावरून मी साधार असे जाहीर करतो की, तुम्ही सर्वजण क्षत्रिय झाला आहात. आता क्षत्रिय वर्णाचे गुणकर्म तुम्ही स्वीकारा आणि आपल्या देशातील दुःखी जनतेचे रक्षण करून त्यांना मदत करण्यास कंबर बांधा.”
या भाषणाचा कुर्मी समाजावर प्रचंड परिणाम झाला. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात महाराजांनी केलेल्या प्रभावी सेवेचा आवाका परिषद चालकांच्या लक्षात आला.
त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि महाराजांचा गौरव करण्यासाठी तारीख 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांना सर्व कुर्मी समाजाच्या वतीने ‘राजर्षी’ ही पदवी देण्याचे ठरवण्यात आले. ह्या पदवीप्रदान कार्यक्रमात महाराजांना केवळ पाहण्यासाठी लोकांचा अक्षरशः महापूर लोटला होता.
रामायण काळात या पदवीचा मान विश्वामित्र आणि जनकाचा होता. महाभारत काळात सुद्धा विद्वान व्यक्तीस ही पदवी दिलेली आढळते. पण महाभारत काळानंतर तब्बल दोन हजार वर्षांनी जनतेने राजर्षी पदवी देऊन शाहू महाराजांचा प्रचंड मोठा सन्मान केला. इतिहासात घडलेली ही घटना प्रचंड मोलाची आहे.
मराठ्यांचा छत्रपती ‘राजर्षी’ झाला.
- भिडू केतन पुरी
हे ही वाच भिडू.
- कोल्हापूरला उद्योगनगरी बनवण्याचं श्रेय देखील राजर्षी शाहू महाराजांना जातं
- कुस्तीच्या आड जात येऊ नये म्हणून शाहू महाराजांनी पहिलवानांची नावेच बदलून टाकली..
- बहुजन समाजाची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी क्षात्र जगद्गुरु पिठाची स्थापना केली..