शकिलाची क्रेझ एवढी होती की चीन मधली लोकं देखील तिचा पिक्चर डब करून बघायची..

प्रत्येकाच्या आयुष्यात बेसिक गरजा असतात. एखादी चांगली नोकरी, ऐसपैस घर वैगरे वैगरे. या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीजणं सरळ मार्गाने वाटचाल करत असतात. सरळ मार्गाने स्वत:ची स्वप्न पूर्ण करणं कोणाला नाही आवडणार? परंतु काही लोकांच्या आयुष्यात परिस्थिती इतकी बिकट होते, की पैसे कमावण्यासाठी त्यांना वेगळी वाट जवळ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.

ही गोष्ट अशाच एका स्त्री ची. सर्वसाधारणपणे महिलांच्या काही इच्छा असतात. चांगलं आयुष्य, घर, संसार, मुलं या भोवती असणारं सुखवस्तू जीवन त्यांना हवं असतं. तिलाही हेच हवं होतं. परंतु तिच्या नशिबात काहीतरी वेगळं वाढून ठेवलं होतं.

ही आहे सुप्रसिद्ध एडल्ट स्टार शकीलाची कहाणी.

९० च्या दशकात मल्याळम सिनेसृष्टीत अभिनेत्री होण्यासाठी बरीच धडपड करावी लागत होती. अशा काळात शकिलाने अभिनेत्री म्हणून एन्ट्री केली. आणि शकिला रातोरात स्टार झाली. या काळात सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून शकीला ओळखली जाऊ लागली.

शकीलाचा स्टार होण्याचा पाया तिच्या सुरुवातीच्या आयुष्यात दडलेला आहे. आंध्र प्रदेश येथील नेलोर येथे एका कट्टर मुस्लिम कुटुंबात शकीलाचा जन्म झाला. तिला एकूण सहा भावंडं. शकीलाने तिच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की,

“फार कमी वय असताना वडिलांचं निधन झालं. सगळ्या स्वप्नांचा चुराडा होऊन गरीबी आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आईच्या सांगण्यावरून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी वेश्याव्यवसाय जवळ करावा लागला. पण काहीच दिवसांत मी सिनेमात काम करण्याचा
निर्णय घेतला.”

वयाच्या १८ व्या वर्षी १९९५ साली आलेल्या “प्लेगर्ल” सिनेमात शकिला झळकली. या सिनेमाची संपूर्ण भारतात हवा झाली. यामुळे शकिलाला रातोरात प्रसिद्धी मिळाली. खूपदा कलाकारावर टाईपकास्ट होण्याचा धोका असतो. हा धोका पार केला तर कलाकाराला विविधरंगी भूमिका करता येतात. दुर्दैवाने शकीलाला हा धोका पार करता आला नाही.

आणि एक बी ग्रेड सिनेमांची स्टार म्हणून शकिलाला ओळखलं जाऊ लागलं.

मल्याळम मध्ये २००० साली आलेला Kinnarathumbikal हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आपल्यासाठी या सिनेमाचं नाव घेणं कठीण असलं तरी या सुपरहिट सिनेमामुळे सर्व वयोगटातील माणसांमध्ये शकिला विषयी आगळीच क्रेझ निर्माण झाली.

शकीलाच्या बी ग्रेड सिनेमांची इतकी चलती होती की नेपाळी, चायनीज भाषांमधे हे सिनेमे डब केले जायचे. तिला जगभरात ओळख मिळाली होती. शकीलाने जवळपास २५० सिनेमांमध्ये काम केलं. यापैकी असंख्य सिनेमे हे बी ग्रेड कॅटेगरीतले होते. त्यामुळे बी ग्रेड सिनेमे हे भारतात ‘शकीला फिल्म्स’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

शकीलाचं वजन जास्त होतं. तिला या गोष्टींमुळे प्रेक्षकांचे ओंगळवाणे टोमणे सहन करावे लागले. खूपदा दिग्दर्शक तिला कोणतीही कल्पना न देता तिच्याकडून हवा तसा रोमँटिक सीन करून घ्यायचे. मानापमान, फसवणूक अशा सर्व गोष्टी शकिलाने सहन केल्या.

लोकांचं मनोरंजन करणाऱ्या शकीलाला देखील चांगल्या भूमिका करण्याची इच्छा होती.

“आम्ही तुला सिनेमात काम दिलं तर आमचा चांगला सिनेमा लोकांना ब्ल्यू फिल्म वाटेल,”

असं शकीलाला सांगण्यात आलं. अखेर २००२ साली बी ग्रेड सिनेमात काम करणार नाही, असं शकिलाने जाहीर केलं. यानंतर शकीलाची दुसरी इनिंग सुरू झाली. तामिळ, तेलगू,
कन्नड भाषेतल्या अनेक उत्तम सिनेमात शकिलाचा अभिनय तिच्या चाहत्यांना पाहता आला.

तिच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये ‘शकिला’ या नावानं सिनेमाही आला, पण तो फारसा चालला नाही. दुर्दैवानं शकीला यावेळीही दुर्लक्षितच राहिली…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.