प्रवाशाने हात दाखवला की शकुंतला एक्स्प्रेस थांबायची

हात दाखवा एसटी थांबेल! अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. मग एसटी थांबली कि नाही ते माहित नाही. पण एक रेल्वे हात दाखवला कि हमखास थांबायची ती म्हणजे,

विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर धावणारी शकुंतला एक्स्प्रेस   

शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सांभाळली होती. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघायची. तिकीट काढलच पाहिजे असही काही नव्हते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या या शंकुतलाकडं मोठी असायची.

या नॅरोगेज शकुंतलाचा प्रवास बघूया. 

भारतीय रेल्वेची सेवा, देशभरात पसरलेलं रेल्वेमार्गांचं जाळं, एक्स्प्रेसच्या गाड्या याबाबत भारतीय रेल्वेने जगात आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रगतीमुळेच जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या ऑपरेटिंगबद्दल नेहमीच कौतुक केले जातं. मात्र रेल्वेच्या इतिहासात डोकावताना काही रेल्वेमार्ग आणि त्यांच्या गाड्यांची स्वतंत्र ओळख आहे. 

अशा गाड्यांमध्ये वऱ्हाडातल्या लोकांना वेगळ्या प्रवासाचा अनुभव देणाऱया ‘व्हिंटेज लूक’ असलेल्या शकुंतला एक्स्प्रेसचे नाव अगदी आवर्जून घेतलं जातं. कमी खर्चात सेवा देणारी ही विदर्भवासीयांची लोकप्रिय रेल्वे. महाराष्ट्रात असलेली शकुंतला एक्स्प्रेस हा यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्ग प्रवाशाच्या कुतूहलाचा विषय आहे. 

विशेष म्हणजे हा रेल्वेमार्ग अजूनही सरकारच्या मालकीचा नसून ब्रिटनमधील खासगी कंपनीचा आहे. 

शकुंतला एक्स्प्रेस ही ब्रिटिश काळातील रेल्वेगाडी कायम दुर्लक्षित राहिली असली तरी महाराष्ट्रातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या गरीब गावकऱ्यांची ही जीवनरेखा आहे.

क्लिक-निक्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीने १९१० मध्ये शकुंतला रेल्वेची स्थापना केली होती. सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी, या खासगी कंपनीने हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी करार करत विदर्भातील कापूस वाहतुकीसाठी हा रेल्वेमार्ग सुरू केला.

विदर्भ हे त्या काळात कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. इथून या कापसाची निर्यात इंग्लंडमधील मँचेस्टरला केली जायची. यामुळेच विदर्भालाही हिंदुस्थानातील मँचेस्टर म्हटलं जाऊ लागलं. या ट्रॅकवरील गाडय़ा जीआयपीआरद्वारे चालवल्या जातात. जीआयपीआर म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे.

स्वातंत्र्यानंतर मात्र जीआयपीआर भारतीय रेल्वेचा एक भाग बनली. मात्र शकुंतला रेल्वे अजूनही सीपीआरसी या कंपनीच्या मालकीची आहे. आणि सीआरपीसी अजूनही क्लिक-निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या मालकीचीच आहे. 

आता असं का घडलं ? तर याचं एकमेव कारण म्हणजे संपूर्ण रेल्वेच राष्ट्रीयीकरण होताना भारत सरकार फक्त याच रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करायला विसरलं. रेल्वेने करार तत्त्वावर हा मार्ग चालवायला घेतला, मात्र मालकी नसल्याने १०२ वर्षांत या मार्गासाठी कोणत्याही सुधारणा करत आल्या नाहीत. 

जवळपास १०० वर्ष जुनी हि ५ डब्याची रेल्वे ७० वर्षापर्यंत १९२१ मध्ये मैनचेस्टरमध्ये बनलेल्या जेएडडी स्टीम या इंजिनवर चालली. त्यानंतर १९९४ साली हिला डिजल इंजिन बसवावे लागले.

म्हणजे एवढा कालखंड जाऊन कोळशाचे इंजिन जाऊन डिझेलचे इंजिन या गाडीला लागले, एवढाच काय तो बदल झाला. 

शकुंतला रेल्वेचा प्रवास आजही नॅरो गेजचा आहे. त्या लाकडी सिटस्, आतलं लाकडातलं काम, मोठाले गज असलेल्या खिडक्या आणि लहान २ फूट लोखंडी ट्रॅक तुम्हाला ब्रिटिश काळाचा अनुभव देतात. या रेल्वेमार्गावरील सिग्नलदेखील ब्रिटिश काळातील असून यावर ‘मेड इन लिव्हरपूल’ असा उल्लेख आहे.

आश्चर्य म्हणजे तिच्या मार्गावरील एकाही गेटवर कर्मचारी नाही. त्यामुळे फाटक आले की गाडी थांबते. गाडीतून कर्मचारी उतरतो, फाटक बंद करतो किंवा दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवतो. गाडी हळूहळू पुढे जाते, नंतर पुन्हा तो गाडीत जातो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. 

या रेल्वेचा वेग कमी असूनही प्रवाशांनी कधी तक्रार केली नाही. अतिशय कमी तिकिटात या गाडीतून प्रवास करणे शक्य होत असे. यामुळेच ही गाडी सुरू राहावी ही मागणी या भागातून कायम केली जात आहे. २०१६ मध्ये अचलपूर-यवतमाळ-मूर्तिजापूर मार्गावर लवकरच ब्रॉडगेज रेल्वे सुरू होईल असे सांगण्यात आले होते, मात्र विदर्भवासीयांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

आता रेल्वेगाडी ब्रिटनची मग नाव कसं मराठी ? 

तर स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाईंच्या नावावरून गाडीला नाव पडलं असे सांगितलं जातं. अशी ही शकुंतला तिच्या प्रवासात मेळघाटातल्या विलक्षण सौंदर्याचा अनुभव देते. काही गोष्टी हक्काने वारसा म्हणून जपाव्यात अशा असतात. शकुंतला एक्स्प्रेसही अशा काळाची साक्ष देत उभी आहे.

हा रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन अंतर्गत येतो. मूर्तिजापूर ते अचलपूर हा ७७ किलोमीटरचा मार्ग आजही सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी यांच्या मालकीचा असल्यामुळे मध्य रेल्वेला या मार्गावर ट्रेन चालविण्यासाठी सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीला मानधन द्यावं लागतं. हे मानधन ब्रिटिश कंपनीला रेल्वे वार्षिक सुमारे १ कोटी २० लाखांवर द्यावं लागत होतं. त्या कंपनीचा करार १०० वर्षांनंतर १९९६ मध्येच संपला. यानंतर भारत सरकार व कंपनीतील वाटाघाटींनुसार २००६ आणि पुन्हा २०१६ पर्यंत त्याला मुदतवाढ मिळाली. मात्र २०१६ नंतर ही रेल्वे हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आली आणि आता बंद अवस्थेतच आहे. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.