पुनर्जन्माच्या या घटनेची दखल घेवून महात्मा गांधींनी चौकशी समिती बसवली होती.

इतिहासाच्या पोथडीत भयानक किस्से आहेत. आपण त्याला भाकड कथा म्हणूया. पण या भाकड कथांवर विश्वास ठेवायचा का नाही हे कळत नाही. म्हणजे आत्ता आमचचं बघा. असल्या गोष्टींवर आमचा शून्य विश्वास आहे. पण ही गोष्ट वाचल्यानंतर अधिकाधिक शोध घेत गेलो.

त्यानंतर जितकं वाचायला मिळालं ते विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं. पण प्रत्येक ठिकाणी ही सत्यघटना असल्याचं सांगण्यात आलं.

त्या काळात देखील यावर विश्वास ठेवता आला नव्हता. खुद्द महात्मा गांधींच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी १५ सदस्यांची एक चौकशी समिती गठित केली होती या समितीने देखील पुनर्जन्माची कथा खरी असल्याचा रिपोर्ट दिला होता.

भारताच्या इतिहासात शांतीदेवी या नावाने ही घटना प्रसिद्ध आहे.

घटना अशी आहे की मथुरा शहरात १८ जानेवारी १९०२ साली लुगडीदेवी या मुलीचा जन्म झाला. तिचे वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झालं. मथुरेतच असणाऱ्या केदारनाथ चौबे या कापडाचे दुकान असणाऱ्या माणसांसोबत तिचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर ती गर्भवती राहिली. पण ते मुलं मृत झाले. ती दूसऱ्यांदा गर्भवती राहिली. यावेळी तिला एक मुलगा झाला. पण मुलगा झाल्यानंतर दहा दिवसातच तिचा मृत्यू झाला.

लुगडी देवीच्या मृत्यूनंतर १ वर्ष १० महिने आणि ७ दिवसांनंतर म्हणजेच ११ डिसेंबर १९२६ साली दिल्लीत शांतीदेवी नावाची मुलगी जन्माला आली. वयाच्या चौथ्या वर्षांपर्यन्त ही मुलगी ठिक असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मात्र मी मथुरीची असून माझ नाव लुगडीदेवी असल्याचा दावा ती करु लागली. ती स्थानिक मथुरेच्या भाषेत बोलू लागली. वेगवेगळी नावे घेवू लागली. मथुरेत आपला नवरा असून आपल्याला एक मुल असल्याचं ती सांगू लागली. तिच्या या विचित्र वागण्यावर कोणाचा विश्वास नव्हता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मथुरेच्या स्थानिक भाषेत बोलत होती. दिल्लीत ही भाषा एका चार वर्षाच्या मुलीने बोलणं हे विचित्र होतं.

याच मुलीच्या घरी बाबू बीचन चंद्र नावाचे एक प्राध्यापक येत असायचे. त्यांनी या मुलीची चौकशी केली. ती सर्व गोष्टी सांगायची. आपणाला मथुरेला घेवून जाण्याचा हट्ट करायची पण काहीकेल्या ती आपल्या नवऱ्याच नाव सांगत नव्हती. बाबू बीचन चंद्र यांनी तिला नवऱ्याचं नाव सांगितलं तरच तिला मथुरेला घेवून जाण्याचं आमिष दाखवलं. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याचं नाव केदारनाथ चौबे असल्याचं सांगितलं.

प्राध्यापक असणाऱ्या त्या व्यक्तींनी केदारनाथ चौबे या नावाने मथुरेतील व्यक्तींचा पत्ता शोधून काढला. चार वर्षांची शांतीदेवी ज्या घटना सांगत आहे त्याचं वर्णन करुन त्यांनी केदारनाथ यांना पत्र पाठवलं. केदारनाथ यांनी पत्राला उत्तर दिलं की, शांतीदेवी सांगत असणाऱ्या सर्व घटना खऱ्या आहेत. माझा एक भाऊ दिल्लीत राहतो. कांजीवन अस त्यांच नाव असून त्याला मी सर्व घटना कळवत आहे आपण त्याची भेट घ्यावी.

केदारनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे ते प्राध्यापक चार वर्षांच्या मुलीला घेवून कांजीवन यांच्या घरी गेले.

जाताना त्यांनी आपण कोणाच्या घरी जात आहोत हे तिला सांगितलं नाही. शांतीदेवी या चार वर्षांच्या मुलीने मात्र कांजीवन यांना पाहताच ओळखले. तिने त्यांच्या घरातील घटना सांगितल्या. कांजीवन यांचा विश्वास बसला.

कानोकानी ही घटना प्रसिद्ध झाली. पत्रकारांनी ही घटना छापून आणली. आणि या घटनेची खबर म. गांधींना लागली. म. गांधींनी देखील याची दखल घेतली आणि चौकशी करण्यासाठी १५ जणांची नियुक्ती केली.

या टिमकडे जबाबदारी होती की शांतीदेवीला मथुरेत घेवून जावं आणि चौकशी करावी.

ठरल्याप्रमाणे ही टिम शांतीदेवीला घेवून मथुरेत पोहचली. मथुरेत पोहचताच शांतीदेवी सर्व मथुरेतील घराचा पत्ता सांगू लागली. ती घराचं योग्य वर्णन करु लागली. त्यानंतर वेळ होती ती केदारनाथ चौबे यांना भेटण्याची. या वेळी चौकशी समितीने केदारनाथ यांना वेगळ्या नावाने शांतीदेवीसमोर आणलं होतं. पण केदारनाथ यांना पाहताच तिने ओळखले. घरातील इतर नातेवाईक आजूबाजूचे लोक अशा सर्वांना तिने नावाने ओळखले. सोबत त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग तिने व्यवस्थित सांगितले.

पण तिच्या पश्चात केदारनाथ चौबे यांनी दूसरं लग्न केलं होतं. तिने मरताना आपल्या नवऱ्याकडून वचन घेतले होते की ते पुन्हा लग्न करणार नाहीत. शांतीदेवीने आपल्या नवऱ्याला त्या वचनाची आठवण देखील करुन दिली.

कुठेच संशय घेण्यासारखी शक्यता नसल्याने या कमिटीने देखील शांतीदेवी हीच लुगडीदेवी असल्याचं मान्य केलं व पुनर्जन्मावर शिकामोर्तब केला.

बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा रिपोर्ट १९३६ साली आला होता. त्या काळात भारतावर ब्रिटीश सत्तेचं राज्य असल्याने भारतातील अनेक बातम्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध होत असत. ही बातमी देखील जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. त्यानंतर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञ भारतात भेट देवू लागले. ते शांतीदेवीची चौकशी करु लागले. तिच्या मुलाखती घेवू लागले. प्रत्येकजण तिच्या पुर्नजन्माच्या दाव्यावर विश्वास ठेवू लागला.

शांतीदेवी हीच लुगडीदेवी असल्याचं मान्य करण्यात आल्यानंतर बातमी मागे पडू लागली. शांतीदेवी अविवाहित राहिली. ती नेहमी आपल्या पुनर्जन्माबद्दलच बोलत राहिली. तिचा मृत्यू २७ डिसेंबर १९८७ साली झाला.

आपल्या मृत्यूच्या तीन दिवस अगोदर तिने पुर्नजन्माच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इयान स्टिव्हनस यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर इयान स्टिव्हनसन यांनी देखील सांगितलं की शांतीदेवीला विचारण्यात आलेल्या प्रश्नापैकी २४ गोष्टी तिने तंतोतंत सांगितल्या. यावरून त्यांची देखील खात्री पटली होती की शांती देवी ही गतजन्मची लुगडी देवीच आहे. 

संदर्भ : 
Leave A Reply

Your email address will not be published.