राष्ट्रपतींच्या समोर मुलीच्या अन् जावयाच्या मारेकऱ्यांच्या दयेचा अर्ज येतो तेव्हा..

३१ जुलै १९८५. संध्याकाळची वेळ काँग्रेसचे नेते आणि दिल्लीचे खासदार ललित माकन आपल्या किर्ती नगरमधल्या घरातून बाहेर पडले. रस्त्याच्या पलीकडे त्यांची कार पार्क केली होती. तिच्या दिशेने निघाले.

ललित माकन यांची पत्नी गीतांजली घरात आवरा आवर करत होती. अचानक बाहेर गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर धावत आली, समोर तीन शीख तरुण हातात बंदूक घेऊन उभे होते आज तिचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

काही कळायच्या आत त्या शीख तरुणांनी तिच्यावरही गोळ्या झाडल्या अन् आपल्या यामाहावरून तिथून पळून गेले.

ललित माकन यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. गीतांजली माकन आणि माकन यांचे एक सहयोगी बालकिशन हे या गोळीबारात जखमी झाले होते, यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचाही मृत्यू झाला.

या सर्व हत्येमागे होते खलिस्तान कमांडो फोर्सचे अतिरेकी , कारण होत १९८४ सालच्या शीख दंगली.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली, याचा बदला म्हणूज दिल्लीत दंगली पेटल्या. हजारो शिखांचे शिरकाण करण्यात आले. कित्येकांची घरे जाळण्यात आली. रक्ताचे पाट वाहले. या सगळ्या दंगलखोरांच्या मागे काँग्रेसचे नेते होते अस म्हटलं गेलं. यात ललित माकन देखील होते असा शिखांचा आरोप होता.

या दंगलीमुळे खलिस्तानची मागणी करणारे आणखी चवताळले. अख्खा पंजाब पेटला आणि सुरू झाले कधीही न थांबणारे हत्यासत्र. ललित माकन हे या हत्यासत्राचे सर्वात मोठे बळी ठरले.

हरजित सिंग जिंदा, सुखदेव सिंग सुख्खा आणि रणजित सिंह गिल उर्फ कुक्की या तिघांनी ललित माकन व त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. घटनास्थळावरून पाबोरा करण्यात त्यांनी यश मिळवले. कुक्कीने तर थेट बॉर्डर पार करून तो अमेरिकेला पोहचला. तर जिंदा- सुख्खा ही जोडगोळी भूमिगत होऊन बँक लुटणे वगैरे मोठमोठ्या कामगिरी बजावू लागली.

जिंदा आणि सुख्खाची दहशत देशभरात पसरली. ते दोघेही अतिशय बेडर होते. यामाहा मोटरसायकलवरून ते सर्वत्र फिरायचे. दोघांची दोस्ती सुद्धा पक्की होती. एकमेकांना सोडून ते कुठे जायचे देखील नाहीत. सगळ्या कारवाया त्यांनी एकत्र पार पाडल्या.

१० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्याच्या शिमला ऑफिसजवळ माजी लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यावर त्यांनी हल्ला केला.

ऑपरेशन ब्ल्यूस्टार हे अरुण कुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आलं होतं म्हणून त्यांच्यावर खलिस्तानवाद्यांचा राग होता. जनरल वैद्य यांची हत्या जिंदा व सुख्खा यांनी केली मात्र यावेळी ते पळून जाऊ शकले नाहीत. पिंपरीत त्यांच्या यामाहाचा ट्रकला धडकून अपघात झाला आणि सुख्खा सापडला.

पुढे एक वर्षांनी जिंदा देखील दिल्लीत सापडला. कुक्कीला इंटरपोलने अमेरिकेत न्यूजर्सीमध्ये अटक केली. मात्र त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी दहा वर्षे उलटावी लागली.

जिंदा व सुख्खा यांनी कोर्टात आपला गुन्हा कबूल केला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. योगायोग असा जेव्हा त्यांच्या फाशीच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पोहचला तेव्हा राष्ट्रपती होते डॉ. शंकरदयाळ शर्मा. ललित माकन यांचे सासरे आणि गीतांजली माकन यांचे वडील.

एकेकाळचे शिक्षक, स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक व मध्यप्रदेशचे मोठे नेते असलेल्या शंकरदयाळ शर्मा यांची व्यासंगी व विद्वान गांधीवादी अशी देशभर ओळख होती. ललित व गीतांजली माकन यांची हत्या झाली तेव्हा ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. ती घटना घडल्यावर त्यांनी खंबीरपणे पंजाबच्या राज्यपालपदाची जबाबदारी उचलली.

पुढे केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली होती मात्र त्यांनी वयाचे कारण देऊन नकार दिला होता. अखेर त्यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं होतं.

आपल्या लाडक्या मुलीच्या हत्येच्या सात वर्षानंतर तिच्या हत्याऱ्यांच्या माफीचा अर्ज त्यांच्या टेबलवर आला. अस म्हणतात की त्या दिवशी राष्ट्रपती प्रचंड रडले होते. पण आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांना न्याय द्यावा लागणार होता. फक्त त्यांची मुलगी व जावई यांच्या मृत्यूची बाब नव्हती तर देशाचे लष्करप्रमुख जनरल वैद्य यांचा देखील खून करणाऱ्या अतिरेक्यांना माफी कशी देणार? त्यांनी माफीचा अर्ज फेटाळला.

९ ऑक्टोबर १९९२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात जिंदा व सुक्खा यांना फासावर लटकविण्यात आले. तर कुक्कीला २००० साली भारतात आणण्यात आले. इथे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली. २००९ साली आपली शिक्षा संपवून बाहेर आला. त्याची ललित माकन यांच्या मुलीने भेटदेखील घेतली होती व आपल्या वडिलांच्या मृत्यूबदल मोठ्या मनाने माफदेखील केले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.