आमदार म्हणाले, “विठोबाला दक्षिणा द्यायची असेल तर देवाच्या गाडीला ब्रॉडगेज करा”

सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी पंढरपूरात येत असतात. देवाच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतेच अस नाही.

मराठवाड्यातुन असे हजारो वारकरी देवाच्या गाडीने पंढरपूरला दाखल व्हायचे.

देवाची गाडी उर्फ बार्शी लाईट.

नाव बार्शी पण मिरज ते लातूर असा हा नॅरोरेल्वेमार्ग होता. अगदी चालत जाणाऱ्या वाटसरूनेही पकडावी एवढा तिचा वेग असायचा. कोळश्यावर चालणारे इंजिन त्याला एकूण ७ लाकडी डब्बे होते.

त्यात गळ्यात माळ घातलेले, माऊलीचा जप करणारे माळकरी. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास अशी कोणतीही वर्गवारी नाही. अगदी दहा पंधरा रुपयात आपल्या स्टेशनला नेणारी रेल्वे खरंच देवाची गाडी होती.

मात्र या देवाच्या गाडीला नॅरो गेजवरून ब्रॉड गेज करायला पंढरपूर वासियांना मोठा संघर्ष करावा लागला. त्याच्याशीच जोडले गेलेले राष्ट्रपतींचे दोन किस्से.

सर्वात पहिला किस्सा राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा 

पंढरपुरात तेव्हा संत नामदेव महाराजांच्या जन्मसप्तशताब्दीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रपती होते ग्यानी झैलसिंग. त्यांचा धर्मशास्त्राचा अभ्यास मोठा होता.  ग्रंथसाहिब या धर्मग्रंथाचे सूक्ष्मपठण व अध्ययन केले. त्यांच्या या क्षेत्रातील प्रावीण्यामुळे त्यांस ग्यानी म्हणजेच ज्ञानी असं म्हटलं जायचं. फक्त शीख धर्मच नाही तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ज्यू या सर्व धर्मांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संत नामदेवांची भजने गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांनी देखील अभ्यासली होती.

म्हणूनच नामदेवांच्या जन्म सप्तशताब्दी निमित्त ते पंढरपूरला आले.

या उत्सवासाठी स्वतः राष्ट्रपतींचे आगमन झाल्यामुळे संतांची पंढरी नव्या उत्साहाने सजली होती. राष्ट्रपती आले ते प्रथम चंद्रभागेच्या काठावरील नामदेव मंदिरात गेले. तेथील नामदास महाराज हे संत नामदेवांचे वंशज आहेत, हे सांगितल्यावर ते नामदास महाराजांच्या पाया पडले. नंतर महाद्वारातून संत नामदेव पायरीशी आल्यावर त्यांनी देवळाच्या दरवाजात, नामदेव पायरीला साष्टांग दंडवत घातला.

पंजाबी आणि शीख बांधवांना संत नामदेव यांच्याविषयी किती आदर आहे, याचे त्याक्षणी प्रत्यंतर आले. त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. तेव्हा, राष्ट्रपतींनी विठ्ठलासमोर दक्षिणा  द्यायची असा प्रश्न केला. तेव्हा तिथे उपस्थित असणारे पंढरपूरचे आमदार तात्यासाहेब डिंगरे एका झटक्यात म्हणाले,

‘बार्शीलाईट रेल्वे ब्रॉडगेज करा व अमृतसर-पंढरपूर अशी नानक-नामदेव एक्स्प्रेस चालू करा.’

त्यावर ग्यानी झैलसिंग प्रसन्नपणे हसले. ते दिल्लीला परतले मात्र पंतप्रधानांशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांना आपल्या कार्यकाळात देवाच्या गाडीवर काही निर्णय घेता आला नाही. 

ग्यानीजींच्या नंतर पंढरपूरबद्दल आस्था असणारे राष्ट्रपती म्हणजे पंडित शंकर दयाळ शर्मा.

स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या शंकर दयाळ शर्मा यांनी एकेकाळी पुण्यात शिक्षक म्हणून नोकरी केली होती. तेव्हा आळंदीहुन पंढरपूरला जाणारी लाखो वारकऱ्यांची वारी त्यांनी अनुभवली होती. विठ्ठ्लप्रेमाने घरदार विसरून पायपीट करणाऱ्या या भाविकांचा प्रभाव शर्मा यांच्यावर देखील पडला होता. अध्यात्मिक  विचारांचे शंकर दयाळ शर्मा तेव्हापासून पंढरीचे भक्त बनले.

पुढे राजकारणात आले, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनले, राज्यपाल, उपराष्ट्र्पती ते थेट राष्ट्रपतीपदापर्यंत ते पोहचले. मात्र राष्ट्रपती झाल्यावरही आषाढीला पंढरपूरला भेट देण्यास ते विसरले नाहीत. सर्वोच्च पदावर असताना किमान चार पाच वेळा तरी त्यांची विठुरायाच्या मंदिरात पूजा झाली होती. त्यांच्याच आग्रहामुळे मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे देखील आषाढी एकादशीला पंढरपूरला येऊ लागले. गेली पंचवीस तीस वर्षे दिग्गी राजांनी हि परंपरा कायम राखली आहे.

अशा या शंकर दयाळ शर्मा यांच्या पंढरपूर भेटीची एक आठवण महाराष्ट्राचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी सांगितला आहे.

पंडित शंकर दयाळ शर्मा हे जेव्हा पंढरपूरला पूजेसाठी यायचे तेव्हा बऱ्याचदा उल्हासदादा पवार  असायचे. अशीच एकदा पूजा होती. राष्ट्रपती सहकुटुंब या पूजेसाठी हजर झाले होते. विठ्ठल रखुमाईची यथासांग पूजा पार पडली. राष्ट्रपतींनी देवाच्या चरणी पैसे अर्पण केले.

राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा पूजा पार पाडून बाहेर पडणार इतक्यात तिथल्या पुजारीने दक्षिणेची मागणी केली. कोणीतरी सांगितलं की राष्ट्रपतींनी देवाच्या चरणाशी दक्षिणा ठेवली आहे.

यावर ते पुजारी महोदय म्हणाले,

“ते पैसे माझे नाहीत. ते देवाचे झाले. माझी दक्षिणा वेगळी द्या.”

उल्हास पवार सांगतात मी या घटनेचा साक्षीदार आहे. स्वतः राष्ट्रपतींना या गोष्टींशी सामना करावा लागला असेल तर इतर गोरगरीब भाविकांची तर पिळवणूकच होत असणार आहे. पण पंडित शंकर दयाळ शर्मा यांनी या बद्दल वाईट वाटून घेतलं नाही. त्यांनी जुन्या राष्ट्रपतींची म्हणजे ग्यानी झैल सिंग यांची राहिलेली दक्षिणा पुरी करायचं ठरवलं.

ती दक्षिणा म्हणजे देवाच्या गाडीला नॅरो गेज पासून ब्रॉड गेज करणे.

राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यामुळेच अनेक वर्षे चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून पडलेला बार्शी लाईटचा नॅरोगेजचा मार्ग त्यांनी मार्गी आणला. त्यांनी या प्रकल्पाला गती दिली. पुढे संपूर्ण मार्ग ब्रॉडगेज होण्यासाठी आणखी वीस वर्षे गेली पण त्याला हिरवा सिग्नल देण्याचं श्रेय मात्र शंकर दयाळ शर्मा यांनाच दिल जातं.

हे ही वाच  भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.