जेव्हा विमानात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या शेजारी धीरूभाई अंबानी येऊन बसतात.

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. स्व.शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. कडक शिस्तीचे मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती होती. याच शिस्तीमुळे लोक त्यांना गंमतीने हेडमास्तर म्हणून ओळखायचे.

मुख्यमंत्री कार्यालयात सर्व प्रकारच्या माणसांची कामासाठी रांगा लागलेल्या असतात. पूर्वापार आपण पाहत आलोय की मोठमोठे उद्योगपती आपल्या वजनाचा वापर करून आपली कामे करून घेतात. पण शंकरराव चव्हाण याला अपवाद होते.

याबद्दलचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे.

एकदा काय झालं की सुप्रसिध्द उद्योगपती स्व. धीरूभाई अंबानी यांच कसली तरी काम होतं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना  भेटायची वेळ मागितली. पण शंकरराव त्यांची भेट टाळत होते. धीरुभाई अंबानी हे जन्मजात चिकाट स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी प्रयत्न करणे थांबवलं नाही.

ही भेट झाली मात्र एका अनपेक्षित ठिकाणी.

झालं अस की शंकराव चव्हाणांना काही तरी कामानिमित्त दिल्लीला जावे लागणार होते. त्यांच्या पत्नी कुसुमताई देखील सोबत असणार होत्या. सकाळी ७.३० वाजताच्या इंडियन एयरलाइन्सची एक्झिक्युटिव्ह क्लासची तिकिटे बुक झाली.

तो काळ म्हणजे सरकारी लालफितशाहीच्या कारभाराचा काळ होता. देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये इंडियन एअरलाईन्स ही एकमेव सरकारी कंपनी सेवा होती. आणि कुठेही जायचे तर किमान ८/१० दिवस आधी तिकीट बुक करावे लागत असे.

पण दुर्दैवाने सोमवारी सकाळी निघायच्या वेळी अचानक कुसुमताईंची तब्येत बिघडली. दौरा रद्द करावा लागतो कि काय अशी स्थिती निर्माण झाली. पण काम महत्वाचं होतं त्यामुळे शंकरराव चव्हाणांनी अखेर एकटेच दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.

या गोंधळात काही वेळ गेला. शंकररावांना घरातून बाहेर पडायला ६.४५ झाले. विमान तर ७.३० वाजता होते. उशीर झाला पण मुख्यमंत्र्याची गाडी विमानाच्या शिडी पर्यंत जात असल्यामुळे अगदी धावत पळत कां होईना शंकररावांची फ्लाईट चुकली नाही.

शिडी चढतांना त्यांना फ्लाईट अटेंडंट ने बोर्डींग पास दिला. सीट नंबर होता ए १. जेव्हा शंकरराव आपल्या सीटजवळ पोहचले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांच्या शेजारच्या सिटवर धीरुबाई अंबानी आधीच येऊन बसले होते.

शंकरराव चव्हाणांना पाहताच धीरूभाईंनी उभं राहून अभिवादन केल आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी चक्क त्याकडे दुर्लक्ष केले.

दिल्ली पर्यंतच्या प्रवासात धीरूभाईंनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु गुश्श्यात असणाऱ्या शंकरराव चव्हाणांनी त्यांना हातानेच नकार दिला व पुढील प्रवासातील दोन तास आपल्या सोबत आणलेल्या फाईल्स वाचल्या.

धीरूभाईंनी महद्प्रयासाने मुख्यमंत्र्यांची भेट मिळवली पण कडक शिस्तीच्या शंकरराव चव्हाणांनी त्यांच काम काही होऊ दिल नाही.

पण गोष्ट इथेच थांबत नाही. जेव्हा मुख्यमंत्री मुंबईला परत आले तेव्हा त्यांनी आपल्या वर्ष या सरकारी निवासस्थानातील टेलिफोन ऑपरेटर पासून ते पिए पर्यंत सर्वाना निलंबित केलं. कारण कुसुमताई चव्हाणानी दिल्लीला जाने विमान उड्डाणापूर्वी एक तासापूर्वी रद्द केले होते मात्र ही बातमी धीरुभाई अंबानी यांच्या पर्यंत कशी काय पोहचली.

ज्या काळात ८/१० दिवसाचे आगाऊ बुकींग केल्या शिवाय तिकीट मिळतच नव्हते त्याकाळात सकाळी ६.४५ ते ७.३० ह्या ४५ मिनीटांत धीरूभाई तिकीट काढून मुख्यमंत्र्याच्या शेजारच्या सीटवर पोहोचले कसे हे मोठे कोड राहिले. मात्र आपली चलाखी आणि चिकाटी धीरूभाई अंबानी यांनी दाखवली हे सुद्धा अजबच मानलं पाहिजे.

हा किस्सा माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी इंटरनेटवर एके ठिकाणी सांगितला आहे.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.