अस्सल राज्यपाल नियुक्त : शकुंतला परांजपे

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं चौथे नाव आहे ते शकुंतला परांजपे.

वटवृक्षाच्या सावलीत छोटी झाडे वाढत नाहीत असे मानले जाते. पण रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची कन्या ते कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणाऱ्या या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या आणि त्याच सर्वोच्च समाजसेवेतून स्वतःची स्वतंत्र ओळख असा शकुंतलाबाईंचा प्रवास. १९९१ मध्ये त्यांना याच समाजसेवेसाठी भारत सरकारचा पद्मभूषण हा सन्मान मिळाला.

शकुंतलाबाईंचा जन्म १७ जानेवारी १९०६चा. वडिल रघुनाथ परांजपे हे गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय. विवेक बुद्धीला जे पटत ते बिनदिक्कत करावे ही त्यांच्या घरातील शिकवण. त्याचं प्राथमिक शिक्षण घरीच आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले.

यावेळची त्यांची एक आठवण म्हणजे मुंबई इलाख्यात १६ वर्षे पूर्ण केल्याशिवाय मॅट्रिकच्या परीक्षेला बसता येत नसे. शिक्षणमंत्री झाल्यावर रँग्लर परांजपेंनी हा नियम बदलला. नेमके त्याच वेळी शकुंतलाबाई १५ वर्षांच्या होत्या. मात्र आपल्या मुलीसाठी हा नियम बदलला असा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी मुलीला त्या वर्षी मॅट्रिकच्या परीक्षेला बसू दिले नाही.

पुढे त्यांचे उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि केंब्रिज युनिवर्सिटीमध्ये झाले.

केंब्रिजमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर जिनेव्हातील इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संस्थेत नोकरी करत असतांना तिथे युरा स्लेप्टझॉफ या रशियन चित्रकाराशी त्यांचा स्नेह जुळला. पुढे १९३४ मध्ये दोघांनीही विवाह केला. त्यांना १९३६ मध्ये कन्या झाली. (त्याच आजच्या सुप्रसिध्द लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे.)

नंतर झालेल्या घटस्फोटानंतर १९३७ला मुलीला म्हणजे सईला घेऊन त्या परत वडिलांकडे पुण्याला राहायला आल्या आणि अखेरपर्यंत येथेच राहिल्या. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. तसेच ‘घरचा मालक’ ही कादंबरी, ‘संगीत पांघरलेली कातडी’, ‘सोयरीक व लागेबांधे’ ही फ्रेंच नाटकांची रूपांतरे ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लीणीची बोरे’, ‘माझी प्रेतयात्रा’ असे काही लेखनही त्यांनी केले.

शकुंतला  बाईनी काही चित्रपटांतून कामही केले आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुंकू’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट.

पुढे १९३८ च्या आसपास मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आतेभावाने म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे (महर्षी कर्वे यांचा मुलगा) यांनी ते करत असलेल्या कुटुंब नियोजनाच्या प्रचारकामात शकुंतलाबाईना मदत मागितली. आणि इथूनच त्यांच्या समाजसेवेची सुरुवात झाली.

ज्याकाळी कुटुंब नियोजनाचे नाव घेणे हा देखील एक सामाजिक अपराध होता, त्या काळी एका स्त्रीने त्याकरता कार्य करणे म्हणजे मोठाच गुन्हा होता. पण तरीही न डगमगता, न अडखळता शकुंतला परांजपे यांनी कुटुंब नियोजनाच्या संदर्भात पुण्यातून काम सुरू केले.

त्या काळात पुण्याबाहेर असलेल्या भांबुर्डा येथील म्हणजे आताच्या शिवाजीनगरमधल्या परांजपे बंगल्यात त्या महिलांना संतती नियोजनासाठी खास बनवलेल्या टोप्या, जेली नाममात्र भावात विकत असत.

महर्षी कर्वे यांच्या रघुनाथ या मुलाने आणि फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या शकुंतला या मुलीने कामजीवनावर बोलावे, लिहावे आणि संतती नियोजनाचा प्रचार करावा ही कल्पना सनातनी मंडळींच्या पचनी पडणे अवघड होते. मात्र शकुंतला परांजपे या र. धों. कर्व्यांसारख्याच खमक्या स्वभावाच्या, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या असल्याने त्यांनी या कुणाला भीक घातली नाही.

