शेक्सपियर आणि त्याचे वाय झेड क्रोमोसोम्स.

मला शेक्सपियर पहिल्यांदा कधी भेटला तो दिवस आठवत नाही. ते आठवण निरर्थक आहे. शेक्सपियरच्या अस्तित्वाइतकंच निरर्थक. पण शेक्सपियरने मला भरपूर काही दिलं आहे. कोटेबल कोटस कसे नेम धरून मारायचे, मोठं मोठं तत्वज्ञान कस झाडायचं, गप्पांच्या मेहफिली बोजड वाक्य मारून कशा जिंकायच्या अशा अनेक गोष्टी शेक्सपियरने मला शिकवल्या. सुरुवातीच्या एका भेटीतच मी त्याची एक लंबी चौडी थाप रंगेहाथ पकडल्यावर आणि त्याला दाखवून दिल्यावर शेक्सपियरने मला एक आयुष्याचा महान मंत्र सांगितला होता, “इकडं बघ पोरा, गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे महत्वाचं नसत, तर ती इंटरेस्टिंग असणं जास्त महत्वाचं असत. मी जे बोलतो ते इंटरेस्टिंग असत. बाकी सगळं झूठ आहे.” मी हे तत्वज्ञान ऐकून भारावून गेलो. म्हणजे क्लीन बोल्डचं झालो. काही महिन्यांनी मला कळलं की अरेच्या शेक्सपियर जे सांगत होता तो खरं तर कुरोसावाच्या ‘राशोमान ‘मधला डायलॉग आहे की. पण साला हा शेक्सपियर अशा आविर्भावात बोलला होता की सालं हे काही जणू हे त्याचाच वाक्य आहे. पण व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होत. माझ्या नेणिवा शेक्सपियरच्या कह्यात गेल्या होत्या .

शेक्सपियर हा नेमकं काय करतो हे एक मोठं गूढ आहे. शेक्सपियरचं वैयक्तिक आयुष्य कस आहे, तो कुठं राहतो, कामधंदा काय करतो, त्याचं खरं नाव काय हे एक प्रचंड गूढ आहे. शेक्सपियरबद्दल दोनच गोष्टी कन्फर्म माहित आहेत. शेक्सपियर गुरासारखी ओल्ड मोंक पितो. आणि दुसरं म्हणजे शेक्सपियर हे काही त्याचं खरं नाव नाही. त्याच्या या मेहफिली जिंकणाऱ्या उसनवारीच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी शेक्सपियरलाला शेक्सपियर नाव दिलं. हा खरं तर मूर्खपणा आहे. शेक्सपियर अशा मेहफिली कधी गाजवायचा नाही. तो एक जिनियस होता. हा आमचा शेक्सपियर फक्त थुके लावण्यात पटाईत होता. इंडस्ट्रीने इंडस्ट्रीमधल्याच लोकांना दिलेली नाव कधीही गांभीर्याने घ्यायची नसतात. कास्टिंग काऊच करणारा अट्टल इसम इथं ‘शोमन’ म्हणून ओळखला जातो आणि विदेशी गाण्यांची तंतोतंत कॉपी करणारे संगीत दिग्दर्शक महान वगैरे विशेषणांनी जोजवली जातात. शेक्सपियर पोटापाण्यासाठी काय करतो हा अजून एक गोंधळून टाकणारा विषय. काही लोक म्हणतात, तो लाईन प्रोड्युसर आहे, काही म्हणतात तो गाणी लिहून आपलं नाव पडद्यावर येऊ न देण्याच्या अटींवर विकतो. खुद्द शेक्सपियरने एका काळोख्या बार मध्ये ओल्ड मोंकच्या चौथ्या फिडनंतर तो कास्टिंगच्या क्षेत्रात काम करतो असं बाटलीवर हात ठेवून शपथेवर सांगितलं होत. मला शेक्सपियरच्या प्रोफेशनपेक्षा त्याच्या गप्पांमध्ये रस असल्यामुळे असाही फरक पडत नाहीच .

