तर शंकरराव कोल्हे आफ्रिकेतल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले असते..

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. सहकार, शेती, शिक्षण व करप्रणाली अशा विविध विषयात एक अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. अख्या देशात साखरक्षेत्राचा अभ्यासक म्हणून त्यांना ओळखलं जातं.

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा म्हणजे सहकाराची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरा येथे राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला आणि सहकारातून शेतकऱ्यानां प्रगतीचा मार्ग दाखवला. जिल्ह्यात सगळीकडे साखर कारखाने उभे करण्याची चढाओढ लागली. अनेक तरुण आपल्या भागात विकासाची गंगा आणण्यासाठी उत्सुक होते.

यातच होते कोपरगावचे शंकरराव कोल्हे.

कोपरगाव तालुक्यात येसगावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरवात केली. तेव्हा त्यांचं वय होतं अवघ २१ वर्ष. पुण्याच्या शेतकी कॉलेजमधून बी.एस्सी ॲग्रीच त्यांचं शिक्षण झालं होतं. भारत सरकार त्याकाळात शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार होती त्यात शंकररावांचा समावेश झाला. तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यावर गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याला त्यांनी सुरवात केली. एवढच नव्हे तर खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ देखील उभी केली.

यातूनच त्यांनी आपल्या मित्रांसोबत कोपरगावला साखर कारखाना सुरु करण्याच धाडस केलं. वयाच्या तिसाव्या वर्षी तिथले चेअरमन देखील झाले. कोपरगाव साखर कारखान्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे गावाकडच्या शेतकऱ्यांच्या जीवावर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच शिवधनुष्य उचललं.

कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांच जाळ निर्माण केलं. शिक्षणसंस्था सुरु केल्या. त्यांची ओळखच सहकारसम्राट अशी बनली.

परिसरातील शेतकर्यांना ऊस लागवडीचे तंत्र, अधिक उत्पादनासाठी मार्गदर्शन केले. गोदावरीनदीचे पाणी अडवून कालव्यातून पसरवले तर श्रीरामपूर, कोपरगाव, निफाड या भागाचा प्रचंड विकास होईल हे त्यांनी वेळोवेळी मंडळ. निळवंडे, कश्यपी वालदेवी, गौतमी, भावली धरणासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा तिथले लोक आजही विसरू शकत नाहीत.

अनेक वर्ष विधानसभेत आमदार म्हणून वावरत असताना शेतीवरच्या प्रश्नांवर त्यांचा अधिकार व त्यांचा शब्द अंतिम मानला जाई. राज्याचे कृषी, फलोत्पादन, सहकार, परिवहन, महसूल अशा विविध मंत्रीपदांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या उसशेतीतील अभ्यासामुळे  नॅशनल फेडरेशन, राज्य साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुट अशा विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली.

फक्त राज्यातच नाही तर अख्ख्या देशात साखरेचा अभ्यासक म्हणून त्यांचा दरारा होता. 

मात्र आयुष्यभर शेतीचा विद्यार्थी ही भूमिका त्यांनी सोडली नाही. जिथे जाईल तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीच्या फायद्यासाठी वापरता येईल अशी नवीन टेक्नोलॉजी  समजावून घेण्याकडे त्यांचा भर असायचा. फ्रांस, डेन्मार्क, ब्राझील अशा अनेक देशात त्यांनी दौरे केले. तिथल्या शेतीचा अभ्यास केला. तिथून कृषिविषयक पुस्तके गोळा केली.

त्यांची स्वतःची लायब्ररी ही एक शेतीच्या अभ्यासकांसाठी खजिनाच आहे.

आफ्रिकेत एक लायबेरिया नावाचा एक छोटा देश आहे. तिथली लोकसंख्या जवळपास पाच लाखाच्या जवळपास आहे.  हे सर्व लोक शेतीविषयक व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. त्या देशाची अर्थव्यवस्थाच मुळात ऊस शेतीच्या अवतीभवती चालते. ऊस शेतीत काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या एवढी प्रचंड आहे की त्यामुळे अस म्हणतात की

तिथल्या साखर उद्योगाचा मालक हा संपूर्ण देशाचा सत्ताधीश असतो. 

तर या लायबेरियाचा एक साखर कारखाना विकायचा होता. तिथल्या मालकाला तो कारखाना चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे तो तोट्यात चालला होता. नगरच्या शंकरराव कोल्हे अप्पांना ही बातमी कळाली. त्यांची तर ओळख साखर उद्योगातील भीष्म पितामह अशी होती. त्यांनी तो कारखाना विकत घेण्याची तयारी केली. जवळपास सगळे फायनलही झाले होते मात्र पुढे काही अडचणी आल्या आणि त्यांचा हा प्लॅन बारगळला.

गमतीमध्ये शंकरराव कोल्हे अप्पा कायम म्हणायचे,

“जर तो कारखाना मला मिळाला असता तर त्या आफ्रिकन देशाचा मी राष्ट्राध्यक्ष झालो असतो.”

हा किस्सा जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी आपल्या लौकिक या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Jyotirvidh Shyama Gurudev says

    Nice stories

Leave A Reply

Your email address will not be published.