बॉलिवूडमध्ये असाही पिक्चर होऊन गेलाय जिथं सेटवर हिरॉईन हिरोला अंकल म्हणायची…

पन्नासच्या दशकामध्ये अभिनेत्री आशा पारेख अनेक चित्रपटातून बालकलाकारांच्या भूमिका करत होती.  १९५७ साली तिला वयाच्या पंधराव्या वर्षी विजय भट्ट यांनी ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटासाठी साईन केले. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले पण आशा पारेख आणि विजय भट यांच्यात समन्वय साधला जात नव्हता.

भट ज्या पद्धतीने सांगत होते त्या पद्धतीने आशा पारेखला अभिनय करता येत नव्हता. शेवटी कंटाळून भट यांनी ‘आशा पारेख मध्ये हिरोईनचे मटेरियलच नाही’ असे म्हणून तिला सिनेमातून काढून टाकले आणि तिच्या जागी अमिता या अभिनेत्रीची निवड केली. 

आशा पारेख अर्थातच नाराज झाली पण त्याच वेळी एक अशी गोष्ट घडली जो तिच्यासाठी सुखद धक्का होता. दिग्दर्शक शशिधर मुखर्जी त्यावेळी ‘दिल देके देखो’ या चित्रपटासाठी स्टारकास्ट डिझाईन करत होते. या सिनेमाचे दिग्दर्शक नासीर हुसैन होते. ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटापासून शम्मी कपूर या अभिनेत्याची जोरदार चलती सुरु झाली होती.  ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटातील हर एक गाणं आणि शम्मी कपूरची अदा आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.

हॉलीवूडच्या एल्विस प्रिस्ले या अभिनेत्यासोबत त्याची तुलना केली जात होती. 

१९५९ साली ‘दिल देके देखो’ या चित्रपटाचा नायक म्हणून शम्मी कपूरला घेतलं गेलं आणि नायिका म्हणून साधना आणि आशा पारेख या दोघींची स्क्रीन टेस्ट घेतली गेली. या दोघींचीही निवड झाली पण आशा पारेखला ‘दिल देके  देखो’ मध्ये, तर ‘लव इन सिमला’ या चित्रपटासाठी साधनाला साईन करण्यात आले.

आशा पारेख तोवर बालकलाकार होती तिच्यासाठी नायिका म्हणून हा पहिलाच चित्रपट होता आणि तिला नायक म्हणून त्यावेळचा हिट अभिनेता शम्मी कपूर मिळाला होता. या दोघांच्या वयामध्ये अंतर होतं. आशाला बालकलाकार म्हणून शम्मी कपूरने अनेक सिनेमात बघितलं होतं.

त्यामुळे आशा पारेख शम्मी कपूरला सुरुवातीला ‘शम्मी अंकल’ म्हणूनच संबोधत असे! 

या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान शम्मी कपूरची पत्नी गीता बाली ह्या देखील येत असत. त्यांना आशा पारेख खूप आवडत असे. आशा पारेखला जवळ घेऊन तिचे गाल ओढत, “मी तुला दत्तक घेणार आहे!” असे सांगत असे. आशाला देखील गीता बाली खूप आवडत असत. ती गीता बालीला गीता आंटी तर शम्मी कपूरला शमी अंकल असे म्हणत असे.

आपली नायिका आपल्याला अंकल म्हणते याचे शम्मी कपूरला काहीच गैर वाटत नसे!

शम्मी कपूरने आशा पारेखला सिनेमाच्या भरपूर गोष्ट शिकवल्या. तिला सुरुवातीला लिप सिकिंग जमत नसे. शम्मीने तिला गाण्यावर लीप सिंकिंग कसे करायचे हे शिकवले. शम्मी कपूर आणि आशा पारेख या दोघांनी दिल देके देखो, तिसरी मंजिल ,पगला कही का आणि  जवां मोहब्बत या चित्रपटातून एकत्र भूमिका केल्या. सर्व चित्रपट चांगले चालले. ‘तिसरी  मंजिल’ तर बंपर हिट सिनेमा ठरला.

आजही रसिक या दोघांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीचे दिवाने आहेत. या दोघांच्या चित्रपटातील गाण्यांची झलक पहा. बडे है दिल के काले नीली से आंखो वाले, यार चुलबुला है हसीन दिलरुबा है, प्यार की कसम है न देख ऐसे प्यार से (दिल देके देखो), तुमने मुझे देखा होकर मेहरबान, दिवाना मुझसा नही इस अंबर के नीचे, ओ मेरे सोना रे सोना, आजा आजा मै हू प्यार तेरा (तिसरी मंझील), तुम मुझे यु भुला न पाओगे (पगला कही का).

सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर नायक नायकाची भूमिका करणारे प्रत्यक्षात मात्र नायिका त्या नायकाला ‘अंकल’ म्हणूनच बोलवत होती! हे ऐकताना आजही खूप गंमत वाटते! आशा पारेखने तिच्या ‘द हिट गर्ल’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.