मी शेक्सपियरला एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही ठरवून भेटलेलो नाही. तो दोन तीन ठिकाणी भेटतो. फन रिपब्लिक लेनमधल्या त्या सुप्रसिद्ध भृर्जीवाल्याच्या गाड्यावर, जिथं तोंड लपवून फिरावं लागत नाही अशा मनोरमा बार मध्ये आणि यशराजच्या समोरच्या चहावाल्याकडे तो हमखास भेटतो. त्याला ओळखणारे लोक शेक्सपियरचा वावर यत्र तत्र सर्वत्र असतो असा दावा करत असतात. पण तो या तीन जागीच पडीक असतो. शेक्सपियर अतिशय सामान्य दिसतो. डोक्यावरच्या केसांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे. उरलेले केस बरेचसे पांढरे. किरकोळ शरीरयष्टी. पण किरकोळ शरीरयष्टी ची भरपाई वाचा कौशल्याने झाली आहे. शेक्सपियरला मी आवडत असावा. कारण मुळातच माझा कल बोलण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त असतो. बोलण्यासाठी सदैव उत्सुक असणाऱ्या शेक्सपियरसारख्या माणसासाठी मी एक उत्तम गिऱ्हाईक. दुसरं म्हणजे छोट्या शहरातून आलेला माझ्यासारखा माणूस बॉलिवूडमध्ये जम बसवण्यासाठी धडपडत आहे, याचं त्याला कौतुक वाटत. पण कौतुक वाटतं म्हणून शेक्सपियरने मला ओल्ड मोंक पाजली आहे असं नाही. पण तो मला अनेक बाबतीत सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो . दिग्दर्शकाला पिच कस करायचं, मेल कसे ड्राफ्ट करायचा, पैशांच्या वाटाघाटी कशा करायच्या अशा अनेक गोष्टी तो मला सांगत असतो . शेक्सपियरचे तर्कशास्त्र पण भन्नाट आहे. तो एकदा मला बोलला होता तो स्वतःला मॅट्रिक्स मधला मॉर्फस समजतो आणि समोर बसलेल्या माणसाला नियो. थोडक्यात या मर्त्य जगात तुम्हाला शहाणं करून सोडण्याची जबाबदारी शेक्सपियरने स्वतःच अंगावर घेतली आहे. शेक्सपियरची शो बिझ मध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल एक प्रचंड विचित्र थियरी आहे. तो बोलतो, “की तुम्ही ते एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम यांच्या कॉम्बिनेशनने बाळाचं लिंग ठरत. पण शोबिझ मध्ये काम करणारे जन्मतःच डोक्यावर पडलेले असतात. त्यांची गुणसूत्र एक्स पण नसतात आणि वाय पण नसतात. ती वाय झेड असतात.”शेक्सपियरला लोकांची नाव लक्षात ठेवण्यात फारसा रस नसावा. तो शोबिझमध्ये काम करणाऱ्या लोकांची नाव नंबर देऊन सेव्ह देऊन करायचा. आणि त्या नावाअगोदर वाय झेड लावायचा. उदाहरणार्थ मुकेश दुग्गल चा नंबर वाय झेड १४ नावाने सेव्ह केला असेल. अनिषा मलिकचा नंबर वाय झेड १२ नावाने सेव्ह केलेला असेल. विशेष म्हणजे नंबर बघूनच शेक्सपियर कोण कॉल करत आहे किंवा कुणाला कॉल करायचा हे हमखास ओळखत असे. असला अंतरंगीपणा शेक्सपियरलाच शोभू शकतो.

पण शेक्सपियरचा मुखवटा काही सेकंदांपुरता का होईना माझ्यासमोर एकदा उतरला होता. यशराजसमोर आम्ही एकदा चहा पित उभे होतो. काही शाळकरी मुलं किलबिल करत हसत हसत आमच्यासमोरून गेली. त्यांच्याकडे शेक्सपियर अनिमिष नजरेने बघत होता. आणि पुटपुटला,“आमचा राजवीर आज एवढाच असता.” काही क्षण. फक्त काही क्षण शेक्सपियरने चढवलेला क्रूर थंडगार बुद्धिमत्तेचा मुखवटा बाजूला सरला होता. राजवीर कोण ? त्याचा मुलगा ? की अजून कुणी ? त्याचा उल्लेख भूतकाळात का करतोय हा ? असे अनेक प्रश्न मनात सरकन चमकून गेले. मी त्या नाजूक क्षणी ते प्रश्न विचारले असते. तर कदाचित त्याने मला उत्तर दिली पण असती. मग मला कदाचित असं काही कळलं असत जे महान असतं. पण लोकांच्या आयुष्यात एकूणच रस नसल्याने मी प्रश्न विचारले नाहीत. आणि समजा विचारलं असतं तरी शेक्सपियरने खरं उत्तर दिली असती याचं खात्री काय ? मग त्याच्याच थियरीनुसार ते उत्तर खरं किंवा खोटं असण्यापेक्षा ते इंटरेस्टिंग असण्याची शक्यता जास्त असती.

मध्यंतरी शेक्सपियर बरेच दिवस गायब होता. काहीच पत्ता नाही. कोणी म्हणत होत की त्याचा अपघात झालाय. कोणी म्हणत होत की अति दारू पित असल्याने शेक्सपियरला त्याच्या बायकोने सोडले आहे. माझा पण मोबाईल हँडसेट बदलला. बरेचसे सेव्ह केलेले नंबर उडाले. शेक्सपियरचा नंबर पण गेला. एका मोठ्या कालखंडानंतर शेक्सपियर मला यशराजच्या टपरीसमोर भेटला. “आहेत कुठे महाशय?” मी मोबाईल हँडसेट बदलीची कहाणी सांगितली. त्याचा नंबर उडाल्याचं पण सांगितलं. “थांब, मिसकॉल देतो. नंबर सेव्ह कर.” असं बोलून शेक्सपियरने माझ्या नंबरला कॉल केला आणि त्याची मोबाईल स्क्रीन दाखवली. स्क्रीनवर वायझेड ३३ असा नंबर झळकत होता. नियती पण काय मस्त काष्ठ जमवते कधी कधी.

अमोल उदगीरकर.

2 Comments
  1. RahulAphale says

    सुरेख गुढ!!

  2. पंकज says

    खरं की खोट माहीत नाही पण इंटरेस्टिंग आहे

Leave A Reply

Your email address will not be published.