कुंकू नव्हतं म्हणून शम्मी कपूरने गीता बालीच्या भांगात लाल लिपस्टिक लावून लग्न उरकलं…

बॉलीवुडवाल्यांची लग्नं, लफडी आणि मोडणारे संसार म्हणजे सामन्यांसाठी अगदी चर्चेचे विषय. पण कोणाचं कोणाशी जमलं आणि कोणाचं कोणाशी मोडलं यावर चर्चा झाडणं फक्त आता नाही तर पूर्वीच्या काळापासून चालत आलंय.

अशीच एक चर्चा रंगली होती जेव्हा सूप्रसिद्ध अभिनेता शम्मी कापुरने, यशस्वी अभिनेत्री गीता बाली हिच्याशी गुपचुप लग्न केलं होतं.

रुपेरी पडद्यावर, मस्त कलंदर आणि खुशाल चेंडू म्हणून वावरणारा शम्मी खऱ्या आयुष्यातही मनसोक्तपणे जगणारा आणि अतिशय कुटुंबवत्सल असा होता. शम्मी कपूरने गंभीर आणि शोकात्मक भूमिका तश्या फार कधी केल्या नाहीत. हिंदी नायकाला लागणारं देखणेपण त्याच्याकडे होतं, पण कमावलेलं शरीर मात्र नव्हतं.

पण त्याने आपल्या स्टाईलने आणि स्टाईलमधून येणाऱ्या आपल्या हटके अंदाजाने त्याकाळी अनेकांची मनं जिंकली.

शम्मी कपूरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि नवखा असतानाच तो करत असलेल्या, ‘कॉफी हाऊस’ नावाच्या एका चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून आलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तो प्रेमात पडला. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे गीता बाली.

गीता बाली त्यावेळी ऑलरेडी मोठी स्टार झाली होती आणि शम्मी कपूर नुकताच सिने क्षेत्रात स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपड करत होता. नंतर शम्मी कपूर आणि गीता बालीने ‘रंगीन राते’ या चित्रपटात एकत्र काम देखील केलं. दोघांमधला सहवास वाढत गेला, स्वभाव जुळले आणि गीता बाली सुद्धा शम्मी कपूरच्या प्रेमात पडली.

शम्मी कपूरने गीता बालीला लग्नासाठी विचारलं असता तिने सुद्धा हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आणि आजच लग्न करूया असा हट्ट धरला.

पण त्यावेळी, पोरगी पटली की संपला विषय अशी गत बॉलीवुडवाल्यांची सुद्धा नव्हती. या लग्नाला दोघांच्याही घरून कडाडून विरोध झाला.

खरंतर शम्मीकपूरला भेटण्यापूर्वी गीता यांनी शम्मी कपूरचे वडील म्हणजेच पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राज कपूर यांच्यासोबत काम केलं होतं. राजकपूरसोबत तिने ‘बांवरे नैन’ आणि पृथ्वीराज कपूरसोबत ‘आनंदमठ’ सिनेमात ती दिसली होती.

पण प्रॉब्लेम असा होता, की त्याकाळी मुलींनी आणि घरातल्या सुनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर घराण्याचा एक नियम होता, शिवाय गीता बाली, शम्मी कपूर पेक्षा एक वर्षाने मोठी सुद्धा होती. त्यामुळे शम्मी कपूर आणि गीता बाली यांच्यासमोर गुपचुप लग्न करण्यावाचून काही पर्याय उरला नाही.

अखेर १९५५ साली शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगताच गीता बाली यांच्याशी लग्न केलं. एक दिवस जवळच्या काही मित्रांच्या उपस्थितीतच एका मंदिरात लग्न पार पाडायचं असं ठरलं. नवरा आणि नवरी सोडून लग्नाची इतर कोणतीही सामग्री तिथे नव्हती. शिवाय म्हणू ते मंत्र आणि करू ते विधी अशी स्थिती होती.

याच दरम्यान भांगात कुंकू भरून हे लग्न ऑफिशीयल करायचं म्हटलं तर तेव्हा तिथे कुंकू सुद्धा नव्हतं. त्यावेळी कुंकू नाही म्हणून गीता बालीने चटकन आपल्या पर्समधली एक लाल रंगाची लिपस्टिक काढून शम्मीच्या हातात ठेवली. शम्मी कपूरने ती लिपस्टिक आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर फिरवली आणि गीता बालीच्या भांगात भरली आणि दोघांचा विवाह संपन्न झाला.

पुढे त्यांना दोन मूलं सुद्धा झाली.

सिनेसृष्टीत काम करण्यावरून लग्नाला विरोध झाला असूनही गीता बालीने लग्न झाल्यानंतरही आपलं काम सुरू ठेवलं. तिने तिच्या लग्नानंतर केलेले सुद्धा अनेक चित्रपट चांगलेच गाजले. दुर्दैवाने १९६५ साली गीता बालीचं निधन झालं पण कोणतेही रीतीरीवाज न पाळूनही शम्मी कपूर शेवटपर्यंत गीताबरोबर एकनिष्ठ राहीला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.