शंकरराव मोहिते-पाटलांवर बॉम्बहल्ला झाला होता

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उगवतं नेतृत्व म्हणून जन्माला येत होते. सहकाराची विकासगंगा अकलूजच्या माळरानावर उभा रहात होती.  सहकारी साखर कारखान्यासोबत राज्याच्या राजकारणातल्या महत्वाच्या नाड्या त्यांच्या हातात आल्या होत्या.

मी मी म्हणणाऱ्या बऱ्याच जणांना मागे टाकून हा माणूस पुढे गेला होता.

साहजिकच या कर्तृत्वामुळे शत्रू देखील अनेक झाले होते. कोण कुठून वार करतो याचा अंदाज नव्हता पण कालचा पोरगा आज इतका मोठा होवून बसतो ही गोष्ट सहजासहजी पटणारी नव्हतीच.

त्यातूनच शंकरराव मोहिते यांच्यावर बॉम्बहल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत. महाराष्ट्रातील पहिल्या फळीतल्या नेत्यांवर असा हल्ला होण्याचा बहुतेक हा एकमेव किस्सा असावा.

तारिख होती २६ जूलै १९७५ ची.

शंकरराव मोहिते तेव्हा दिल्लीत असणारी नॅशनल शुगर फेडरेशनची मिटींग आटपून दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहचले होते. शंकरराव मोहितेंचा तेव्हा दिनक्रम देखील भरगच्च असायचा. मुंबई आल्या आल्या जहांगिर आर्ट गॅलेरी येथे प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत त्यांना एका चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन करायचे होते. ठरल्याप्रमाणे ते उद्धाटन करण्यासाठी रवाना झाले. उद्धाटनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तात्काळ शंकरराव मोहिते पुण्याच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

पुण्यातील पथिक हॉटेलमधली मिटींग आटोपता आटोपता रात्र झाली. आत्ता रात्रीचा मुक्काम पुण्यातच करावा असे नियोजन करण्यात आले होते. पण दूसऱ्या दिवशी सकाळी अकलुज येथे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटींग नियोजित करण्यात आली होती.

ही मिटींग उद्याचं घेणं भाग असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास पुणे सोडण्याचा निर्णय शंकरराव मोहिते यांनी घेतला.

शंकरराव मोहिते यांच्यासोबत शिवदास कुंभार व टि.एम. काळे हे दोन सहकारी होते. नेहमीप्रमाणे गाडी चालवण्याची जबाबदारी शंकरराव मोहिते यांचा सरदार नावाचा ड्रायव्हर पार पाडत होता. रात्री निघण्याचा निर्णय तसा धोक्याचाच होता, कारण त्या काळात आजच्या इतक्या सुरक्षा रस्त्यांवर नव्हत्या. रात्रीच्या प्रवासात गाडी पंक्चर झाली काय किंवा लुटमार झाली काय याचा थांगपत्ता दूसऱ्या दिवशी वर्दळ वाढल्यानंतरच लागत असे असा तो काळ होता. तरिही शंकरराव मोहित्यांनी या काळोखात अकलूज गाठण्याचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे ते पुण्यावरून अकलूजला जाण्यासाठी निघाले. गाडी पाटस चा घाट ओलांडून पुढे आली. घाट ओलांडून गाडी पुढे येते तोच रस्त्यांवर दोन तरुण एका मोटारसायकलवर थांबून असलेले त्यांना दिसले.

रात्री अपरात्री काहीतरी खोळंबा झालेला दिसतो म्हणून सरदार नावाच्या ड्रायव्हरला शंककराव मोहितेंनी गाडीचा वेग हळु करण्यास सांगितले. गाडी त्या मोटारसायकल स्वारांच्या जवळ थांबणार तोच गाडीच्या पाठीमागे जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून सरदारने गाडी पून्हा वेगात पळवण्यास सुरवात केली. गाडीचा वेग वाढल्याचं पाहून पून्हा एक बॉ म्ब थेट गाडीवर भिरकावण्यात आला. सुदैवाने हा बॉ म्ब गाडीच्या मागील बाजूवर आदळला.

स्फोट झाल्यानंतर गाडीच्या पाठीमागच्या काचांचा चुरा झाला. किरकोळ प्रमाणात शंकरराव मोहितेंच्या हाताला जखम झाली.

कोठेही गाडी न थांबवता ही थेट अकलूज गाठण्यात आलं. दूसऱ्या दिवशी शंकरराव मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांची वर्दी संबधित अधिकाऱ्यांकडे दिली. या घातपाताच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात होता हे मात्र कायमच कोडं राहिलं.

संदर्भ : महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव मोहिते पाटील लेखक हरिश्चंद्र मगर (महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई)

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.