जयकिशन गेल्यानंतरही शंकरने दोघांचं नाव वापरून सिनेमांना संगीत दिलं

हिंदी सिनेसृष्टीत अनेक संगीतकार जोड्यांनी संगीतक्षेत्रात खूप चांगलं काम करून ठेवलं. लक्ष्मीकांत – प्यारेलाल, साजिद – वाजीद, विशाल – शेखर ते अगदी अजय – अतुल पर्यंत अनेक जणांची उदाहरणं देता येतील. याच संगीतकार जोडीमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे शंकर – जयकिशन. हिंदी सिनेसृष्टीत एक मोठा काळ या संगीतकार जोडीने गाजवला आहे. आज या शंकर – जयकिशन जोडी मधील ग्रेट संगीतकार शंकर यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा सूरमयी प्रवास…

कुस्तीची आवड असणारा शंकर संगीतकार झाला

शंकर यांचं पूर्ण नाव शंकर सिंग रघुवंशी. लहानपणापासून शंकरला कुस्ती खेळण्याची खूप हौस होती. त्यामुळे ते नियमितपणे व्यायाम आणि कसरत करायचे. लहानपणी आपण ज्या गोष्टींना आकर्षित होतो ती गोष्ट करण्याचा ध्यास घेतो.

शंकरजींचं सुद्धा असंच झालं. एका देवळात ते दररोज जात असत. तेव्हा खूप वेळा देवाच्या आरतीच्या वेळेस तसेच पूजेच्या वेळेस एक तबलावादक तबलावादन करायचा. त्यांचं तबलावादन बघून शंकर घरी तबला वाजवायचा. कुस्तीपासून आपसूक शंकरचा कल तबलावादन करण्याकडे वळला. एका मैफलीत उस्ताद नासिर खान यांची तबला वाजवणाऱ्या शंकरवर नजर गेली. यानंतर तबला वादनाचं रीतसर शिक्षण देण्यासाठी त्यांनी शंकरला शिष्य बनवून घेतले.

शंकरला मिळाली जयकिशनची साथ

तबलावादन करण्यात तरबेज झालेले शंकर मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांच्या कलेला आणखी वाव मिळाला. जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये ७५ रुपये पगारावर शंकर यांनी तबला वादक म्हणून नोकरी पत्करली. इथेच ते सितार वाजवायला सुद्धा शिकले.

या दरम्यान त्यांची गुजराती फिल्ममेकर चंद्रवदन भट्ट यांच्याशी ओळख झाली. एकदा चंद्रवदन यांना भेटायला गेले असता बाहेर कामाच्या शोधात जयकिशन बसले होते. जेव्हा चंद्रवदन यांनी जयकिशनला आतमध्ये बोलावले तेव्हा त्यांना कळलं की, जयकिशन उत्तम हार्मोनियम वादक आहे.

तिथेच शंकर आणि जयकिशन यांची मैत्री झाली. कारण संगीत हा या दोघांच्या मैत्रीमधला मुख्य दुवा होता.

त्याचवेळी पृथ्वी थिएटरसाठी हार्मोनियम वादकाची गरज होती. म्हणून शंकरने जयकिशनला पृथ्वी मध्ये नोकरी मिळवून दिली. राज कपूर यांचं पृथ्वी थिएटरमध्ये सतत येणं जाणं असायचं. त्यांना या दोघांबद्दल माहीत होतं.

त्यामुळे १९४९ साली राज कपूर यांनी ‘बरसात’ सिनेमासाठी शंकर – जयकिशन यांना संगीतकार म्हणून निवडले.

आणि अशाप्रकारे ‘बरसात’ सिनेमाच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात या दोघांनी पदार्पण केलं. पुढे शंकर – जयकिशन या जोडीने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी प्रचंड गाजली.

हे दोघे जितक्या सहजतेने एकत्र आले तितक्याच शांतपणे वेगळे झाले. एरवी एखादी जोडी तुटल्यावर मीडियाला लगेच खबर लागते. पण या दोघांच्या वेगळेपणाची माहिती फार कमी जणांना माहीत होती.

झालं असं, शंकर आगामी सिनेमात गाणं गाण्यासाठी शारदा या नव्या गायिकेला संधी देणार होते. परंतु या गोष्टीसाठी जयकिशन तयार नव्हते. त्यांना गाण्यासाठी लता मंगेशकर योग्य वाटत होत्या. या गोष्टीवरून दोघांचे मोठ्या प्रमाणात मतभेद झाले.

यामुळे शंकर – जयकिशन वेगळे झाले.

साथ सुटली पण नाव नाही

विचारांनी वेगळे झाले तरी इतक्या वर्षांची गाढ मैत्री सहजासहजी विसरणं शक्य नव्हतं. दोघांनी या गोष्टीची कुठेही बोंबाबोंब केला नाही. यानंतर दोघेही स्वतंत्र रित्या काम करू लागले. वेगवेगळे काम करत असले तरीही दोघेही शंकर – जयकिशन हेच नाव संगीतकार म्हणून वापरायचे. या सर्व प्रकरणात जयकिशन यांना दारूचं व्यसन लागलं. आणि १९७१ रोजी जयकिशन यांचं निधन झालं.

मित्राला दिलेला शब्द शंकरने पाळला

आपल्या दोघांपैकी जो कोणी आधी हे जग सोडून जाईल, त्याच्यानंतर दुसऱ्याने दोघांचं नाव तसंच ठेवून काम सुरू ठेवावं’

असं या दोघांचं एकदा बोलणं झालं होतं. जयकिशन गेल्यानंतर मित्राला दिलेला शब्द शंकरने पाळला. १९७१ नंतर आलेल्या ‘बेनाम’, ‘रेशम की डोरी’, ‘संन्यासी’ या सिनेमांना शंकर यांनी स्वतःचं नाव न देता शंकर – जयकिशन हे नाव संगीतकार म्हणून दिलं.

मतभेद झाले असले तरीही मैत्री लक्षात ठेवून दिलेला शब्द पाळणारा शंकर फार मोठा संगीतकार म्हणावा लागेल.

महान संगीतकाराच्या मृत्युसमयी कोणी नव्हतं

जयकिशनच्या निधनानंतर शंकरने सुध्दा इतकं काम केलं नाही. त्यांचंही कामातून मन उडालं होतं. १९८७ साली शंकर यांचं निधन झालं. परंतु तेव्हाच्या फार कमी वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली. तसेच शंकरजी यांचंं कुटुंबीय सोडले तर हिंदी सिनेसृष्टीतील फार कमी मंडळी त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस उपस्थित होते.

तर असा होता संगीतकार शंकर यांचा प्रवास. ३५० पेक्षा जास्त गाणी शंकर – जयकिशन यांनी संगीतबद्ध केली आहेत. मित्र सोडून गेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत असलेली मैत्री कशी जपावी, हे शंकर यांच्याकडे पाहून कळतं. आज शंकर जरी नसले तरी त्यांच्या गाण्याच्या रूपातून ते कायम आपल्या सोबत असतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.