शालिनीताई म्हणतात, “संधी आली होती पण नवऱ्यानेच मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही.”

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एक नाव हमखास असेल. शालिनीताई पाटील.

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी. दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्या राजकारणात आल्या होत्या. खरं तर राजकारणात असल्यामुळेच त्यांची दादांशी ओळख झाली होती. त्यांच्या पतींच निधन झालं होत. उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या, प्रशासनात मदत करणाऱ्या शालिनीताईशी दादांनी लग्न केले.

दादांच्या पत्नी म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख झाली पण वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व होतं. 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाडळी हे त्यांचं गाव. त्यांचे वडील पोलीस पाटील होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा वारसा त्यांच्या घरात चालत आलेला. त्यामुळंच शालिनीताईंनी त्याकाळात कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये बीए ची डिग्री पूर्ण केली होती.

पुढे शालिनीताई यांचं लग्न झालं. १९५७ साली सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून शालिनीताई उभा राहिल्या. हूशार असणाऱ्या शालिनीताईंना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. तर संपुर्ण सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्ड निवडणुकांची जबाबदारी वसंतदादा पाटील यांच्याकडे होती. 

तिथूनच त्या वसंतदादा पाटलांच्या संपर्कात आल्या. 

पुढे १९६४ साली शालिनीताई एकट्या पडल्या. त्यांची मुले लहान होती. पैसा अडका वगैरे सारख्या गोष्टी सोबत नव्हत्या. त्यांनी वकिलीच शिक्षण घेतलं होतं पण त्यावर लगेच प्रॅक्टिस सुरू करुन पैसा उभा करण त्यांना शक्य वाटत नव्हतं. अशात वसंतदादा पुढे आले. त्यांनी शालिनीताई पाटलांशी लग्न तर केलंच पण त्यांच्या चारही मुलांना दत्तक देखील घेतलं.

शालिनीताई पाटील या वसंतदादांच्या पत्नी तर होत्याच पण त्यांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहण्यास सुरवात केली. इथूनच त्यांचं राजकीय महत्व वाढलं.

१९८० साली जेव्हा वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात संघर्ष सुरु होता तेव्हा सातारा लोकसभेत यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस शालिनीताई पाटलांनी दाखवलं होतं. फक्त इतकंच नाही तर त्यांच्या विरोधात दीडलाख मते घेतली. शालिनीताई या निवडणुकीत पराभूत झाल्या पण एरव्ही २ लाखांच्या मतांनी विजयी होणाऱ्या यशवंतरावांचं बहुमत साधारण पन्नास हजारांपर्यंत खाली आणलं.

खुद्द इंदिरा गांधींच्या दरबारात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावर्षी जेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोद सरकार खाली खेचलं आणि राष्ट्रपती राजवट लावली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शालिनीताई पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांचाच आरोप आहे की वसंतदादा पाटलांनी त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिल नाही.

शालिनीताई आपल्या संघर्ष या आत्मचरित्रात म्हणतात,

“प्रत्यक्ष नवराच आपल्या पत्नीला उघडपणे विरोध करून तिचे खच्चीकरण करतो असे संपूर्ण देशातील हे एकमेव उदाहरण असेल.”

शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यापासून वसंतदादा पाटील राजकीय महत्त्वाकांक्षेने पेटून उठले होते. मात्र त्यांना दिल्लीतले श्रेष्ठी काही केल्या परत मुख्यमंत्री होण्याची संधी देत नव्हते. फक्त वसंतदादांना अडवण्यासाठी अंतुले, बाबासाहेब भोसले या जनाधार नसलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. मात्र त्या दोघांना हटवण्यासाठी दादांनी जंग जंग पछाडलं.

या कमी त्यांच्या मुख्य अस्त्र होत्या शालिनीताई पाटील. अंतुलेंच्या मंत्रिमंडळात तर त्यांना दोन नंबरचं स्थान होतं. पण अंतुलेंचा सिमेंट घोटाळा बाहेर काढण्यात शालिनीताई पाटील अग्रेसर होत्या.

पुढे बाबासाहेब भोसले यांच्या राजीनाम्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार हा प्रश्न उभा राहिला तेव्हा रामराव आदिक आणि वसंतदादा पाटील अशी दोनच नावे समोर आली. यावेळी इंदिरा गांधींनी हा निर्णय महाराष्ट्रातील आमदारांनी घ्यावा असं सांगितलं. मुख्यमंत्रीपदासाठी मतदान झालं.

शालिनीताई पाटील सांगतात की रामराव आदिक यांनी मला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण मी वसंतदादांच्याच पाठीशी राहिले. आणि दादा फक्त दोन मतांनी निवडून आले. त्या सांगतात,

“वसंतदादा कठोर देशभक्त होते, संघटनेत तरबेज होते, मात्र सातवी पास असल्यानं त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. तो मी निर्माण केला. त्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले!”

शालिनीताई पाटील यांची वसंतदादा यांच्या राजकीय कारकिर्दीला मदत निश्चित झाली पण त्या  किती जरी म्हणत असल्या तरी दादा लोकनेते होते. त्यांचा दबदबा इतका प्रचंड होता की फक्त शालिनीताई यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले म्हणणे अतिशयोक्ती ठरेल.

पण शालिनीताई यांच्या अशाच भूमिकेमुळे वसंतदादा व त्यांच्यात अंतर पडत गेलं. त्या राजकारणातून अडगळीत पडल्या. दादांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी शालिनीताई पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पण त्यांना मुख्यमंत्रीपद सोडा पण स्वतःच्याबळावर मंत्रिपदापर्यंत देखील पोहचता आलं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.