महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. पण पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं.

औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्यांनतर राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. 

मग मात्र औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला. पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. त्याला कारण ठरल्या होत्या, भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. 

१७०७ साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगिर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला…पण स्वराज्याच्या कार्यात त्यांना सेनापती धनाजी जाधव, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ आदी मात्तबर सेनानीना त्यांना मुघलांशी लढा द्यायला साथ दिली.

पण यांच्याशिवाय मराठा साम्राज्यातील एक महत्वाचं आणखी एक महत्वाचं नाव होतं जे क्वचितच तुम्हाला माहिती असेल, शंकराजी नारायण गांडेकर !

शंकराजी नारायण गांडेकर, ज्यांना शंकराजी नारायण सचीव किंवा शंकराजी नारायण म्हणूनही ओळखले जाते, ते मराठा साम्राज्याचे लोकप्रिय प्रधान होते तसेच सरदार होते. त्यांनी सम्राट छत्रपती राजाराम यांच्या कारकिर्दीत शाही सचिव म्हणूनही काम केले. त्यांनी सम्राट छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखाली राज्याभिषेक राजज्ञा म्हणूनही काम केले. मुघल राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांचे योगदान मोठे समर्थनीय मानले जाते. 

ते पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानाचे संस्थापक होते. त्यांचे मूळ घराणे पैठणकडील गांडापूर येथील ते देशपांडे. मोरोपंत पिंगळे यांनी शंकराजीस आपल्या पदरी ठेवून घेतले. संभाजीच्या काळात महत्त्वाच्या कामगिऱ्या पार पाडल्या म्हणून त्यांना ‘राजाज्ञा’ किताब मिळाला होता.

१६९० मध्ये शंकरराव नारायण त्यांना अष्टप्रधानात सचिवपद मिळाले. त्यांनी स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले मुघलांकडून जिंकून घेतले. 

उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याची मोहीम फत्ते केली होती. १७०५ मध्ये त्याने रोहिडा किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला राजगड पुन्हा मराठा साम्राज्याशी जोडला.

‘मदारूल महाम’ म्हणजे राज्याचे आधारस्तंभ असा त्यांचा उल्लेख मुघली कागदपत्रातून होत असे. राजारामाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात हेच प्रमुख मंत्री आणि कारभारी होते.  काही काळ अष्टप्रधान मंडळावर त्यांचाच प्रभाव होता. कोकणातीलही बराच मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. जिंजीपासून साताऱ्यापर्यंतच्या प्रदेशावर देखरेख ते करीत.

दूधभातावर हात ठेवून त्यांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती.

प्रारंभी ते ताराबाईंच्या पक्षाला मिळाले. शंकराजी राजारामच्या राणी ताराबाईच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक होते. परशुराम पंत प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्तपणे, त्यांनी ताराबाईंना राजाराम महाराजांच्याच्या रिक्त गादीवर बसण्यासाठी राणीचा मुलगा शिवाजी दुसरा यांना मदत केली. 

१७०७ मध्ये शाहूची मुघल छावणीतून सुटका झाल्यानंतर शाहू आणि ताराबाई यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले. शाहूंनी शंकराजींना त्यांच्यासोबत सामील होण्याचे आवाहन केले अन्यथा परिणामांना सामोरे जावे म्हणून इशारा दिला.ताराबाईंशी एकनिष्ठ असलेले शंकराजी मोठ्या संभ्रमात आणि नैराश्यात अडकले होते. तथापि छतपती शाहू महाराष्ट्रात येताच त्याला सामील व्हावे तर शपथ मोडते आणि न सामील व्हावं तर राजद्रोहाचे पाप मिळते….अशा द्विधामन:स्थितीत ते सापडले….त्यांना काहीच मार्ग सुचेना शेवटी त्यांनी गंभीर पाऊल उचलले……म्हणजेच हिरकणी खाऊन त्यांनी आत्मघात करून घेतला. इतके ते वचनाचे पक्के होते……! नोव्हेंबर १७०७ मध्ये नागनाथजवळील आंबवडे येथे त्यांनी आत्महत्या केली.

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.