भारतातल्या एका साध्या माणसाला उचलून बांग्लादेशने ४५ वर्षांचा बदला घेतला…

ही गोष्ट सुरु होते बांग्लादेशाच्या निर्मीतीनंतर. बांग्लादेशमध्ये थोड्याच दिवसात विद्रोहींनी सरकार विरोधात बंड पुकारले. आंदोलन, निदर्शने हे चालुच होते. राष्ट्रपती होते शेख मुजीबुर रेहमान.

या आंदोलनांवर तोडगा त्यांनी म्हणून १४ जून १९७५ रोजी देशात आणिबाणीची घोषणा केली. सर्व राजकीय पक्षांवर निर्बंध लावले. सोबतच माध्यमांचे स्वातंत्र्य देखील काढून घेतले.

घोषणेच्या नंतर दोन दिवसातच मेजर सय्यद फारुख रेहमान यांनी आपल्या घरी लग्नांच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. याच पार्टीमध्ये एकाच विचारसरणीचे बांग्लादेश सेनेचे मजलूम खुदा, शरीफ हक दलिम, नुर चौधरी, एम.के. अहमद, अब्दुल राशिद, सय्यद फारुख रेहमान, मोहिद्दीन अहमद असे जवळपास सात सेना अधिकारी उपस्थित होते.

त्यातील एक अधिकारी म्हणाला,

“बांग्लादेशची अशी परिस्थिती राहिली तर आपण बरबाद होवू. काही तरी करायला हवे”

आणि त्यांनी इथेच बांग्लादेशच्या राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचला. प्लॅन नुसार अब्लुद माजिदने बंगाल लान्सर शस्त्रगारातुन रायफली आणि इतर हत्यारे घेतली.

पुढे १५ ऑगस्ट १९७५ च्या मध्यरात्री हे सात अधिकारी, सैन्यातील काही कॅप्टन, बंगाल लान्सर रिजेमेंटच्या अधिकाऱ्यांसहित त्यांनी एकुण चार गट बनविले. त्यातील एक गट शेख मुजीब उर रेहमान यांच्या घरी गेला, दुसरा त्यांच्या भाच्याच्या घरी, तिसरा बहिणीच्या घरी आणि चौथा गट काही रेहमान यांना प्रामाणिक असणाऱ्या सैनिकांच्या तळावर पोहचला.

या सगळ्याचे मास्टरमाइंड होते, फारुख रहमान.

ढाका येथील शेख मुजीब यांचे घरी सकाळी साडेपाच वाजता हे हत्याकांड सुरु झाले. पहिला बळी पडाला तो मुजीब यांचा मुलगा शेख कमाल. त्याला घरात शिरताच रिसेप्शनवरच गोळ्या घातल्या.

त्याच वेळी गोळ्यांचा पाऊस सुरु झाला. आणि रेहमान यांचे खाजगी सचिव मोहितुल यांच्या घराच्या काचा फुटल्या. मेजर नूर आणि मेजर मोहिउद्दीन प्रत्येक खोलीत रेहमान यांचा शोध घेऊ लागले. मोहिउद्दीन शिडी चढत होता तेव्हा रेहमान यांना त्यानी जिन्यात पाहिले. त्यांनी पांढरा कुर्ता आणि राखाडी रंगाची कपडे घातली होती आणि त्यांच्या हातात एक पाईप होती.

मोहिउद्दीन रहेमान यांना मारण्यासाठी पुढे सरसावला मात्र, जेव्हा त्याने रेहमान यांना पाहिले तेव्हा भितीने त्याची गाळण उडाली होती. तो एकच वाक्य म्हणत होता, सर आपनी आशुन… तेवढ्यात रेहमान ओरडले, “तुला काय हवे आहे? तू मला मारायला आला आहेस काय? ते विसर, पाकिस्तानच्या सैन्याला हे जमले नाही तर तु किस झाड की पत्ती?

मोहिउद्दीन अजून ही हडबडत होता… आणि पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होता, सर आपनी आशुन…. तेवढ्यात मेजर नूर स्टेन गन घेऊन आत आला. त्याला वाटले की रेमहान मोहिउद्दीनला चर्चेत गुंतवून वेळ वाया घालवत आहेत.

नूरने मोहिउद्दीनला त्याच्यामागे ढकलले आणि त्याची संपूर्ण स्टेन गन मुजीब उर रेहमान यांच्या शरीरात रिकामी केली.

हळू हळू रेहमान यांच्या घरातील एक – एक सदस्याला अगदी नोकरांसहित शोधून मारायला सुरुवात केली.

