आयपीएल खेळायला तयार नसलेल्या शेन वॉर्नला धुळ्याच्या मनोज बदाळेंनी स्कीम टाकली होती…

आपल्या सगळ्यांना अगदीच अनपेक्षित असलेला धक्का देत शेन वॉर्ननं जगातून एक्झिट घेतली. जशा त्याच्या मैदानातल्या गुगली खेळाडूंना समजल्या नाहीत, तसंच काहीसं आपलंही झालं. तरण्याताठ्या पोरांची लीग म्हणून सुरू झालेल्या पहिल्यावहिल्या आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं राजस्थान रॉयल्सनं, आणि त्यांचा कॅप्टन होता…

शेन वॉर्न.    

आता वॉर्न म्हणजे रिकी पॉंटिंगच्या जमान्यातल्या ऑस्ट्रेलियन टीमचा सदस्य. त्या टीमची फक्त भीती नव्हती, तर दहशत होती दहशत. 

गिलख्रिस्ट, हेडन, लँगर, पॉन्टिंग, सायमंड्स यांची बॅटिंग समोरच्या बॉलिंगचं कंबरडं मोडायची आणि त्यानंतर मॅकग्रा, ब्रेट ली, गिलेस्पी, शॉन टेट यांची फास्ट बॉलिंग समोरच्यांच्या बॅटिंगचं कंबरडं, कपाळ, बरगड्या, हेल्मेट आणि आत्मविश्वास सगळं काही मोडायची. फास्ट बॉलिंगची तुळशीबाग असणाऱ्या ऑस्ट्रेलियात स्पिनचा एकमेव मॉल उभा राहिला, त्याचं नाव शेन वॉर्न.

सहा फूट असली, तरी बुटकी वाटणारी उंची, कुठल्याही हलवायाच्या दुकानात सहज काम मिळेल अशी तब्येत आणि ताटात मटण वाढल्यावर आपली ओठांवरुन फिरते… अगदी तशीच प्रत्येक बॉल टाकताना फिरणारी जीभ. आपलं जडशील शरीर घेऊन वॉर्न पळत यायचा आणि त्याचा बॉल असला गपकन वळायचा, की फलंदाज आऊट झाल्यावर त्याला समजायचं की, आपल्यासोबत काय झालंय.

ऑस्ट्रेलियाकडून वॉर्न १९९२ पासून २००७ पर्यंत खेळला. त्यानं आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये टोटल १००१ विकेट घेतल्या. सचिनपासून स्ट्रॉस, जयसूर्या, कूक, इंझमाम, द्रविड सगळ्यांना त्यानं कधी ना कधी घाम फोडलाच. आता जितका मैदानातल्या कामगिरीमुळं वॉर्न चर्चेत राहिला, तितकाच मैदानाबाहेरच्या लफड्यांनी पण. कधी नर्सला मेसेज केला म्हणून, कधी रुममध्ये दंगा केला म्हणून. एवढंच काय त्याच्या मृत्यूनंतरही.

२००७ मध्ये वॉर्न रिटायर झाला, तेव्हा सगळ्या जगाला वाटलं आता काय हा परत फिल्डमध्ये दिसत नसतोय. पण पुढच्याच वर्षी क्रिकेटच्या मैदानात आलं आयपीएल नावाचं वादळ. सचिन, पॉन्टिंग, जयसूर्या, द्रविड, कुंबळे सगळे जुने धुरंधर मैदानात उतरले खरे, पण वॉर्नला खेळायची हौस उरली नव्हती.

मग पिक्चरमध्ये आले, मनोज बदाळे.

महाराष्ट्रातल्या धुळ्यात जन्म झालेल्या बदाळेंचं शिक्षण झालं इंग्लंडमध्ये. त्यांनी तिकडेच आपलं व्यावसायिक साम्राज्य बनवलं. फायनान्स, मीडिया आणि इतर क्षेत्रातही त्यांनी आपला जम बसवला. पुढं २००८ मध्ये जेव्हा आयपीएलचं बिगुल वाजलं, तेव्हा बदाळेंनी राजस्थान रॉयल्स संघ विकत घेतला.

कोलकाता, मुंबई, बँगलोर या संघांकडे सचिन, गांगुली, द्रविड असे आयकॉन प्लेअर होते. राजस्थानकडे मात्र असा प्लेअर नव्हता, मग त्यांनी ठरवलं वॉर्नला आपल्या संघात घ्यायचा.

पण वॉर्न काय तयार होईना, त्यामुळं संघमालक बदाळेंनी त्याच्या एका जखमेची हळूच खपली काढली.

वॉर्न ऑस्ट्रेलियाकडून १५ वर्ष खेळला, १४५ टेस्ट मॅचेस खेळला… पण त्याला एकदाही टेस्टमध्ये कॅप्टन्सी करायला मिळाली नाही. बदाळे वॉर्नला म्हणाले, ‘तू राजस्थानच्या संघात ये. तिकडे येऊन नेतृत्व कर, म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही कळेल, की तुला कॅप्टन न करुन त्यांनी काय मिस केलं.’

आता एवढं चार्जिंग तुम्हाला आम्हाला मिळालं असतं, तर आपणही राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन झालो असतो. तिथं वॉर्नचं काय घेऊन बसलात.

भाऊ आयपीएलमध्ये आला, रॉयल्सचा कॅप्टन बनला आणि पहिल्याच आयपीएलमध्ये त्यांना विजेतेपदही मिळवून दिलं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेली ही फायनल पार शेवटच्या बॉलपर्यंत गेली आणि वॉर्न आणि त्याच्या तरण्याताठ्या संघानं फायनल मारली देखील. त्या सिझननंतरही वॉर्ननं आपण कॅप्टन म्हणून वांड ठरलो असतो, हे दाखवून दिलं.

कधीकाळी मैदान गाजवणारा वॉर्न आता फक्त फ्लेक्समध्ये दिसतो आणि वर लिहिलेलं असतं…

Forever the first Royal. 

वॉर्न खरंच रॉयल होता, मैदानातही आणि मैदानाबाहेरही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.