र. धों.च्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात दरवेळी शकुंतलाबाईंच्या संततिनियमनाच्या साधनांची म्हणजे टोपी, जेली वगैरेंची जाहिरात असायची. या मासिकात शकुंतला परांजपेंची एक लेखमालिकाही होती.

पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने १९५० मध्ये त्यांची कुटुंब नियोजन सोशल वर्कर म्हणून नेमणूक केली. के. इ. एम., गाडीखाना, शनिवार पेठ, येरवडा इथे त्या नियमित काम करू लागल्या. सरकारी अॅम्ब्युलन्स, एक डॉक्टर, एक नर्स आणि त्यांच्या टीममधले सर्व स्त्री-पुरुषांना घेऊन त्या खेडोपाडी जाऊन शस्त्रक्रिया कॅम्प चालवीत असे. या कॅम्प्सना प्रचंड प्रतिसाद मिळे. हा कॅम्प त्यांनी जवळपास ८ वर्ष चालवला.

त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन पुढे १९५८ मध्ये मुंबई प्रांतात त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात आले.

सभागृहात देखील त्यांनी खेडोपाडी संतती नियमनाचा प्रसार करण्यासाठीचा विषय अनेकदा लावून धरला.

राज्यशासनाला कुटुंब नियोजनासाठी केंद्राकडून जे आर्थिक सहाय्य मिळते ते कसे अन्यायकारक आहे, यावर त्यांनी सभागृहात वारंवार आवाज उठवला. पुढे राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्या नियमांमध्ये सुधारणा घडवून आणल्या.

१९६४ मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नेमणूक करण्याची शिफारस केली. व ती मंजूर देखील झाली.

केंद्राची आर्थिक मदत आणि लोक-सभेतले संख्याबळ राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असते. लोक संख्येचा भस्मासुर आटोक्यात ठेवला पाहिजे हे पटून काही जी राज्ये कुटुंब-कल्याणाचा कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवतात ती एका चमत्कारिक अन्यायाला बळी पडतात. हे त्यांनी सरकारला दाखवले.

आर्थिक मदत व लोकसभेतील संख्याबळ यांचा संबंध लोकसंख्ये-पासून तोडल्याशिवाय हा अन्याय दूर होणार नाही ही गोष्ट त्या १० वर्षे ओरडून सांगत होत्या. अखेरीस २००० मध्ये केंद्र सरकारने लोकसभेतील राज्यवार संख्या सध्या आहे तीच पुढे कायम ठेवण्याची घोषणा केली.

कुटुंब नियोजनाच्या मुद्दयावर जेवढे सामाजिक शिक्षण आपण घडवून आणले, जेवढे पैसे त्यावर खर्च केले त्याच्या काही मर्यादेपर्यंत जरी स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणावर केले असते, तर कदाचित कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचे अपेक्षित परिणाम साधले गेले असते, अशी खंतही त्या सभागृहात बोलून दाखवत.

‘पाळणा लांबवायचा की थांबवायचा’ हे कुटुंबनियोजन विषयक पुस्तकही त्यांनी लिहिले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान :

सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन विविध समित्यांच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले होते. जागतिक बँक, फोर्ड फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कुटुंब नियोजन विभागाच्या सल्लागार म्हणूनही शकुंतला परांजपे यांनी काम पाहिले होते.

समाजसुधारणेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या, निष्ठेने आणि तळमळीने समाज सुधारणेचे कार्य केलेल्या शकुंतला परांजपे यांचे ३ मे २००० रोजी निधन झाले. मात्र त्यांच्या कार्यामुळे मरणोत्तरही लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. असाच स्वतंत्र ओळखीच्या उत्तुंग व्यक्तिमत्वांची ओळख आपण या सिरीज मधून करून घेत आहोत. ज्यांच्या सभागृहातील नियुक्तीची समाजाला खरी गरज होती.

लवकरच भेटूया पुढच्या भागात….

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.