शालिनीताईंकडे इंदिरा गांधींनी कर्नाटक सरकार पाडायची मोहिम सोपवली होती

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणात ज्या महिला वरच्या वरच्या फळीत पोहचल्या व मुख्यमंत्रीपदावर आपला अधिकार सांगितला यात प्रमुख नाव येतं शालिनीताई पाटील यांचं.

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी. दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्या राजकारणात आल्या होत्या. खर तर राजकारणात असल्यामुळेच त्यांची दादांशी ओळख झाली होती. त्यांच्या पतींच निधन झालं होत. उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या, प्रशासनात मदत करणाऱ्या शालिनीताईशी दादांनी लग्न केले.

दादांच्या पत्नी म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख झाली पण वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व होतं. 

अंतुलेचं मुख्यमंत्री होणं वसंतदादांच्या समर्थकांना न आवडलेली गोष्ट होती. पण शालिनीताई त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. पण अखेर अंतुलेना राजीनामा द्यावा लागला याला कारणीभूत शालिनीताई पाटीलच ठरल्या. कोल्हापूरमध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांनी थेट अंतुलेच्यावर थेट टीका केली की,

“सुलतान अंतुले शेतकर्यांचे पैसे परत द्या.”

मुख्यमंत्री अंतुले हे सहकारी कारखाने वगैरेंची कामे करून द्यायची असतील तर त्यांना आपल्या ट्रस्टला देणगी द्यायची जबरदस्ती करतात असा आरोप यामागे होता. यातून बराच वाद झाला अखेर काही दिवसांनी अंतुले पायउतार झाले.

शालिनीताई यांची राजकारणाची समज, त्यातल्या डाव प्रतिडावावर असलेली पकड यातून समोर आली. त्यांची महत्वाकांक्षा त्याहूनही मोठी होती. पुढे जेव्हा वसंतदादा पाटील हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा शालिनीताईंचे समर्थक दादा आजारी असल्यामुळे मुख्यमंत्रीपद शालिनीताईंकडे सोपवणार असल्याचं सांगायचे.

शालिनीताईंनी राजकारणात आपली पावले मजबूत केली होती. अशातच एक प्रसंग आला जेव्हा दिल्लीतल्या नेतृत्वावर आपली छाप सोडायची संधी त्यांना मिळाली.

गोष्ट आहे १९८४ सालची. कर्नाटकात जनता पार्टीचे सरकार होते. रामकृष्ण हेगडे तिथले मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर ३४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्नाटकात बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. काहीही करून हे सरकार पाडायचे असे केंद्रातून आदेश देण्यात आले होते.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष के.एच.पाटील आणि विराप्पा मोईली यांच्या मदतीला म्हणून महाराष्ट्रातून शालिनीताई पाटील यांना पाठवण्यात आलं होतं.

रामकृष्ण हेगडे त्याकाळी लोकप्रिय मुख्यमंत्री होते. एच.डी .देवेगौडा त्यांच्या मंत्रिमंडळात होते. कर्नाटकातील एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या लिंगायत व वोक्कलिंग समाजाच्या मतदारांना आपलासा वाटणारा हा नेता. संपूर्ण देशभरात जनता पार्टीचे भावी नेते म्हणून हेगडेंच्या कडे पाहिलं जात होतं.

विधानसभेत मात्र त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. २२४ आमदारांच्या सभागृहात जनता पार्टीचे ९५, काँग्रेसचे ८२ आणि भाजपचे १८ आमदार होते. जनता पार्टीने भाजपचा बाहेरून पाठिंबा आणि अपक्ष आमदारांच्या मदतीच्या जोरावर सत्ता स्थापन केली होती. डाव्या पक्षांनी देखील या सरकारला पाठिंबा दिला होता.

रामकृष्ण हेगडे यांच्या सोबत असलेल्या एस.बंगाराप्पा यांच्या कन्नड क्रांती रंगा या पक्षाला फोडण्यात काँग्रेस नेत्यांना यश मिळाले.

त्याकाळी बेळगाव सीमा प्रश्न पेट घेऊ लागला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ५ आमदार निवडून आले होते. या आमदारांना काँग्रेसकडे वळवून घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे राजेश पायलट आणि शालिनीताई पाटलांकडे सोपवण्यात आली होती.

शालिनी ताई तेव्हा खासदार होत्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा सरकारकडून सगळी रसद घेऊन शालिनीताई बेंगलोरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी कर्नाटकात जोर लावला. आमदार फोडाफोडीचे सत्र सुरु झाले. केंद्रातून इंदिरा गांधींचे या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष होते.

काँग्रेसने कर्नाटक विधानसभेत अविश्वासाचा ठराव मांडला. रामकृष्ण हेगडे सुद्धा राजकारणात मुरलेले होते. जेव्हा गुप्त मतदानाद्वारे विश्वास दर्शक ठरावाची वेळ आली तेव्हा त्यांनी आपले खरे रंग दाखवले. जनता पक्षाच्या संख्या बळापेक्षाही जास्त मते त्यांना मिळाली. याचाच अर्थ काँग्रेसचेच आमदार फुटले होते.

विराप्पा मोईली यांनी आपला पराभव मान्य केला. पण शालिनीताई या सहजासहजी हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी हेगडेंना चांगलेच जेरीस आणले.

काही दिवस गेले. रामकृष्ण हेगडे यांच्याना सांधे दुखीचा त्रास असल्यामूळे ते उपचार घेण्याकरिता बेंगलोरवरून बाहेर गेले होते. याचा फायदा घेण्यासाठी शालिनीताई पुन्हा कर्नाटकात सक्रिय झाल्या.

रामकृष्ण हेगडे यांची ऊस शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणे यामुळे संपूर्ण साखर लॉबी त्यांच्या विरोधात गेली होती, काहीही करून यावेळी त्यांना पदावरून हटवायचेच म्हणून शालिनीताईंना बळ देण्यात आलं होतं.

एस.बंगारप्पा यांची थेट इंदिरा गांधींशी भेट घालून देण्यात आली. आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले. पण रामकृष्ण हेगडे यांच्या अनुपस्थितीत देवेगौडा यांनी परिस्थिती उत्तमपणे हाताळली. त्यांनी थेट राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याच्या सहीच पत्रच नेऊन पोहचवलं.

रामकृष्ण हेगडे बेंगलोरला विजयी मुद्रेतच परत आले. पण या दरम्यान आणखी एक घटना घडली. कर्नाटकमधील काही जिंकणं टॅक्स अधिकाऱ्यांनी शालिनी ताई पाटील या ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरल्या होत्या तिथे धाड टाकली.

शालिनी ताई यांच्या सोबत महाराष्ट्रातील नेते कन्हैलाल गिडवाणी आणि कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष के.एच. पाटील होते. असं म्हटलं गेलं की गिडवाणी यांच्याकडे पैशांची बॅग सापडली. केएच पाटील सुरवातीला मी या हॉटेल मध्ये नव्हतोच असे म्हणत होते तर शालिनी ताई पाटील यांनी मला अस्थमा असल्यामुळे उपचारासाठी बेंगलोरला आले आहे असं सांगितलं.

महाराष्ट्रात अंतुलेंना खुर्चीवरून खाली खेचणाऱ्या शालिनीताई पाटलांची कर्नाटक मोहीम अपयशी ठरली. मात्र त्यांची महत्वाकांक्षा व सहजासहजी हार मानायची वृत्तीची या निम्मिताने संपूर्ण देशाला पाहावयास मिळावी.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.