सामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर, इथल्या साखर कारखानदारीवर, त्याच्यावर चालणाऱ्या राजकारणावर संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता असते. या साखरसम्राटांबद्दल अनेक समज गैरसमज असतात. यातील कित्येक अफवाच असतात.

अशाच गैरसमजाचे सर्वात मोठे बळी  ठरले होते अकलूजचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील.

सह्याद्रीच्या शिलाखंडाप्रमाणे भारदस्त देह, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, धोतर, करडी नजर. एकेकाळी कुस्ती गाजवलेले पहिलवान असलेले शंकरराव मोहिते पाटील यांचे व्यक्तिमत्वच पाहणाऱ्याला जरब बसवणारे असे होते.

पण मोहिते पाटलांचा इतिहास स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतीचा होता.

चले जाव चळवळीवेळी आपल्या पैलवान मित्रमंडळींना सोबत घेऊन अन्यायी सरकार विरुद्ध त्यांनी रान उठवलं होतं. प्रतिसरकारच्या चळवळीत शामिल झाले. हातात शस्त्र घेऊन ब्रिटिशांना धडा शिकवला. कारावास सहन केला.

क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली.

स्वातंत्र्यानंतर शंकरराव मोहिते पाटील राजकारणात आले. गावचे सरपंच बनले. त्यांचं शालेय शिक्षण कमी झालं होतं पण वैचारिक बैठक पक्की होती. साने गुरुजींचे पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी उपोषण झाले तेव्हा मोहिते पाटील आपल्या तरुण मित्रांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोहिते पाटील आपल्या भागात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांची तळमळ, त्यांचं चारित्र्य, त्यांचा विकासकामांचा झपाटा हे तिथल्या लोकांनी अनुभवलं होतं. म्हणूनच काँग्रेसची लाट असतानाही बाहेर राहून मोहिते पाटलांनी आमदारकीचा विजय मिळवून दाखवला.

साधारण याच काळात पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजत होता. प्रवरानगर येथे विखेपाटील शेतकऱ्याचा स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभारत होते. मोहिते पाटलांनी हा प्रयोग अकलूजला करायचं ठरवलं.

कारखाना उभा करण्यासाठी भागभांडवलाची गरज होती. गावोगावी हिंडून, बांधाबांधावर जाऊन त्यांनी शेतकर्याना कारखान्याच महत्व पटवल. जीवाच रान करूनही आवश्यक भागभांडवल जमा होत नव्हत. अनेकांनी त्यांना समजावून सांगितलं,

तुमचा भाग दुष्काळी आहे. इथे कारखाना चालवण्यासाठी आवश्यक ऊसं मिळणार नाही. त्याला लागणार भांडवल तुमचे गरीब शेतकरी उभे करू शकणार नाहीत.

पण जिद्दी स्वभावाचे मोहिते पाटील गप्प बसणाऱ्यातले नव्हते.

पावलोपावली आलेल्या असंख्य अडचणीवर मात केली. बायकोचे दागिने गहान टाकून पैसा उभा केला.  अडथळे आले त्याला मात करून कारखाना उभा केला. तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची साथ त्यांना लाभली.

त्यांच्या प्रयत्नामुळे शंकरराव काँग्रेस पक्षात आले. सतत निवडून येत गेले. दुष्काळी भाग असलेल्या अकलूज भागात कालवा आणून शेती फुलवली. दूध संघ सुरु केला. अनेक संस्था उभारल्या आणि त्या योग्यप्रकारे चालवून देखील दाखवल्या.

पाहता पाहता या भागात समृद्धीही आली. शंकरराव मोहिते पाटलांच्या सहकारी संस्था पाहण्यासाठी देशोविदेशाहून मंडळी येत होती.

याच काळात त्यांच्याविरोधी गट कार्यरत झाला. थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत शंकररावांची लोकप्रियता पाहवत नाही अशी मंडळी पुण्यामुंबईच्या मीडिया मध्ये बसली होती. शंकरराव मोहिते पाटलांच्या सुपुत्राच्या म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नावेळी घातलेल्या सहस्त्रभोजनाच्या चर्चा अपूर्वाईने वर्तमानपत्रात रंगवण्यात आल्या. दुष्काळी भागात विहिरीत बर्फ टाकून गावजेवण घातलं म्हणून टीका झाली. पण शंकरराव डगमगले नाहीत.

अशातच एक घटना घडली.

सहकाराच्या यशामुळे या परिसरात नव्यानेच पैसा खुळखुळू लागला होता पण मनोरंजनाचे साधन उपलब्ध नव्हते. शामराव पाटील नावाच्या व्यक्तीने अकलूज मध्ये सिनेमा थिएटर उघडले. त्याकाळी त्यांना तेरा लाख रुपये खर्च आला होता. सिनेमाचं होतं त्यामुळे शामराव पाटलांचे थिएटर गर्दी खेचु लागले.

हे शामराव पाटील म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांचे राजकीय विरोधी. 

त्यांच्या समर्थकांत कायम उभा दावा असायचा. एकदा थिएटरवर सामना चित्रपट लावण्यावरुन मोहिते आणि पाटील समर्थकांच्या मारामार्‍या झाल्या. सामना सिनेमात निळू फुलेंनी साकारलेला राजकारणी शंकररावांवर चर्चा त्याकाळी होती. मोहिते पाटलांच्या समर्थकांनी या थिएटरचे खूप नुकसान केले.

अशातच एकेरात्री शंकरराव मोहिते पाटील पुण्याहून अकलूजला परतत होते तेव्हा पाटस घाटात त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला. सुदैवाने हा बॉ म्ब गाडीच्या मागील बाजूवर आदळला. स्फोट झाल्यानंतर गाडीच्या पाठीमागच्या काचांचा चुरा झाला. किरकोळ प्रमाणात शंकरराव मोहितेंच्या हाताला जखम झाली.

हे बॉम्बस्फोट प्रकरण प्रचंड गाजले. त्याचा संपूर्ण वृत्तांत श्री नावाच्या साप्ताहिकात छापून आला. पोलीस केस झाली.

शामराव पाटील यांना या प्रकरणात आरोपी म्हणून अटक झाली. आणीबाणीच्या काळानंतर जनता सरकार आले व शामराव पाटील जामिनावर सुटले. प्रचंड सहानुभूती मिळवत त्यांनी शंकरराव मोहिते पाटलांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली आणि आश्चर्यकारकरित्या जिंकले.

शंकरराव मोहिते पाटील आपल्या सहकाराच्या बालेकिल्ल्यात आयुष्यात पहिल्यांदा पराभूत झाले होते.

या सगळ्या घडामोडीवर १९७८ साली अनंत माने यांनी लक्ष्मी हा सिनेमा बनवला. निळू फुले, रंजना, रवींद्र महाजनी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. अकलूजचे राजकारण, पाटस घाटातला बॉम्बस्फोट यावर असलेला हा सिनेमा प्रचंड गाजला. पण या काळात मोहिते पाटील मनाने खचले. त्यातच त्यांचे अकाली निधन झाले.

सन्दर्भ- मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्रशांत पवार 

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. प्रशांत says

    पण “शंकरराव चव्हाण “डगमगले नाहीत ऐवजी “शंकरराव मोहिते पाटील “असा उल्लेख हवा.
    धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.