भारताला इंटरनेट ठाऊक नव्हत तेव्हा हा गडी जगभरातल्या पोरींशी चॅट करत होता

भिडूंनो, तुम्ही स्वतःला कितीही टेक्नोसॅव्ही वगैरे म्हणा… इंटरनेटच्या जमान्यात युट्यूब, सोशल मिडीया हाताळण्यामध्ये स्वतःला स्मार्ट समजत असाल तर थांबा ! आपल्या सर्वांच्या आधी भारतात एक व्यक्ती होऊन गेलाय, त्या व्यक्तीने इंटरनेट भारतात येण्याच्या आधीच वापरलं होतं. तो माणुस म्हणजे याssss हूssss म्हणत ज्याने अनेक दशकं बाॅलिवुडवर राज्य केलं असा अभिनेता म्हणजे शम्मी कपूर..

शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ चा.

एरवी मुल जन्माला आल्यावर संपुर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण इथे हाॅस्पीटलमध्ये मात्र सर्वजण चिंतेत होते. याला कारण असं , शम्मी जेव्हा आईच्या गर्भात होता तेव्हा शम्मीच्या आईने देवी आणि बिंदी हि शम्मी आधीची दोन लहान मुलं गमावली होती. राज कपूर नंतर देवी आणि बिंदी जन्माला आले होते.

परंतु दोन आठवड्यामध्ये दोन्ही लहान बाळं दगावली. त्यामुळे शम्मी जन्माला आल्यानंतर तो जगेल की नाही, याची सर्वांना धास्ती वाटत होती. परंतु शम्मी जगलाच नाही तर त्याने कपूर घराण्याचं नाव उज्वल केलं. त्यावेळी कपूर कुटूंबामध्ये शम्मी कपूर हे पहिले की ज्यांचा जन्म हाॅस्पीटलमध्ये झाला होता.

आधीची दोन मुलं दगावल्यामुळे एका राजकुमारासारखं शम्मी कपूर यांचं पालनपोषण करण्यात आलं.

कपूर कुटूंब त्यावेळेस माटुंग्याला राहायचं. वडील पृश्वीराज कपूर आणि मोठा भाऊ राज कपूर हे सिनेमाक्षेत्र गाजवत होते. शम्मीला खेळायची प्रचंड आवड. माटुंगा तसेच खार जिमखान्यात शम्मी कपूर टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन अशा खेळांमध्ये अग्रेसर होते. ‘न्यु एरा’ या शाळेत त्यांनी मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे माटुंग्याच्या रुईया काॅलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

काॅलेजमध्ये गेल्यावर आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये ते काम करु लागले. परंतु काॅलेजमध्ये शम्मी कपूर यांचं मन रमत नव्हतं.

त्यांनी घरी कल्पना न देता काॅलेजला रामराम ठोकला. घरी येऊन मान खाली घालुन ते ‘मुगल ए आझम’ असलेले वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासमोर उभे राहिले. आपल्या मुलाने शिक्षण सोडून परस्पर असा निर्णय घेतल्यावर, एखाद्या बापाने मुलाच्या कानशिलात लगावली असती. पण कदाचित पृश्वीराज कपूर यांनी शम्मीचं आयुष्य त्याला कुठे घेऊन जाणारेय, हे जाणलं असावं. ते शम्मीला म्हणाले,

“कोई बात नही पुत्तर. कल से थिएटर आ जा.”

दुस-या दिवसापासुन शम्मीजी पृश्वी थिएटरला गेले आणि वडिलांना नाटकांच्या कामात मदत करु लागले.

५० रु. पगारावर शम्मीजी थिएटरमध्ये कामाला होते.

वडिल पृश्वीराज कपूर यांच्यासोबत शम्मीचे खुप जिव्हाळ्याचे संबंध होते. बाप-लेक दोघे एकत्र सिगरेट प्यायचे, एकमेकांसोबत ड्रिंक्स घ्यायचे.

‘जेव्हा मुलाचे पाय बापाच्या बुटात येतात, तेव्हा बापाने मुलाचा मित्र बनायचं असतं.’ असं पृश्वीराज कपूर यांचं मत होतं.

