नेहरूंच्या पुतण्यापासून भारतात पक्षांतराला सुरवात झाली.

सध्या पक्षांतराच्या चर्चेने जोर पकडला आहे.गेली काही वर्षे भारतीय जनता पक्षात सर्वपक्षीय नेते जमा होत होते, यासाठी दिल्लीहून त्यांचे पक्षाध्यक्ष साम दाम दंड भेदाचा वापर करत होते असे म्हणतात. वेगवेगळ्या राज्यात त्यांनी आमदार खासदार नगरसेवक छोटे मोठे नेते पक्षात घेऊन भाजपला देशात सर्व व्यापी बनवलं. आता महाराष्ट्रात याच भाजपचे नेते पक्ष सोडून कॉंग्रेस मध्ये जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याचाच अर्थ कॉंग्रेसला ही आमदार फोडाफोडीची परंपरा नवी नाही. कॉंग्रेसने गेली अनेक वर्ष दुसऱ्या पक्षातून आमदार फोडायचं राजकारण केलं आहे आणि कित्येकदा त्यांचेही नेते फुटले आहेत. म्हणजेच भारताला पक्षातराचा मोठा इतिहास आहे.

गोष्ट आहे एकोणीशे वीसच्या दशकातली.

कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधी युग सुरु झालं होतं. त्यांची अहिंसात्मक चळवळ संपूर्ण देशाला भुरळ घालत होती. अबालवृद्ध महिला असहकार आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ब्रिटीश सरकारला घाम फुटला होता. एवढ्यात त्यांच्या नशिबाने चौरीचौरा प्रकरण घडले आणि गांधीजीनी असहकार चळवळ मागे घेतली. अनेक तरुण गांधीजींच्या या निर्णयाच्या विरुद्ध होते. हाताशी आलेले स्वातंत्र्य गांधीजी मुळे दुरावले अशी भावना होती.

यातूनच कॉंग्रेसमधून फुटून स्वराज पक्षाची स्थापना झाली.

चित्तरंजन दास याचे संस्थापक अध्यक्ष होते. शिवाय पंडित मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, न.चि.केळकर अशा अनेक नेत्यांचा समावेश होता. मात्र तरीही गांधीजींचे कट्टर समर्थक असणाऱ्या जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल या नेत्यांनी आपले वडील भाऊ स्वराज पक्षात गेले असतानाही त्यापासून दुरावा राखला.

ब्रिटीश सरकारने जाहीर केलेल्या 1926 सालच्या निवडणुकीत स्वराज पक्षाने भाग घ्यायच ठरवलं. खर तर गांधीजीनी कॉंग्रेसला निवडणुकीवर बहिष्कार घालायचा आदेश दिला होता यामुळे मूळ कॉंग्रेसचे नेते निवडणूक लढवणार नव्हते.

स्वराज पक्ष विरुद्ध मदनमोहन मालवीय यांचा हिंदू सभा अशी मुख्य लढत झाली. कॉंग्रेस निवडणुकीत उतरली नाही तरी मूळ कॉंग्रेसचे नेते म्हणून त्या विचारांची मते स्वराज पक्षालाच मिळणार होती. मोतीलाल नेहरू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी जोरदार प्रचार केला. त्यांच्या विरुद्ध प्रचाराच नेतृत्व करत करत होते त्यांचेच पुतणे शामलाल नेहरू.

शामलाल नेहरू हे मोतीलाल नेहरू यांच्या मोठ्या भावाचे म्हणजे नंदलाल नेहरू यांचे चिरंजीव.

नंदलाल नेहरू हे सुद्धा वकील होते, त्यांना राजस्थानच्या खेत्री राजाच दिवाणपद देखील मिळाल होतं. मोतीलाल नेहरू त्यांच्याच छत्रछायेत वाढले. पुढे त्यांची वकिलीची प्रॅक्टीस जोरात सुरु झाली. मग त्यांच्या मदतीला शामलाल नेहरू देखील आले.

शामलाल नेहरू हे मोतीलाल नेहरूंची सावली म्हणून ओळखले जाऊ लागले. नेहरूंच बोट धरून त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला. १९२३ साली उत्तरप्रदेशच्या मेरठहून त्यांनी स्वराज पक्षाकडून निवडणूक लढवली आणि निवडून देखील आले.