कोणाला बेडरुममध्ये गोळ्या घातल्या, कोणाला बाथरुम, तर रेहमान यांच्या १० वर्षाच्या नातवाला जिन्यातुन पळून जाताना गोळ्या घातल्या. सैन्याच्या चारी तुकड्यांनी रेहमान आणि त्यांच्या संपुर्ण परिवाराला संपवलं. शेख मुजीब यांना माननारे त्यांच्या पक्षाचे चार नेते ढाका सेंट्रल जेलमध्ये कैद होते. नोव्हेंबरमध्ये सैन्यातील दोन अधिकाऱ्यांनी जेलमध्ये जावून या चौघांना गोळ्या घातल्या.

यातुन दोन जण मात्र बचावले. त्या म्हणजे मुजीब उर रेहमान यांच्या मुली आणि बांग्लादेशच्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसिना आणि शेख रिहाना. त्या दोघी पश्चिम जर्मनीमध्ये शिक्षण घेत होत्या.

असं म्हंटलं जात की, सैन्याचे उपप्रमुख जियाउर रहमान यांना या प्लॅनची कल्पना होती. कारण जेव्हा त्यांना या घटनेची कल्पना मिळाली तेव्हा ते म्हणाले “त्यात एवढे विशेष काय? उपराष्ट्रपती आहेत देश सांभाळायला.

यानंतर सत्तेवर आलेल्या खोंडेकर मुस्ताक अहमद, जिया उर रेहमान, अब्दुल सत्तार, मुहम्मद इरशाद यांनी राष्ट्रपती मुजीब उर रहमान यांच्या हत्याकांडमध्ये सहभागी असलेल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना ‘देश के चमकते सितारे’ म्हणत कारवाई पासून लांब ठेवले. कॅप्टन अब्दुल माजिदला तर लिबीया आणि सेनेगल इथे विदेशी सेवेत पाठविले. त्यानंतरही ते सरकारच्या विविध पदांवर काम करत होते.

पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या हत्याकांडानंतर भारतात आश्रयासाठी आलेल्या शेख हसिना १९८१ मध्ये बांग्लादेश मध्ये परत आल्या. आणि राजकारणात सक्रिय झाल्या. त्याचवर्षी पुढे राष्ट्रपती जिया उर रहमान यांची ही हत्या करण्यात आली. पुढे अब्दुल सत्तार यांना पदावरुन हटवून तत्कालिन सैन्य प्रमुख मुहम्मद इरशाद राष्ट्रपती झाले. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये त्यांनाही उचलुन जेलमध्ये टाकले.

पुढे शेख हसिना आणि मृत राष्ट्रपती जिया उर रहमान यांच्या पत्नी बेगम खालिदा या वैयक्तिक मतभेद विसरत एकत्र आले. आणि बेगम खालिदा यांनी १९९१ ची निवडणूक जिंकत सत्ता हस्तगत केली. पुढे १९९६ मध्ये शेख हसिना यांना सत्तास्थापनेसाठी पाच जागा कमी पडत होत्या.

अशा वेळी जेलमधून निवडणूक लढविलेल्या मुहम्मद इरशाद यांनी शेख हसिना यांना पाठिंबा दिला आणि १९९६ ला पहिल्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान झाल्या.

सत्तेवर येताच पहिले काम केले ते म्हणजे वडिलांच्या हत्याकांडामधील सहभागींवरील दया मागे घेतली आणि कारवाई सुरु केली. २०१० मध्ये ५ जणांना फाशीवर लटकवले. एकाचा झिंब्बावेमध्ये नैसर्गिक मृत्यु झाला.

एक राहिलेले कॅप्टन माजिद.

१९९७ मध्येच कारवाईच्या भितीने भारतात पळून आले आणि कोलकता मध्ये अहमद अली नाव धारण करुन राहु लागले. एका झरिन नामक महिलेशी विवाह देखील केला. त्यानंतर जवळपास २३ वर्ष उलटली. भारतालाच त्यांनी आपलं घर बनवलं. आपली जूनी ओळख पुसून टाकली. त्यांच्या बायकोला देखील त्यांचा भूतकाळ ठाऊक नव्हता. 

गोळ्या आणायला जातो सांगुन फेब्रुवारीमध्ये २०२० मध्ये ते अचानक गायब झाले. दोन महिन्यांनंतर वृत्तपत्रात एक बातमी आली. ती बातमी होती, कॅप्टन माजिद उर्फ अहमद अली यांच्या अटकेची.

आपल्या बांग्लादेशमधील कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर कॅप्टन माजिद याला ढाका पोलिसांनी अटक केली होती. पुढे काहीच दिवसात म्हणजे १२ एप्रिल २०२० ला त्याला फासावर लटकवले. तब्बल ४५ वर्षांनंतर शेख हसिना यांनी आपल्या कुटुंबाच्या खुन्यांना फासावर लटवले.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.