१९५२ साली महेश कौल यांच्या ‘जीवनज्योती’ या सिनेमातुन शम्मी कपूर यांनी अभिनेता म्हणुन पदार्पण केलं. ११,१११ रुपये हे शम्मी कपूर यांना पहिल्या सिनेमासाठी मिळालेलं मानधन. वडील आणि मोठा भाऊ हिंदी सिनेमांमध्ये प्रथितयश नट असल्याने त्याचं दडपण शम्मीवर होतं. अभिनय करताना असं दडपण घेतल्याने त्यांचे सुरुवातीचे काही सिनेमे अपयशी ठरले. दडपण झुगारुन त्यांनी काम केल्यावर १९६० साली आलेल्या ‘जंगली’ सिनेमापासुन त्यांची सिनेकारकीर्द बहरली. यानंतर शम्मी कपुर यांनी मागे वळुन पाहिलं नाही.

या ‘जंगली’ कलाकाराने स्वतःच्या डान्सची, स्वतःच्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली.

१९८८ दरम्यानची गोष्ट. भारतदेश तंत्रज्ञानाने अजुन तितका पुढारलेला नव्हता. पण याचदरम्यान एक माणुस सर्वांच्याही पुढे जाऊन अशा गोष्टी करत होत्या, ज्या गोष्टींची अजुन भारतात साधी ओळख सुद्धा नव्हती.

शम्मी कपूर यांनी याच काळात काॅम्प्युटरची माहिती मिळवली आणि त्यांच्या मनात काॅम्पुटरबाबत एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं.

नवनवीन तंत्रज्ञान जाणुन घेण्याची त्यांना विशेष आवड होती. जेव्हा काॅम्प्युटर नावाची एक गोष्ट जगात आहे, याची पुसटशीही कल्पना भारतीयांना नव्हती, त्या काळात शम्मी कपूर स्वतः घरात बसुन काॅम्प्युटर हाताळायचे. काॅम्प्युटर आणि प्रिंटर या गोष्टींवर ते सतत नवनवीन प्रयोग करायचे.

शम्मी कपूर यांच्या घरी तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित असा ‘अॅपल’ कंपनीचा कॉम्प्युटर होता.

१९९४ साली ब्रिटीश टेलिकाॅम कंपनीने VSNL च्या माध्यमातुन शम्मी कपुर यांना इंटरनेट उपलब्ध करुन दिले. VSNL त्यावेळी भारतात आलं नव्हतं. त्यामुळे भिडूंनो, आपल्या सर्वांच्या आधी शम्मीजींनी इंटरनेट वापरलं होतं. पुढे १९९५ ला प्रथमतः इंटरनेटची भारतात ओळख झाली. पण त्याआधीच शम्मीजी इंटरनेटच्या विशाल दुनियेत मनसोक्त बागडले होते.

शम्मीजींनी स्वतः कपूर खानदानाची संपुर्ण माहिती देणारी एक वेबसाईट बनवली होती. सिनेमांच्या व्यस्त दिनक्रमातुन जमेल तसं दिवसातले ८-१० तास शम्मी कपूर या वेबसाईटवर काम करायचे आणि स्वतःच्या चाहत्यांशी गप्पा मारायचे.

‘इंटरनेट युझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली तसेच चेयरमन पदाची सुद्धा जबाबदारी सांभाळली.

एका पत्रकार परिषदेत शम्मी कपूर यांनी सांगीतलं होतं,

“कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात दारु आणि स्त्रियांचे संबंध जोडले जातात. माझ्याही आयुष्यात अशा गोष्टी खुप झाल्या. पण आता काळ बदलला आहे, त्यामुळे मी काहीतरी नवी गोष्ट आजमावुन बघत आहे. ती गोष्ट म्हणजे इंटरनेट. काॅम्प्युटर आणि इंटरनेट यांची ताकद इतकी मोठी आहे की, क्षणार्धात या दोन गोष्टींमुळे आपण संपूर्ण जगाशी जोडले जातो.”

फक्त इंटरनेटच नाही तर DSLR कॅमेरा, रेडिओ, एसी अशा सर्व गोष्टी भारतात येण्याआधी शम्मी कपूर यांच्याकडे होत्या. त्या काळात संपुर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शम्मी कपूर हा एकमेव कलाकार असावा, जो इतका टेक्नोसॅव्ही होता.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.