देशातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर, जिनं काश्मीरचा दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणला.

भारताचा जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश इथला पहाडी भाग म्हणजे काहीसा दुर्गम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात इथं मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. मात्र जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. आपण तंत्रज्ञानानं स्वयंपूर्ण नव्हतो, फाळणीमुळे तिजोरीवर आर्थिक बोजा होता.

त्यामुळे या दुर्गम भागात म्हणाव्या तश्या सोयी सुविधा पोहचणं आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणं गरजेचं होतं.

अशा परिस्थितीत त्या काळी हे काम केलं ते एका मराठी महिलेनं. सोबतच त्यांना भारतातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर म्हणून देखील देशभरात ओळखलं जातं.

अशा ऐतिहासिक मराठी महिलेचं नाव म्हणजे शकुंतला भगत.

मूळच्या मुंबईच्या असलेल्या शकुंतला या ब्रीज इंजिनिअर म्हणून सबंध प्रांतात प्रसिद्ध असलेल्या एस. बी. जोशी यांची मुलगी. साधारण १९५३ साली त्यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई औद्योगिक संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली. ‘सिव्हिल इंजिनिअर’ अशी अधिकृत पदवी घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला होत्या.

पुढे १९६० मध्ये शकुंतला यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठामधून ‘सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी पूर्ण केली. त्यानंतर काही दिवस त्यांनी मुंबई आयआयटीच्या सिव्हिल इंजिनिअर विभागामध्ये सहाय्यक प्राध्यपक आणि हेवी स्ट्रक्चर लॅबोरेट्रीचे प्रमुख म्हणून काम बघितलं. 

त्यानंतरच्या काळात शकुंतला यांचं मॅकेनिकल इंजिनिअर अनिरुद्ध भगत यांच्याशी विवाह झाला.

पुढे या दाम्पत्त्यानं मिळून मुंबईमध्ये ‘क्वाड्रिकॉन’ नावाची एक पूल बांधणी फर्म सुरु केलं. सोबतच शकुंतला आणि अनिरुद्ध या दोघांनी मिळून या क्षेत्रात प्रथमच ‘टोटल सिस्टीम पद्धत’ विकसित केली, मुख्य म्हणजे त्यांच्या या पद्धतीला पेटंट देखील मिळालं होतं.

आता या पद्धतीत काय विशेष होतं? तर पूल बनवताना असेंबल प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या मानांकनानुसार बनवलेला मॉड्युलर भाग जो विविध प्रकारचे पूल बनवताना वाहतुकीचा अंदाज, त्याची वजन पेलण्याची क्षमता यावर अवलंबून होतं. हे सगळं पूल बांधणी दरम्यान वापरलं जायचं. 

या टोटल सिस्टीम पद्धतीचा वापर करत १९७२ मध्ये भगत दाम्पत्यानं हिमाचल प्रदेशच्या स्पिती भागात आपला पहिला पूल बांधून उभा केला. पुढच्या ४ महिन्यांमध्ये जवळच्याच भागात आणखी २ पूल बांधून पूर्ण केले. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यात आणि बाकीच्या राज्यात सरकारच्या मदतीनं या नव्या टेक्निकने पूल उभारणीचा कार्यक्रमच हाती घेतला.

कमी खर्चिक आणि जास्त टिकाऊ असल्यामुळे सरकार देखील या बांधणीला नकार देत नव्हतं. मात्र ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा अनुभव त्यांना त्यावेळी पण येत होता. परिणामी सरकारच्या नादी न लागत भगत दाम्पत्यानं यातील बहुतांश पूल हे स्वतःच्या खर्चातून बांधून पूर्ण केले.

केवळ आपल्याकडील ज्ञानाचा फायदा या भागाच्या विकासासाठी व्हावा हा हेतू डोक्यात ठेऊनच.

१९७८ च्या काळापर्यंत या दोघांनी मिळून काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत छोटे-मोठे असे तब्बल ६९ पूल बांधून पूर्ण केले. दुर्लक्षित, उपेक्षित आणि विकासापासून कोसो लांब असलेल्या भागाला त्यांनी मुख्य प्रवाहाशी जोडलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी एकूण २०० पुलांची बांधणी आणि डिझाइन केलं होतं. 

त्याठिकाणी अन्य कोणत्याही पद्धतीनं पूल बांधणी करणं हे त्याकाळी जवळपास अशक्य मानलं जात होतं. त्यामुळेच त्यांनी क्वाड्रिकॉन स्टील पुलच्या निर्मितीवर भर दिला होता.

याच कारणांमुळे आज देखील क्वाड्रिकॉन स्टील पुल हे हिमालयीन आणि पहाडी क्षेत्रात जास्तीत जास्त संख्येनं दिसून येतात.

पूल बांधणीसाठी स्टील हा सर्वोत्तम पर्याय असला तरी या सोबत वेल्डिंग करणं, जोडणं यामध्ये त्यावेळी बऱ्याच अडचणी यायच्या. त्यामुळे याचा वापर टाळला जायचा. यावर उपाय म्हणून १९७८ मध्ये क्वाड्रिकॉनने ‘युनिशर कनेक्टर’ विकसित केला. यामुळे स्टीलच्या सांध्यांना जोडणारं एक बेस्ट उपकरणं तयार झालं.

या संशोधनासाठी भगत दाम्पत्याला ‘अविष्कार संवर्धन बोर्डाकडून’ सर्वोच्च पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं. १९९३ मध्ये शकुंतला यांना ‘वुमन ऑफ द इयर’ या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं.

शकुंतला यांना केवळ भारतातीलच नाही तर अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, या देशांमधील प्रकल्पांवर देखील काम केलं आहे. लंडनमधील सिमेंट आणि काँक्रीट असोसिएशनचा पाया देखील त्यांनीच रचला. काही काळ त्या ‘इंडियन रोड कांग्रेस’च्या सदस्या देखील होत्या.

अशा या दि ग्रेट महिलेनं २०१२ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. क्षेत्र जरा वेगळं आणि वाटायला निराळं असलं तरी त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून काश्मिर-अरुणाचलचा दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणला हे मात्र नक्की….

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.