तेंडूलकरला कसं आउट करायचं याची टीप शेन वॉर्नला एका भारतीय बॉलरने दिली होती.

आपल्याला कधी खरं युद्ध पहायची संधी मिळाली नाही. पण आयुष्यात येऊन क्रिकेटमधलं महायुद्ध नक्कीच पाहायला मिळालं. शेन वॉर्न विरुद्ध सचिन. त्याकाळचे दोघेही सर्वोत्तम होते. खर तर नव्वदच्या दशकात एकच वाद चालायचा सचिन की लारा आणि मुरली की वॉर्न?

खर तर ऑस्ट्रेलियामधल्या बहुतांश पीच या वेगवान बॉलर्सनां मदत करणाऱ्या असतात. अशा वेळी शेन वॉर्न सारखा लेग स्पिनर आपल्या स्पिनच्या जोरावर मॅचेस जिंकून देऊ लागला तेव्हाच क्रिकेटच्या जाणकारांना ओळखलं , इस बंदे में कुछ बात है.

१९९३ साली ऑस्ट्रेलियन टीम मानाच्या अॅशेस सिरीजसाठी इंग्लंड दौऱ्याला गेली. तेव्हा आयुष्यात पहिलाच अशेस खेळणाऱ्या वॉर्नने पहिल्याच बॉलवर माईक गॅटिंगला बोल्ड केले. हा त्या शतकातला सर्वोत्तम बॉल म्हणून ओळखला जातो. त्या एका बॉलपासून शेन वॉर्नची दहशत जगभरात पसरली.

त्यात वॉर्न आपल्या ऑस्ट्रेलियन स्लेजिंगचा वापर करत आक्रमक बोलिंग करायचा. च्युईंगम चघळत धीम्या पावलांनी रणअप घेत आलेला निळ्या डोळ्यांच्या वॉर्नचा चेंडू कधी कुठे कसा वळेल सांगता यायचं नाही  म्हणून बॅट्समन दचकूनच खेळायचे. याचा फायदा घेत वॉर्न पोतं भरून विकेट्स गोळा करत होता.

इकडे सचिनची बॅटिंगसुद्धा फॉर्मात होती. भारतिय टीमचा तंबू सचिन तेंडूलकर रुपी एकमेव खांबावर टिकून होता. कुठे जाईल तिथे सचिनची बॅटरुपी तलवार तळपत होती. सचिन विरुद्ध वॉर्न हा सामना मात्र अजून झाला नव्हता. ही खरी बॅट विरुद्ध बॉल अशी लढाई होती. 

योगायोग म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकमेकासमोर यायला १९९८ साल उजाडले.

सगळ जग या युद्धाची वाट पहात होते. घरच्या मैदानावर खेळण्याचा सचिनला फायदा होणार होता मात्र भारतीय पीच हे स्पिन फ्रेंडली असणे हे शेन वॉर्न साठी दिलासा देणारी गोष्ट होती. वॉर्न तेव्हा आपल्या करीयरच्या टॉपला पोहचला होता आणि सचिनसुद्धा क्रिकेटचा देव म्हणून उदयास आला होता.

दोघांचा पहिला सामना सराव सामन्यात झाला. मुंबई विरुद्ध पाहुणे ऑस्ट्रेलिया अशी ही तीन दिवसीय फर्स्ट क्लास मॅच होणार होती. खरं तर सचिनने ही मॅच खेळणे गरजेचे होते असं काही नाही पण तरीही वॉर्नच पाणी जोखायचं म्हणून तो ब्रेबोर्न वर उतरला.

पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने ३०५ धावांची एक चांगली टोटल बनवली आणि इनिंग डिक्लेअर केली. सचिनला आउट काढायसाठी उतरलेल्या शेन वॉर्नचा फुगा मात्र फुटला. त्या दिवशी सचिन सोडा मुंबईच्या एकही खेळाडूला त्याला आउट करता आले नाही. तेंडूलकरने द्विशतक ठोकले. सगळ्यात वाईट म्हणजे वॉर्नला १६ ओव्हर मध्ये १११ धावा चोपल्या. 

शेन वॉर्न खाड करून जागा झाला. त्याचं गर्वहरण झालं होतं.

पुढच्या म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात त्याने कोणताही माज न करता जीव लावून बॉलिंग केली. त्यावेळी सचिनची विकेट त्याला मिळाली. त्याला वाटल आपल्याला सचिन नावाच कोडं सुटल. पण परत पुढच्याच डावात वॉर्नच्या पहिल्याच ओव्हरला सचिनने पुढे येऊन त्याच्या डोक्यावरून सिक्स मारला. वॉर्नने डोक्याला हातच लावला. सचिनने त्या डावात १५५ धावा ठोकल्या.

