सिगरेटच्या धूरावर प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराजांच्या या पाच गोष्टी माहित आहेत का ?

आम्ही कैलासहून आलो, आमचे नावही शंकर. शंकर महाराज हे अलिकडच्या काळात होवून गेलेले दैवीपुरूष. त्यांना दैवीपुरूषांची उपमा त्यांचे भक्त देतात. या भक्तांच्या यादीत आचार्य अत्रे यांच देखील नाव असल्याचं सांगितलं जाते. महाराष्ट्रासोबत संपुर्ण भारतामध्ये महाराजांचे भक्तगण पसरले आहे. जेव्हा जेव्हा शंकर महाराजांचं नाव निघतं तेव्हा पहिला मुद्दा चर्चेला येतो तो  म्हणजे महाराजांना सिगरेट चालते. भक्तांकडून जशा अगरबत्या पेटवल्या जातात तशा महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. मग अनेकांना प्रश्न पडतो हे कस काय चालू शकतं ? 

तर याबद्दल भक्त सांगतात महाराजचं म्हणाले होते, 

“त्या सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकून येतो, धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात.”

१) महाराज मुळचे कुठले –  

नदीचं मुळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये अस म्हणतात. महाराजांच पण काहीस तसच आहे. महाराज मुळचे कुठले हे कोणालाच ठामपणे सांगता येत नाही. पण महाराजांबद्दल एक कथा सांगितली जाते ती म्हणजे महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील अंतापूरचे. तिथे चिमणाजी नावाचे ग्रहस्थ राहत असत. त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये शंकराने दृष्टांत दिला. रानात जा तिथे बाळ मिळेल. ते रानात गेले तिथे त्यांना लहान मुल मिळाले. आपल्या मुलासारखं त्यांनी या मुलाला वाढवलं पण मुलगा मोठ्ठा होताच संभाळ करणाऱ्या माता पित्याला त्यांनी आशिर्वाद दिला पुत्रप्राप्ती भव आणि निघून गेले. 

स्वत:च्या आईवडलांनाच अपत्यप्राप्तीचा आशिर्वाद देणारे महाराज अशी कथा त्यांच्याबाबात सांगितली जाते. 

२)  महाराजांच वय १६२ वर्ष –  

भक्तांकडून केला जाणारा दूसरा दावा म्हणजे महाराजांच वय १६२ वर्ष होतं याबाबत पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापक असणाऱ्या भालचंद्र देव यांनी महाराजांना विचारलं होतं महाराज तुमच वय काय  ? तेव्हा महाराज म्हणाले होते, मी पेशव्यांसोबत जेवणाच्या पंगतीला बसलोय. तेव्हा महाराजांच वय १५० वर्ष होतं. १९४७ साली महाराजांनी समाधी घेतली त्या वेळी महाराजांच वय १६२ वर्ष असल्याचा अंदाच भक्तांकडून लावला जातो. याबाबत दावा करत असताना अस सांगितलं जात की पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबत मेडिकल टेस्ट केली होती तेव्हा महाराजांचे वय १५० च्या दरम्यान असल्याचा त्यांनी अंदाज बांधला होता. 

३) महाराजांना रशियन पासून सर्वच भाषा येत होत्या –  

हा तिसरा दावा. जेव्हा भक्तमंडळी दर्शनाला येत तेव्हा महाराज प्रत्येकासोबत त्यांच्या मातृभाषेतूनच बोलत असत. एक रशियन जोडपे महाराजांबाबत ऐकून त्यांच्या दर्शनाला आले होते तेव्हा महाराजांनी त्यांच्यासोबत रशियन भाषेत संवाद साधला होता अस सांगितल जातं.  भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा महाराजांना येत होत्या व त्या त्या भाषिक व्यक्तीबरोबर ते त्याच्याच भाषेत संवाद साधत असत अस सांगितलं जातं. 

४)  फेवरेट आकडा १३ –

महाराजांचा आवडता आकडा तेरा होता. महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म १३ तारखेला झाल्याचं सांगतात. याबाबतीत देखील एक दंतकथा सांगण्यात येते ती म्हणजे महाराजांच्या समाधीनंतर ५४ वर्षांनी माधवनाथ बाबा पावागडचा डोंगर उतरत असताना त्यांना महाराजांचे दर्शन झाले. 

हे ही वाचा – 

महाराजांनी १० हॉटेलमध्ये चहा पिला व प्रत्येक ठिकाणी १३ रुपये इतकच बील झालं. महाराजांनी प्रत्येक वेळी शंभर रुपयाची नोट दिली पण पैसे परत घेतले नाहीत असही सांगतात. 

इतकच काय तर प्र.के. अत्रे यांचा जन्म आणि मृत्यूची तारिख १३ अशी आहे. या घटनेचा संबध देखील महाराजांशी जोडला जातो. 

५) हैद्राबाद संस्थानाची अखेर होणार हे महाराजांनीच सांगितलं –

हैद्राबाद संस्थानाचा निजाम हा महाराजांचा भक्त पण त्यानंतर आलेला निजाम मात्र महाराजांचा भक्त नव्हता. त्याने महाराजांना संस्थानातून हाकलून लावलं त्यानंतर हैद्राबादच्या मुसी नदिला पूर आला. महाराजांना क्रोध आलेला. तेव्हा हैद्राबादच्या निजामाने त्यांना पालखीतून बोलवून घेतलं. महाराज म्हणाले तुझ संस्थान संपणार पुढे झालं देखील तसच. 

या गोष्टी होत्या त्या भक्तांकडून सांगितल्या जाणाऱ्या, अतिकल्पित असणाऱ्या या गोष्टींवर विश्वास ठेवणं हा ज्याच्यात्याच्या भक्तीचा मार्ग आम्ही काय बोलणार. अशा बऱ्याच गोष्टी ऐकीव असतात. योगायोग त्याला जोडले जातात. व्यक्तिमहात्म निर्माण करण्याच्या मोहात अशा गोष्टी घडतच असतात पण एक गोष्ट मात्र ढळढळीत सत्य आहे ती म्हणजे महाराजांच्या प्रतिमेसमोर सर्वजण सिगरेटच पेटवत असतात. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.