एका पत्रकाराचा लेख वाचून शंकररावांनी थेट धरणाचं ठिकाण बदललं.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असं म्हणतात. मात्र शेती जगायला पाणी गरजेचे असते. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाच करू शकत नाही.

महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, नर्मदा,भीमा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात त्याचे पाणी समुद्राला जाऊन मिळते मात्र इतर काळात यापैकी बहुतांश नद्या कोरड्याच असतात. हे चित्र बदललं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विकास मार्गी लागेल हे इथल्या राज्यकर्त्यांनी खूप आधीच ओळखलं होतं.

या नद्यांचे पाणी अडवून ते धरणात साठवायचे व जलसिंचनातून अख्ख राज्य सुजलाम सुफलाम करायचे ध्येय घेऊन एखाद्या जलसंशोधकापेक्षाही जास्त अभ्यास करणारा नेता म्हणजे शंकरराव चव्हाण.

शंकरराव चव्हाण हे मराठवाड्याचे नेते होते. दुष्काळाची झळा त्यांनी आयुष्यभर सोसली होती. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांचे नशीब बदल घडवण्यासाठी कंबर कसली. राज्याचे जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी शेकडो पाटबंधारे प्रकल्प उभारले व कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली.

विष्णुपुरी प्रकल्प योजना आणि जायकवाडी प्रकल्प योजना या तर जणू शंकररावांच्या मानसकन्याच होत्या. अनेक अडचणींवर मात करून शंकररावांनी कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, काळमावाडी, गिरणा, घोड, सुखी इ. पाटबंधारे प्रकल्प उभारले.

या अनेक पाटबंधारे प्रकल्पांमुळे त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ असे म्हटले जाई.

असाच एक प्रकल्प सत्तरच्या दशकात महाराष्ट्र व गोवा यांच्या सीमेवर उभा करायचं चाललं होतं. पाटबंधारे मंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांच्याकडेच या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात तिळारी नदीवर प्रचंड धरण बांधण्याचा संकल्प राज्य सरकारने जाहीर केला होता.

पानशेतच्या साडेतीनपट एवढ्या जलाशयाचे ते धरण परमे गावी बांधायचे होते. या धरणाच्या उभारणीमध्ये साधारण नऊ हजार लोक विस्थापित होणार होते. हा प्रकल्प अहवाल केंदीय जल व वीज आयोगाने तांत्रिक छाननी करून मंजूर केला होता.

मात्र धरणग्रस्त या प्रकल्पामुळे खुश नव्हते. त्यांच्या प्रश्नांना आवाज उठवायचं काम केलं शां.मं. गोठोसकर या पत्रकारांनी.

गोठोसकरांनी राज्य सरकारच्या अहवालाचा अभ्यास केला. त्यांना या अहवालात काही ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. आपल्या ब्लॉग मध्ये ते सांगतात की, 

परमेऐवजी आयनोडे गावी धरण बांधले , तरीही पाणी तेवढेच साठविता येईल आणि फक्त तीन हजार लोकांना विस्थापित व्हावे लागेल , असे माझ्या लक्षात आले. मी त्याप्रमाणे एक लेख लिहिला.

तो लेख कोकणात चांगलाच गाजला. त्याची चर्चा सगळीकडे झाली. शंकरराव चव्हाणांच्या पर्यंत तो लेख जाऊन पोहचला. त्यांनी त्या लेखाची तत्काळ दखल घेऊन , त्या बाबीच्या चौकशीचे आदेश दिले. गोठोस्करांनी नोंदवलेले आक्षेप खरे निघाले. 

कामाच्या बाबतीत हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव चव्हाणांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली व तत्काळ आयनोडे येथे धरण बांधण्याचे आराखडे तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

त्या नव्या आराखड्याप्रमाणे धरण तयार झाले. या एका निर्णयामुळे त्यांनी सहा हजार लोकांना विस्थापित होण्यापासून वाचविले. हे धरण पुढे १९८५ साली बांधून पूर्ण झाले. आजही इथल्या कालव्यातून येणारे पाणी कोकणातील शेतकऱ्यांना सजलं सुफलाम बनवत आहे.

असे त्याकाळचे नेते होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही पावले मागे घ्यावी लागत असली तरी त्यात कमीपणा वाटून घेण्याचे काही कारण नाही याच उदाहरण शंकरराव चव्हाणांनी दाखवून दिलं. फक्त एक वर्तमानपत्रातील टीकात्मक लेखाची दखल घेऊन आपली चूक मान्य करण्याचा व त्यावर कृती करण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्याजवळ होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.