या पाठोपाठ एप्रिलमध्ये झालेल्या शारजा सिरीजमध्ये तर सचिन नावाचं वादळ वॉर्नसकट सगळ्या ऑस्ट्रेलियन टीमला खाऊन टाकल. कित्येक सिक्स आणि फोरची बरसात करत सचिनने दोन शतक ठोकली. मन ऑफ दी सिरीज झाला. शेन वॉर्नने आपल्या एका मुलाखती मध्ये मान्य केल की,

” सचिन डोक्यावरून षटकार मारतोय अशी भयानक स्वप्न मला पडतात. “

तेंडूलकर विरुद्ध वॉर्न या लढाईचा निकाल लागला होता. वॉर्नने हार मान्य केली होती. वैयक्तिक जीवनात दोघे चांगले मित्र होते. सर डॉन ब्रॅडमन यांच्या घरी डिनरसाठी आमंत्रण आल्यावर दोघे एकत्रच गेले होते. डॉन यांनी शेनच्या समोरच सचिनला तू माझ्यासारख खेळतोस असं कौतुक केलं होतं.

वैयक्तिक राग नव्हता पण जगातला सर्वोत्तम फलंदाजाला आपण आउट काढल पाहिजे हे वॉर्नच्या डोक्यात बसल होतं पण काही केल्या ते जमत नव्हत. अखेर त्याने जेष्ठांचा सल्ला घ्यायचा ठरवला. तो गेला बिष्णसिंग बेदी यांच्या कडे.

बिशनसिंग बेदी म्हणजे एकेकाळी जगभर आपली दहशत निर्माण करणाऱ्या भारतीय स्पिन चौकडी पैकी एक. आपला फटकळ स्वभावासाठी कुप्रसिद्ध असणारा दिलखुलास पंजाबी माणूस. शेन वॉर्न त्यांना शरण गेला. रात्री निवांत ड्रिंकवर गप्पा मारायला सुरवात केल्यावर बिशनसिंग बेदींनी आपली अनुभवाची पोतडी खुली केली.

“जगातल्या सर्वात ग्रेट माणसाची कमजोरी त्याची ग्रेटनेस हीच आहे. “

शेन वॉर्नला काही कळाल नाही. सुविचार म्हणून भारी आहे पण प्रक्टीकल कसे करणार> त्याने अजून विस्कटून सांगा म्हणून विनंती केली. बेदी बाबा बोलले,

“पुढच्यावेळी जेव्हा सचिनला बॉल टाकशील तेव्हा डिफेन्सिव्ह फिल्डिंग लावू नको. अग्रेसिव्ह फिल्डिंग सेट कर. बाउन्ड्रीवर एकही फिल्डर लावायचा नाही. सगळे फिल्डर स्लीप, गली, फोरवर्ड शोर्ट लेग असे आसपास उभे कर.”

वॉर्नला शॉक बसला. बिशनपाजीला चढलीय की काय त्याला कळेना. जो सचिन बाउन्ड्रीवर एवढे फिल्डर सेट करून त्यांच्या डोक्यावरून सिक्स मारतोय त्याला एखाद्या नवख्या बॅट्समनला लावतात तशी फिल्डिंग लावायची? वॉर्न म्हणाला,

“you must be joking”

बिशनसिंग म्हणाले,

” no!! ते फिल्डर कॅच पकडावेत म्हणून उभे करायचे नाहीत तर ते माइंड गेम करण्यासाठी उभे असतील. सचिन एवढा महान प्लेअर आहे त्याला ते फिल्ड सेटिंग आवडणार नाही आणि रागाच्या भरात बॉल मारायला जाऊन तो आउट होईल.”

शेन वॉर्नला ते काही एवढ विशेष पटल नाही. पण तरी पुढच्या एका सामन्यात त्याने ही आयडिया करून बघितली आणि नेमक तसच झालं. सचिनचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि तो आउट झाला. शेन वॉर्नने ग्राउंडवरूनच प्व्हेलीयनमध्ये बसलेल्या बिशनसिंग बेदीना बॉल दाखवून सलाम केला.

पुढे शेन वॉर्नने सचिनला आउट काढण्यासाठी हीच आयडिया वापरली असं नाही. दोघांची रायव्हलरी रिटायरमेंट नंतर अमेरिकेत झालेल्या निवृत्त खेळाडूंच्या सिरीजपर्यंत टिकली. पण बिशनसिंग बेदीच्या त्या दिवशीचा प्रवचनातून शेन वॉर्न एक गोष्ट शिकला की

“प्लेअरला आउट काढण्यासाठी तोंडाने बोलून स्लेजिंग करावी लागत नाही. माइंड गेम करून ही मोठमोठ्या खेळाडूंची विकेट घेता येते.”

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. योगेश. उषा says

    खुपच छान.
    मला ही माहिती सांगायला खुपच आवडत.
    कृपया एक संधी द्यावी.
    विनंती

Leave A Reply

Your email address will not be published.