पण दरम्यानच्या काळात मोतीलाल नेहरूंचे एकुलते एक चिरंजीव जवाहरलाल हे सुद्धा राजकारणात आले.

अगदी थोड्याच काळात त्यांनी गांधीजींच्या विश्वासू गटात प्रवेश मिळवला. शामलाल नेहरुंना आपल्या भविष्यासाठी ही धोकादायक घटना वाटली असावी. पुढच्या निवडणुकी आधी त्यांनी नेहरूंची साथ सोडली. त्यांनी पक्ष सोडला.

एखाद्या संसद सदस्याने पक्ष सोडण्याची ही भारतातली पहिली घटना असावी. मोतीलाल नेहरूसाठी तो धक्का होता. त्यांनी शामलाल नेहरुंना यासाठी कधीही माफ केले नाही.

शामलाल नेहरूंनी मोतीलाल यांच्या विरुद्ध विखारी प्रचार केला. तो काळ उत्तरप्रदेशमध्ये धार्मिक दंगलीने पेटला होता. गोहत्या बंदी कायदा असावा की नसावा यावरून वाद सुरु होते. मोतीलाल नेहरू गोहत्या बंदी कायद्याच्या विरोधात होते. त्यांच्यावर गोमांस खाणारा, हिंदू विरोधी म्हणून टीका केली गेली. यात शामलाल नेहरू आघाडीवर होते.

त्यांनी तर प्रचारात एक घोषवाक्य बनवलं होतं,

” माई मेरी मर गयी अब गाय ही मेरी माई है !!”

आपल्या आईच्या मृत्यूचा आणि गोहत्या बंदीचा राजकीय फायदा घेण्याची ही खेळी होती. जवाहरलाल नेहरू हे गांधीजींच्या आदेशांप्रमाणे निवडणुकीपासून आणि प्रचारापासून दूरच होते. निवडणुकीत मोतीलाल नेहरूंचा आणि स्वराज पक्षाचा मोठा विजय झाला.

स्वराज पक्षाचे ३८ उमेदवार निवडून आले तर हिंदू सभेचे २२. याशिवाय मुस्लीम लीगचे व इतर अपक्ष मिळून १३ उमेदवार निवडून आले होते. मोतीलाल नेहरूंच्या दृष्टीने एकच दुर्दैवी पराभव झाला तो म्हणजे शामलाल नेहरू यांना ते हरवू शकले नाहीत. 

पुढे मोतीलाल नेहरूंनी निवडणुकीचे राजकारण, आपल्या जवळच्या लोकांनी दिलेला धोका यामुळे कंटाळून कॉंग्रेसमध्ये परत प्रवेश केला.

१९२८ साली कॉंग्रेसच अध्यक्षपद त्यांना मिळाल. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या मुलाला म्हणजेच जवाहरलाल नेहरुंना अध्यक्ष पद मिळाल. त्यांनी आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन कॉंग्रेसमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला

आणि कॉंग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू युग सुरु झाले.

पुढे काळाच्या ओघात शामलाल नेहरू राजकारणातून बाहेर फेकले गेले. त्यांच्या पत्नीने उमा नेहरूने मात्र नेहरू कुटुंबाशी असलेले आपले नाते जपले. जवाहरलाल नेहरू कमला नेहरू यांच्या बरोबर राहून कॉंग्रेसच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना तुरुंगवास देखील झाला. पुढे स्वातंत्र्यानंतर त्या सीतापुर येथून दोन वेळा खासदार बनल्या.

पुढे त्यांचा नातू अरुण नेहरू देखील राजकारणात आला.

राजीव गांधी यांचा विश्वासू म्हणून त्यांना ओळखल गेल. गृहमंत्रालयाची जबाबदारी देखील त्यांच्यावर दिली गेली मात्र पुढे राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर आपल्या आजोबांप्रमाणे अरुण नेहरू यांनी ऐनवेळी पक्ष सोडला. ते पुढे आयुष्यभर जनता दलात राहिले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.