गांधीहत्येनंतर किर्लोस्करांचा कारखाना जाळण्यासाठी तेलाचा टँकर नेण्यात आला होता पण..

किर्लोस्करवाडी हे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. एका सायकलदुरुस्तीच्या दुकानापासून ते नांगराचा कारखाना, डिझेल इंजिनाच्या कारखान्याची निर्मिती केली. हजारो हातांना काम मिळवून दिलं.

महाराष्ट्रातील शेती फुलली ती किर्लोस्करांच्या शेतीपूरक यंत्रांच्या साथीनेच.

लक्ष्मणरावांच्या पाठोपाठ त्यांचे परदेशात शिक्षण घेऊन आलेले सुपुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर कंपनीचा चढता आलेख गगनाला नेऊन भिडवला.

फक्त भारतातच नाही तर जगभरात किर्लोस्कर कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेबद्दल खात्री दिली जात होती. अधुनिकतेचे व औद्योगिकीकरणाचे पुरस्कर्ते असलेल्या शंतनूरावांनी किर्लोस्करवाडी व पुण्याच्या कारखान्याच्या सोबतच इतर नवं उद्योजकांना त्यांचे कारखाने उभारण्यास मदत केली.

उद्योगधंद्यांनी राजकारणापासून दूर राहावे असे म्हणतात पण स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीत किर्लोस्करांना ते शक्य झाले नाही.

लक्ष्मणराव किर्लोस्करांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध हकते. यांत्रिकीकरणावरून असलेले गांधीजी व किर्लोस्कर यांच्यातील मतभेद सर्वश्रुत होते पण तरीही पंडित नेहरूंपासून अनेक काँग्रेस नेत्यांनी किर्लोस्करवाडीला भेट दिली होती व या उद्योगसमूहाचे कौतुक केले होते.

Mobile web banner

दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटिश सरकारला सैन्यासाठी प्रचंड प्रमाणात साहित्याचा पुरवठा लागणार होता. मंदीची झळ बसून कारखाने बंद पडू नयेत म्हणून अनिच्छेने का असेना पण शंतनुरावांनी सरकारच्या ऑर्डरी स्वीकारायचं ठरवलं.

याच दरम्यान किर्लोस्करवाडी ज्या औंध संस्थानात येते तेथे क्रांतीच वारं घुमू लागलं.

औंधच्या राजांनी प्रजेच्या हातात सत्ता देण्यास सुरुवात केली होती, शिवाय भूमीगत होण्यासाठी आश्रय स्थान म्हणून देखील अनेक क्रांतिकारक औंध मध्ये येऊ लागले.

अशातच किर्लोस्करवाडी हुन अगदी ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा मुख्य केंद्र तयार झाल.

या भागातून इंग्रज अधिकाऱ्यांना घालवून टाकण्यात आल. हातात शस्त्र घेऊन ब्रिटिश सत्ता उलथवून लावण्यासाठी पेटून उठलेल्या तरुणांबद्दल किर्लोस्करांना सहानुभूती होती.

मात्र उघडपणे क्रांतिकार्याला मदत करणे शक्य नव्हते.

तरीही ब्रिटिश पोलिसांना शंका येऊन त्यांनी 200 पोलिसांच्या सह किर्लोस्करवाडीची झडती घेतली होती. किर्लोस्कर क्रांतीकारकांना गुप्तपणे रिव्हॉल्व्हर बनवून देतात असे आरोप केले गेले. पण दोन फुटकळ गावठी कट्टे वगळता त्यांना काही सापडले नाही.

असाच आणखी एक कठीण प्रसंग स्वातंत्र्यानंतरही किर्लोस्करवाडीवर ओढवला.

गांधीजींची हिंदुमहासभेच्या नथुराम गोडसे नामक माथेफिरू युवकाने हत्या केली आणि देशभर दंगलीचे सत्र सुरू झाले. महाराष्ट्रातही हिंदू महासभा व संघाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरू झाले.

काही समाजकंटकामुळे या दंगलीचे स्वरूप ब्राम्हणविरोधी दंगलीत बदलून गेले.

अनेक निरपराध ब्राम्हणांची घरे जाळण्यात आली. त्यांना आपल्याच गावातून परागंदा व्हावे लागले. विशेषतः प. महाराष्ट्रात दंगलखोरांनी मोठा उच्छाद मांडला होता.

याची झळ किर्लोस्करवाडी पर्यंत येऊन पोहचली.

किर्लोस्कर हे जातीने ब्राह्मण व त्यांचे सावरकरांशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे दंगल खोरांनी त्यांनादेखील या वादात ओढले. असं सांगितलं जातं की किर्लोस्करवाडीचा कारखाना जाळायला दंगलखोरांनी थेट तेलाचा टँकरच आणला होता.

मोठा बाका प्रसंग ओढवला. तरीही शंतनुराव किर्लोस्कर अतिशय शांतपणे जमावाला सामोरे गेले आणि त्यांनी त्यांना निग्रहाने सांगितलं.

“हा कारखाना तुमचाच आहे. जाळताय तर जाळा पण कारखाना जाळला तर पोट कसं भरणार?”

शंतनुरावांनी निर्भीडपणे हा प्रश्न विचारल्यावर अनेकांचे डोळे उघडले.

दंगलीचा उन्माद ओसरला व जमाव पांगला.

मोरारजी देसाई यांच्या मार्फत ही गोष्ट पंतप्रधान नेहरूंच्या कानावर घातली. पंडित नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट दिली होती शिवाय औंधचे युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी त्यांचे मित्र होते.

शंतनुराव किर्लोस्करांच्या देशभक्तीबद्दल कोणीही शंका घेण्याचे कारण नव्हते. महाराष्ट्राच्या उद्योगधंद्याचा पाया रचणाऱ्या  किर्लोस्करवाडीचे संरक्षण करण्यासाठी नेहरूंनी लष्कर पाठवले. जवळपास महिनाभर कारखान्याबाहेर हा बंदोबस्त होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.